बुरारी केस : एकाच घरातल्या ११ जणांनी केलेली आत्महत्या आजही भूताटकीला बळ देत राहते

दार उघडलेलचं होतं. मी आत गेलो तेव्हा घराच्या मध्यभागी दहा जणांची प्रेतं लटकत होती. त्यांचे तोंड आणि पाय चिंध्यांनी बांधलेले होते. डोळ्यांवरती पट्ट्या होत्या. एकाच रंगाच्या कपड्याने हात बांधले होते. एखाद्या झाडाच्या फांद्या जशा लटकून राहतात तशी माझ्या समोर ती दहा प्रेत एकाच खोलीत लटकत होती.

दिल्लीतलं बुरारी कांड आठवत असेल. अजूनही दूकान का उघडलेलं नाही म्हणून या घरातल्या ललीतचा मित्र गुरूचरण सिंग जेव्हा त्याच्या घरात गेला तेव्हा त्याला समोर ते दहा जण लटकताना दिसले. एकाच घरातले दहा जण.

विचार करा एखाद्या माणसाने फास घेऊन आत्महत्या केली तर तुमच्या डोक्यातून ते चित्र अजिबात जात नाही. भलेही कितीही वर्षांपूर्वीची घटना असो तुम्हाला ते चित्र आहे अस आठवत राहतं. इथं या माणसानं दहा जणांना एकत्र फासावर लटकलेलं पाहिलेलं.

बातमी पसरली, पोलीस आले…

समोरचं ते दृश्य बघूनच गुरूचरणसिंग ओरडत बाहेर पडला. कोणीतरी पोलीसांना फोन केला. आत नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज पोलीसांना आलाच होता. अशा ठिकाणी जाण्याचं धाडस करणारे पहिले पोलीस अधिकारी होते ते राजीव तोमर.

राजीव तोमर धाडस करून घरात घुसले अन् अवघ्या दहा सेकंदात बाहेर पडले. बाहेर पडल्या पडल्या त्यांनी पोलीस जबाब दिला,

गेली १७ वर्ष मी नोकरी करतोय. आजपर्यन्त इतकं भयानक दृष्य मी पाहिलं नाही आणि पुढच्या आयुष्यात मला असलं काही बघायची इच्छा सुद्धा नाही.

दिल्लीतल्या एका मोहल्याचं नाव म्हणजे बुरारी. याच मोहल्यात राहणारं कुटूंब म्हणजे चुडावत कुटूंब. ११ जणांच एक सुखी कुटूंब. चांगला पैस्सा, शेजारपाजाऱ्यांसोबत चांगले संबध. आज्जी, तिची दोन मुलं, दोन सुना, पाच नातवंड असा ११ जणांचा सुखी परिवार.

कुटूंबप्रमुख म्हणून घरातला मुलगा ललितच सगळं काही पहायचा. सकाळी सहाच्या ठोक्याला घराच्या खाली असणारे तीन गाळे उघडायचा. सव्वासातला मॉर्निंग वॉक करायचा. वरवर पाहता इतकं सगळं ठिक होतं की आजूबाजूच्या लोकांना हे सगळं पचवणं आजही जड जातय.

ही केस इतिहासात बुरारी कांड म्हणून प्रसिद्ध झाली, कोणी याला न सुटलेला खून म्हणून संबोधलं तर कोणी काळ्या जादूचा प्रयोग म्हणून संबोधलं...

नेमकं प्रकरण काय होतं…

घरातल्या एकूण ११ जणांनी एकाच क्षणी आत्महत्या केली होती. पण इथे शंकेस जागा होती. पोलीसांना दूसऱ्या दिवशी करायच्या स्वयंपाकाची तयारी दिसली. उरलेलं दूध फ्रीजमध्ये दिसलं. फ्रिजमध्ये पुढच्या आठ-दहा दिवसांच सामान होतं. जेवण करण्यासाठी हरभरे भाजून ठेवण्यात आले होते.

माणूस कसं प्रत्येक गोष्टीची उद्याची तयारी करुन झोपतो अशा प्रकारचं घर होतं. समजा आत्महत्येचा विचार असता तर मग ही सगळी तयारी कशासाठी. इथेच शंकेस जागा होती.

म्हणूनच नियोजनबद्ध रितीने केलेले हे हत्याकांड असावं म्हणून पोलीसांची चौकशी सुरू झाली.

