पोरगं आठ महिन्यापूर्वी कुस्तीचा फड गाजवत होतं, आज कोरोनामुळं शेतमजूरीची वेळ आली बघा

कोल्हापूर जिल्ह्यातला भरतकुमार पाटील. शिरोल तालुका आणि गाव कोथळी. आसपासच्या पंचक्रोशीत पैलवान म्हणून प्रसिद्ध. कृष्णा पंचगंगेच्या पट्ट्यात जी काही इरसाल माणसं आहेत त्यात हा गडी जरा जास्तच वरचढ. 

हा कुस्ती पण खेळतो, डाव पण टाकतो आणि भल्याभल्यांचे आवाज काढून आतडीला पीळ बसेपर्यन्त हसवतो सुद्धा. आज मात्र या पैलवानावर शेतमजूरीची पाळी आली. 

भरतकुमार पाटील नेमका कोण, तो काय करतो हेच सांगणारा हा लेख. 

कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातला हा गडी. कुस्तीच्या फडात याने शड्डू ठोकला की कुस्ती शौकीनांच्या नजरा त्यांच्यावरून हलत नाहीत. काय शड्डू मारतय म्हणून त्याचं सगळीकडे कौतुक चालू होतं. पण याच पैलवानाकडे अजून एक कला आहे. ती कला म्हणजे मिमिक्रीची. शरद पवारांपासून ते मोदींपर्यन्त भल्याभल्यांचे आवाज तो लिलया काढत. निळु फुले, मकरंद अनासपुरे यांचे आवाज काढणं आणि कुस्तीचे डाव मारणं हिच त्याची कला आणि हेच त्याच्या जगण्याचं साधन देखील होतं. 

भरतच्या घरची परिस्थिती गरिबीची. त्यात त्याच्या लहानपणीच त्याचे वडील वारले. त्यानंतर आई आणि लहान भावासोबत त्याचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. इयत्ता आठवीत असताना त्याची पावलं कुस्तीकडे खेचली गेली. शाळेय स्पर्धातच पठ्ठ्याने कुंडल, बलवडी अशी बक्षीसे मारत नगर आणि पुण्यात देखील आपला शड्डू ठोकला. यात्रा जत्रात होणाऱ्या कुस्त्या आणि त्यातून मिळणाऱ्या इनामावर तो खर्च भागवत होता. 

APA 6519 scaled
फोटो : आप्पासाहेब चौगुल (जयसिंगपुर)

याला जोड मिळाली ती त्याच्या मिमिक्रीच्या कलेची. हसा पण जोरात नावाने दिड तासाचा डेंजर हसवणारा कार्यक्रम तो करु लागला. भागातल्या यात्रा-जत्रे एका बाजूला शड्डू ठोकून तर दूसऱ्या बाजूला पोटभर हसवून गडी मैदानं मारू लागला. बघता बघता या पठ्याने आपल्या हसा पण जोरात कार्यक्रमाचे ११५२ प्रयोग पुर्ण केले. 

आत्ता कुठं फाटलेल्या आयुष्याला ठिगळं जोडायची वेळ आली. चार पैसे गाठीला घावू लागले तोच कोरोनो आला. माणूस माणसात राहिला नाही. गावच्या यात्रा जत्रा बंद झाल्या आणि शड्डू ठोकून मैदान गाजवणारा भरतकुमार शेतात शेतमजूर म्हणून कामाला जाऊ लागला. 

सध्या भरतकुमार काय करतो तर शेतमजूरी करतो. कधी एकदा करोना जातो आणि यात्रांचा मोहोल तयार होतोय अस त्याला वाटतय. भरतकुमार हे प्राथमिक उदाहरण आहे. जे मतीन शेख यांना दिसलं त्यांनी लिहलं आणि जयसिंगपूरच्या अप्पा चौगुले यांच्यामुळे ते आम्ही बोलभिडू मार्फत तुमच्यापर्यन्त पोहचवलं. 

असे कित्येक पैलवान आहेत. गावच्या यात्रा-जत्रा बंद झाल्याने कित्येक माणसं आहे. लवकर करोना संपो आणि पुन्हा सुगिचे दिवस येवोत. भरतकुमारचा शड्डू पुन्हा मैदान गाजवो हिच बोलभिडूची इच्छा.

माहिती : 

पै.मतीन शेख, सकाळ पत्रकार – 9730121146

आप्पा चौगुले : 878600620

Leave A Reply

Your email address will not be published.