आत्ता जिथे सीएसटीची इमारत आहे तिथे पूर्वी मुंबादेवी मंदिर होतं

मुंबई शहर वेगाने बदलत गेलं. सुरुवातीला निर्जन असणारे रस्ते आत्ता २४ तास माणसांनी गजबजलेले असतात. प्रत्येक शहराचा स्वतःचा एक इतिहास असतो. खूपदा आपल्याला तो ठाऊक नसतो. आपण वरकरणी जे दिसेल अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो.

पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा मुळाशी जाऊन शोध घेतो तेव्हा रंजक माहितीचा एक खजिनाच गवसतो. अशीच एक रंजक माहिती मुंबईतील मुंबादेवी मंदिराविषयी…

एखादा माणूस पहिल्यांदा पुण्याला आल्यावर जसं त्याला दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्याचं आकर्षण आणि अप्रूप असतं, तसंच मुंबईला भेट देणाऱ्या प्रत्येक माणसाला मुंबादेवी मंदिराविषयी वाटत असतं. मुंबईत भुलेश्वर येथे फेरीवाल्यांची इतकी दाटीवाटी झाली आहे की या मंदिराचं प्रवेशद्वार काहीसं झाकून गेलं आहे.

असं असलं तरीही, मुंबादेवी मंदिराविषयी प्रत्येक मुंबईकराच्या मनात श्रद्धा आणि आस्था आहे.

सीएसटी स्टेशनवर बाहेर पडल्यावर स्टेशनची आकर्षक इमारत सर्वांच्या नजरेत भरते. रात्री सीएसटी वरून घरी परतताना स्टेशनच्या इमारतीला दररोज वेगवेगळी लायटिंग केलेली असते. त्यामुळे अनेक वर्ष ही इमारत जरी पाहत पाहत असलो, तरीही फोनमधल्या कॅमेरा मध्ये सुंदर रोषणाई केलेल्या या इमारतीचा फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही.

दिवसाउजेडी सुद्धा वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली ही इमारत डोळ्यांनी एकवार पाहिल्याशिवाय कोणाचं समाधान होतं नसावं.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबादेवी विषयी असलेल्या लेखाची गाडी सीएसटी वर कशी आली. तर सांगून विश्वास बसणार नाही की, सध्या जी सीएसटीची इमारत आपण पाहतो तिथे पूर्वी मुंबादेवीचं मंदिर होतं.

मुंबई हे सात बेटांचे शहर आहे. त्यामुळे असं मानतात की, प्रत्येक बेटाची स्वतंत्र ग्रामदेवता आहे. मुंबादेवी, महालक्ष्मी, प्रभादेवी, शितळादेवी, वाघेश्वरी, मणिमाला आणि अन्नपूर्णा अशा या सात ग्रामदेवता. झालं असं, की काळानुरूप मुंबई जशी बदलत गेली तसा इथल्या मंदिरांचा इतिहास आणि जागा बदलत गेली. त्यामुळे मुंबईत सध्या जी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची मुळ जागा वेगळी होती. बहुतांश मंदिरांच्या जागा या ब्रिटिश राजवटीत बदलल्या आहेत.

अगदी जुन्या काळात डोकावल्यास १३ व्या शतकात राजा भीमदेवाने महिकावती निर्माण केलं. महिकावती म्हणजे मुंबईत असलेलं सध्याचं माहीम.

महिकावतीच्या बखरीमध्ये राजा भीमदेवाचा उल्लेख आढळतो. आज मुंबईत जेवढी मंदिरं आहेत त्यातली अनेक मंदिरांची निर्मिती होण्यामागे भीमदेवाचं योगदान आहे. पुढे आपल्या देशात वर्षानुवर्ष अनेक परकीय आक्रमणं झाली. त्यामुळे मंदिरांची मुळ जागा कायम स्थलांतरित होत राहिली. मुंबादेवीच्या बाबतीत सुद्धा हेच झालं.

ज्या ठिकाणी बोरीचं जंगल होतं आणि जहाजांसाठी बंदर होतं अशा बोरीबंदर येथे मुंबादेवीचं मंदिर होतं. जंगलामधून बंदरात येणाऱ्या लोकांनी हे देऊळ बांधलं, असं मानतात. मुंबादेवीची मुळ मूर्ती एका शिळेच्या स्वरूपात काहीशी ओबडधोबड होती. कालांतराने त्या मूर्तीला योग्य असं रूप देण्यात आलं.

असं म्हणतात मुंबईचे मुळ रहिवाशी हे कोळी बांधव. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांची देवी म्हणून मुंबादेवी ओळखली जाते.

पूर्वी बोरीबंदर भागात ज्या ठिकाणी देवीचं मुळ मंदिर होतं तिथे मंदिरासमोर एक तळं होतं. ब्रिटिश अधिकारी गुन्हेगारांना याच तळ्याजवळ फाशी द्यायचे. या कारणासाठी हे तळं फार प्रसिद्ध होतं. कालांतराने हे तळं बुजवण्यात आलं. मुंबादेवी मातेच्या नावाविषयी अनेक मत – मतांतरं आहेत. काही जणांच्या मते मुंबा नावाच्या कोळी महिलेने या देवीची स्थापना केली, त्यामुळे तिच्या नावावरून या देवीला मुंबादेवी असं नाव पडलं.

तर इतिहासकारांच्या मते,

मुंबईत आधी द्राविडी संस्कृती होती. त्यांची एक स्वतःची भाषा होती. या संस्कृतीमध्ये भूमीला माता असं म्हटलं जायचं. तसेच मुंबा हे नाव सुद्धा याच भाषेतलं आहे. त्यामुळे या दोन नावाचं एकत्रित रूप म्हणजे मुंबादेवी. इतिहासाच्या अनेक वाटा असतात. प्रत्येकाची वाट वेगळी असते. त्यामुळे अधिक खोलात न शिरता आपण पुढे जाऊ…

पांडू सोनार या धनाढ्य माणसाने स्वतःच्या नावाची जमीन दान केली. आणि अंदाजे १९३७ साली मुंबादेवी मंदिर बोरीबंदर येथे उभारण्यात आले.

पूर्वी मंदिरासमोर एक तळं होतं. पण बदलत्या मुंबईत हे तळं बुजवलं गेलं. आज येथे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मंदिराची बोरीबंदर येथील मुळ जागा ब्रिटिश राजवटीत बदलली आणि मुंबादेवी मंदिर सध्या ज्या जागी आहे तिथे देवीचं मंदिर उभारण्यात आलं. मुंबादेवीची मूर्ती वाघावर आरूढ आहे. चांदीचा मुलामा चढवलेल्या लाकडी मखरामध्ये मुंबादेवी विराजमान आहे. मुंबादेवीच्या बाजूला अन्नपूर्णा देवीची दगडी मूर्ती असलेली दिसून येते.

अन्नपूर्णा देवीमुळे मुंबईत कोणी भुकेला राहत नाही, अशी आख्यायिका आहे.

तर अशी होती मुंबादेवीची कहाणी. कोळी बांधवांची या देवीवर विशेष भक्ती असल्याने मंदिर परिसरात अनेकदा कोळी माणसांची रेलचेल असते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये तर देवीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असतात. सध्या कोणाला मंदिरात जाता येत नसल्याने सध्याचा काळ लक्षात घेता सर्व भक्तगण देवीला मनोमन नमस्कार करत असतील, यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.