घराची तपासणी करताना वेगवेगळ्या अविश्वसनीय अशा गोष्टी मिळत गेल्या. हे घरच प्रचंड धार्मिक प्रवृत्तीचे होते. घरात पूजेचा विधी करण्याच्या डायऱ्या सापडल्या आणि वेगवेगळे खुलासे होत गेले.

सुरवातीला पोलीसांना वाटलं हे कुटूंब सामुहिक आत्महत्या करणाऱ्या समुदायाच्या संपर्कात आलं असावं. उदाहरण सांगायचं झालं तर १९७८ साली अमेरिकेच्या जोन्सटाऊन येथे अशीच सामुहिक आत्महत्येची घटना घडली होती. ९०० जणांनी सामुहिक आत्महत्या केली होती. ती देखील एका धर्मगुरूच्या सांगण्यावरून

अशाच प्रकारचं प्रकरणं २००७ साली बांग्लादेशात झालं होतं. एकाच घरातल्या ९ जणांनी धावत्या रेल्वेखाली सामुदायीक आत्महत्या केली होती. या आत्महत्येला कारण देखील काळ्या जादूचं होतं. या कुटूंबाने आपल्या घराचं नाव ॲडम हाऊस ठेवलं होतं. बुरारी येथील घटनेत मृतकांच्या घरातून ज्या पद्धतीने डायरी सापडून आली अशा प्रकारची डायरी बांग्लादेशातल्या घटनेत देखील आढळून आली होती.

दिल्ली पोलीस देखील बुरारी घटना अशा काळ्या जादू तून झाली का याचा तपास करु लागले.

कुटूंबातील ११ जण मृत होते. पैकी १० जणांनी स्वत:ला अटकवून घेतले होते. यातील ललितकडील डायऱ्या तपासताना पोलीसांना ललीतच्या वडिलांचा रेफरन्स मिळत गेला.

ललितच्या वडीलांच नाव भोपाळसिंह. सर्व कुटूंबाचा भोपाळसिंह यांच्यावर जीव होता. २००७ साली त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या ११ वर्षात ललितने ११ डायऱ्या लिहल्या होत्या. घरातल्यांच्या मते ते आजही घरात असतात अशी समजूत होती.

घरातील लहान मुलं त्यांना डॅडी म्हणायचे.

खेळता खेळता अंधार पडला की पोरं निम्म्यातून खेळ टाकून घरी यायची. त्यांना कारण विचारलं तर सांगायची

“डॅडी के आने का समय हो गया है।”

शेजार-पाजाऱ्यांनीही हा डायलॉग त्यांच्या घरातल्या लोकांच्या तोंडून अनेकदा ऐकला होता.

ललितच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरच ललितला या सर्व गोष्टींनी घेरलं. घराच्या समृद्धीसाठी आपल्या वडिलांनीच त्याला वड तपस्या करायला लावली अस त्यांन लिहलं होतं. हाच पुजेचा प्रकार म्हणजे वडाच्या पारंब्यासारखं गोलाकार लटकून घेणं. यात आपला जीव जाईल अशी साधी कल्पना देखील कोणाच्या मनाला शिवली नव्हती हे विशेष.

२००७ साली ललितच्या वडिलांच्या मृत्यूचा मानसिक धक्का घरातल्यांना बसला होता. पण सर्वात अधिक हा धक्का ललितला बसला. ललितच्या मते त्यांचे वडील त्यांच्यासोबत संपर्क करतात. त्याच्याशी बोलतात. तो हे सगळं लिहून देखील काढायचा. या घरात १५ वर्षांचा एक पोरगा आणि २५ वर्षांची पोरगी देखील होते.

त्यांनी देखील अशा गोष्टींना विरोध केला नाही. उलट आपल्या सगळ्या कुटूंबाच भलं व्हावं म्हणूनच आपले वडील वारले असून देखील आपल्या सोबतच आहेत अस या कुटूंबाला वाटायचं.

ललितच्या डायऱ्यामध्येच या पूजेचं वर्णन होतं, यात लिहलं होतं की,

वडाच्या पारंब्याप्रमाणे लटकवून घ्यावं. समोर पाणी ठेवावं. जेव्हा पाण्याचा रंग बदलू लागले तेव्हा मी प्रकट होईल आणि सर्वांना वाचवेल.

