अस्सल राज्यपाल नियुक्त : ना. धों. महानोर

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० साली झाली. महाराष्ट्रात द्विस्तरीय विधीमंडळ आहे. पैकी विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, विधासभेतील आमदारांचे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रतिनिधी निवडून जातात तर राज्यपालांकडून विविध क्षेत्रातील १२ सदस्यांची कलम १७१/ नुसार नियुक्ती होते.

हे सगळं झालं नागरिकशास्त्र, जे आपण विसरून टाकू आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर येवू…

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर दर सहा वर्षांनी जे १२ सदस्य निवडले जातात अशा व्यक्तींची आजतागायत एकूण संख्या होते १०६.

आत्ता गंम्मत अशी की या १०६ पैकी १५-१६ व्यक्तीच वास्तविक त्या त्या क्षेत्राशी संबधित होत्या.

१०६ मधून निवडक १५-१६ वजा केले तर उर्वरीत ९० जण फक्त राजकीय पुर्नवसनासाठी आमदार झालेले.

असो तर अशाच खास आमदारांची माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय,

या सिरीजचं नाव आहे,

अस्सल राज्यपाल नियुक्त.

या सिरीजमधलं पहिले नाव आहे, जेष्ठ रानकवी ना. धों. महानोर.

मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या गावरान साहित्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे, साहित्य अकादमी ते पद्मश्री पुरस्काराचे मानकरी कविवर्य नामदेव धोंडो महानोर, उर्फ ना.धों. महानोर.

शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा ‘शेतकवी’. सोयगाव तालुक्यातील पळसखेडसारख्या गावात १९४२ साली जन्म झाला आणि त्यानंतर ७-८ वर्षात शाळेतच कवितांचा छंद जडला. रानावनाच्या संस्कारात वाढल्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कवितांवर याचा चांगलाच प्रभाव जाणवतो.

तेव्हा पासून आजतागायत ते आपल्या कवितांची मशागत करत आहेत. ते स्वतःला हाडाचा शेतकरी मानतात. आपला व्यवसाय सांगताना ही शेती हाच सांगतात. तर साहित्य विषय देखील शेतकरी हा आहे.

महानोर यांच्या लेखणीतून साकारलेली अजिंठा, कापूस खोडवा, पानझड, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, पक्षांचे लक्ष थवे, रानातल्या कविता, शेती, गंगा वाहू दे निर्मळ, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, यशवंतराव चव्हाण हे संग्रह मनाचा ठाव घेतात.

तर महानोर यांचे शेतीविषयक लिखाण देखील तितकेच दर्जेदार आहे.

शेतीसाठी पाणी, जलसंधारण, फलोत्पादन, ठिबक सिंचन, शेतकरी दिंडी ही पुस्तके त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हणून लिहिली. या पुस्तकातून शेतकऱ्यांचे श्रम वाचून कमी वेळेत आणि कमी खर्चात शेती कशी करता येईल याविषयी सांगितले.

यशवंतराव चव्हाण यांच्याशी इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात कवितेच्या निमित्ताने झालेली ओळख महानोरांच्या जीवनात परिवर्तन करणारी ठरली. पुढील अकरा वर्षांच्या सहवासात यशवंतरावांनी महानोरांच्या अनेक अडचणी सोडविल्या.कवितेसाठी प्रेरणा दिली. त्यांच्यातील लेखक, कवी जपला. काव्यप्रेमापोटी ते पळसखेडला आले.

पुढे १९७८ साली राज्यपाल कोट्यातून कला आणि शेती तज्ञ क्षेत्रातून त्यांची विधानपररिषदेवर नियुक्ती झाली.

साहित्य कलावंताचे, आणि शेतकऱ्यांचे ते प्रतिनिधी झाले. जरी त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री असले तरीही माझी नियुक्ती यशवंतरावांमुळे झाल्याचे महानोर आजही सांगतात.

विधान परिषदेवर ना. धों. महानोरांची नियुक्ती झाल्यानंतर महानोरांनी त्यांच्या आवडीच्या आणि अभ्यास विषय असलेल्या शेतीवर प्रश्न मांडायला सुरुवात केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले. खेड्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कमी पाण्यावर पिके घेता येतात हे त्यांनी प्रयोगानिशी सिद्ध केले.

महाराष्ट्र सरकारने त्यांच्या या प्रयोगाची दखल घेऊन कोरडवाहू फळझाड योजना सुरु केली.

आमदारकीच्या कालखंडात देशी-परदेशी फिरून जलसंधारणावर अभ्यास केला. आणि पाणी अडवल्याने ते जमिनीत जिरून विहिरीतील पाणी वाढते यावर प्रयोग केला. त्यातूनच ‘पाणी आडवा- पाणी जिरवा’ ही योजना समोर आली. नाला बेड कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले.

१९ जुलै १९८३ ला विधान परिषदेत ‘दुष्काळ’ या चर्चेसाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असा प्रस्ताव त्यांनी मांडला.

१९८३ ला, १९८४ ला वर्षभर दाेन्ही सभागृहांत दीर्घ चर्चा झाली. त्यांनी पुर्वीच्या अनेक दुष्काळांचे संदर्भ, पाणी-शेती व्यवस्थापन, लहान-माेठी धरणं व एकत्रित पाणलाेट विकास याेजना, फलाेद्यान, वनश्री अशी मांडणी केली. यावेळी एका तासाऐवजी ते तीन तास सारखे आकडेवारीनिशी देशातले व जगातले संदर्भ देवू शकले.

पुढे सिमेंटचे नालाबांध ही त्यांची योजना त्यावेळी राजीव गांधी यांनी स्वीकारली आणि राजस्थानमधील सुखा निर्मुलन कार्यक्रमच्या संदर्भात तीन हजार सिमेंट नाला बांध व त्यावर मातीचे छोटे बांध बांधून पाणी साठवण्यावर भर दिला.

१९९० ला शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले. महानोरांना पुन्हा सभागृहात घेतले. ‘जलसंधारण’ असे स्वतंत्र पाणलाेटाचं खाते निर्माण केले. त्याला जाेडून शंभर टक्के सबसिडीवर ‘काेरडवाहू फळबाग याेजना’ आणण्याचा तसेच सामाजिक वनीकरणाचा निर्णय घेतला.

शेततळी, ठिबक सिंचन सबसिडी याेजना घेतली. या याेजना महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यात दिल्या. यातून दुसऱ्या हरितक्रांतीचं नवे आकाश साकारले.

महानोर यानंतर सक्रीय राजकारणात आले नाहीत, मात्र आमदारकीच्या कालखंडात त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख नक्कीच करावा लागतो. आपल्याकडे राजकारणाला समाजसेवेचे लेबल लावून विधानपरिषदेवर जाणाऱ्यांच्या भाऊ गर्दी मोठी असते आणि त्यामुळे राजकारणाला नाव ठेवली जातात.

मात्र त्यात जे खरच निवडणूक लढवू शकत नाहीत पण समाजासाठी काही तरी देऊ शकणारे अशी व्यक्तिमत्व मागे राहायला नकोत. अशीच ही माणसे होती. अस्सल राज्यपाल नियुक्त या सिरीजमध्ये आपण अशाच माणसांची ओळख करुन घेवूया.

लवकरच भेटुया पुढच्या भागात…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.