यातील मी म्हणजे ललितच्या तोंडातून बोलणारे त्याचे वारलेले वडिल होते. २००७ च्या अपघातामध्ये ललितच्या वडिलांचा मृत्यू झाला होता तर ललितचा आवाज गेला होता. पण काहीच महिन्यात त्याचा आवाज परत आला.

या गोष्टीला तो वडलांचा आशिर्वाद समजू लागला. त्यानंतर वडील त्याच्या अंगात येतात व कुटूंबासोबत बोलतात असे तो सांगत होता.

डायरीत ललितने जे वडिलांच्या भूमिकेतून लिहलं आहे त्याचं अक्षर देखील वेगळं होतं. याच कारण घरातली ३२ वर्षांची प्रियांका ललित सांगेल ते लिहून काढायची. ललित वडिलांच्या भूमिकेत बसायचा व प्रियांका लिहायची. पोलीसांनी अक्षरांची तपासणी केली तेव्हा या गोष्टी समोर येत गेल्या.

या कुटूंबाने या पूर्वी सलग सात दिवस हा प्रयोग केला होता, पण प्रत्येकजण हात सोडवून फासावरून उतरत असे. म्हणून अखेरच्या दिवशी सर्वांचे हात घट्ट बांधण्यात आले होते. असाही अंदाज लावण्यात आला.

ज्या दिवशी हा विधी करणार होते त्या दिवशी कायकाय काळजी घ्यायची याचं वर्णन देखील करण्यात आलं होतं. यामध्ये कुटूंबाने फक्त रोटी खाव्यात असा उल्लेख होता. त्याप्रमाणे रोटी मागवण्यात आल्या. शिवाय याच डायरीत ललितने आपल्या वडिलांच्या भूमिकेतून लिहताना माझ्या सोबत अजून पाच आत्मे असून ते देखील मदतीला येतील अस लिहलं आहे. त्यामध्ये त्यांची नावे देखील असून पोलीस तपासात या व्यक्ती कोण याची माहिती कधीच मिळाली नाही.

सायकॉलॉजिकल ऑटोप्सी हा मृत्यूनंतर माणसाच्या मेंदूत नक्की काय घडामोडी घडत होत्या याचा शोध घेणारी पोस्टमार्टमची सिस्टम आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये “घरातल्या कुणालाच आपलं आयुष्य संपेल असं वाटत नव्हतं” असं लिहिलं आहे.

त्यानंतर सुरू झाला भूताटकीचा खेळ…

एकाच घरातील ११ जणांनी आत्महत्या करणं ही साधी गोष्ट नव्हती. त्या दिवसापासून आजही या घरात भूत आहे अशा प्रकारच्या अफवा पसरत असतात.

११ नंबरचा खेळ ही यातील विशेष गोष्ट. या घरात ११ माणसे होती.  घराला ११ खिडक्या होत्या. घरावर असणाऱ्या लोखंडी रेलिंगला ११ बार होते शिवाय ११ पायऱ्या होत्या. इतकच काय तर घरातून बाहेर ११ पाईप्स काढण्यात आल्या होत्या. पण या पाईपचा उद्देशचं कळाला नव्हता. इतरांच्या मते या पाईप्स वेन्टिलेशनसाठी काढण्यात आल्या होत्या.

अशाच प्रकारचा दूसरा फोटो या घटनेनंतर ४ दिवसांमध्ये शेअर करण्यात आला होता.

Screenshot 2020 11 02 at 5.00.49 PM
पहिला फोटो आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला त्या दिवशीचा तर दूसरा फोटो चार दिवसानंतरचा

ज्या घरात ११ जण मृत पावले त्या घराच्या टेरेसवर ४ दिवसांनंतर लाल बकेट ठेवण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाला. शेजाऱ्यांच्या मते घर सिल असताना या गोष्टी टरेसवर कशा आल्या. पोलीसांनी चौकशी करायची गोष्ट सांगितली होती पण त्याचं माहिती माध्यमांमधून समोर आली नाही.

आज या घराची किंमत कोटीत असल्याचं सांगण्यात येत. पण घर घेण्याचच नाही तर घराच्या आसपास फिरकण्याचं धाडस देखील मोहल्ल्यातील लोकांच होतं नाही. मधून अधून बुरारी कांड मधील खोल्या भाड्याने गेल्याची माहिती येते मात्र परत ते लोक एक दोन दिवसात घर सोडून गेल्याची माहिती देखील येत असते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.