सातारचा नगराध्यक्ष ते मुंबई राज्याचा पंतप्रधान झालेला माणूस..

ते सातारा शहराचे नगराध्यक्ष होते. शिवाय सुमारे दोन शतकं सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डवर त्यांची एकहाती सत्ता होती. बर हा सातारा जिल्हा म्हणजे आजचा सातारा नाही तर जूना सातारा. म्हणजे आजचा सांगली आणि सातारा जिल्ह्यांचा एकत्रित भाग आहे तितका भाग. इतक्या भागावर त्यांची एकहाती सत्ता चालत होती.

आत्ता तुम्ही म्हणालं यात विशेष काय, तर विशेष हे की हा माणूस धर्माने पारशी होता. पारशी असूनही मराठा राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या भागात ते अनभिषिक्त सम्राट म्हणून समोर आले.

त्यांच नाव धनजीशा कूपर…

धनजीशा कुपर यांचा जन्म १८७८ चा. स्वतंत्रपूर्व भारताचा तो काळ. त्यांचे वडील बोमनजी इर्जीभाई कूपर सातारा येथील शासकीय मद्य गोदामात सुतारकाम करत असत. पारशी म्हणल्यानंतर एखादे श्रीमंत कुटूंबच डोळ्यासमोर येते.

पण कूपर यांची सुरवातीची परिस्थिती तशी नव्हती. अत्यंत गरिब अशा घरात त्यांचा जन्म झाला. बोमनजी आणि गुलाबाई यांचे धनजीशा हे पाचवे अपत्य. धनजीशा यांचे शिक्षण सातारा शासकीय महाविद्यालयात म्हणजेच आत्ताच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झालं.

मेट्रिकपर्यन्तच शिक्षण पुर्ण करुन धनजीशा यांनी पद्मश्री पेपर मिलमध्ये नोकरी करण्यास सुरवात केली. याच काळात त्यांना कंत्राट व्यवसायातील खाचाखोचा समजून लागल्या. नोकरी सोडून त्यांनी कंत्राट घेण्यास सुरवात केली व इथेच दिवस पालटू लागले.

सैनिक कंत्राटे मिळवून त्यांनी जम बसवला, पुरेसा पैसा हातात येवू लागला व धनजीशा सातारा शहरातील प्रमुख श्रीमंत व्यक्तीमध्ये गणले जावू लागले.

पैसे आल्यानंतर राजकारण ओघाने येतच. धनजीशा यांच्या बाबतीत देखील असच झालं. रावबहाद्दूर काळे अर्थात रावजी रामचंद्र काळे यांच्या आग्रहामुळे ते सार्वजनिक जीवनात आले. ब्रिटीशांसोबत सामाजिक सलोखा राखून राजकारण करण्याची पद्धत त्यांनी आत्मसात केली. मिळालेल्या पुरेशा पैशातून समाजकारण, कृषिविकास, औद्योगिकीकरण अशा तिन्ही क्षेत्रात कूपर साहेबांचा वारू उधळू लागला.

पुढे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या ब्राह्मणेत्तर पक्षात ते सामिल झाले. सातारा जिल्ह्यातील ब्राह्मणेत्तर पक्षावर त्यांनी पकड मिळवली. विचार करा एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रातील या महत्वाच्या मराठा बहुल भागातून सुरू झालेल्या ब्राह्मणेत्तर राजकारणाचं नेतृत्त्व एक पारशी व्यक्ती करत होता. पण ही गोष्ट जास्त काळ टिकली नाही.

त्यामुळे कुपर साहेबांनी स्वत:चा गट उभारला. कूपर पार्टी असं नाव देवून जिल्ह्यातील सावकार, जमीनदार, पाटील अशा मातब्बर लोकांचा समावेश केला. पैसा आणि राजकारण हे समीकरण त्यांनीच पुढे आणलं अस म्हणलं जातं.

याचा परिणाम म्हणजे १९२० पासून पुढील वीस वर्ष कूपर साहेबांची सत्ता नगरपालिकेपासून ते स्कूल बोर्डांपर्यन्त प्रस्थापित झाली.

दूसरीकडे कूपर साहेब हे मोठ्ठे उद्योगपती म्हणून देखील समोर येत होते. १९२२ साली सातारा रोडवर पाडळी येथे कूपर इंजिनिअरिंग वर्क्स हा कारखाना त्यांनी सुरू केला. या कारखान्यात लोखंडी नांगर, ऊसाचे चरके, शेंगा फोडण्याची यत्रे, मोटेचे चाक, तेलाचे घाणे इत्यादी अवजारांची निर्माती करण्यात येत असे.

पुढे तर त्यांच्या कारखान्यात डिसेल इंजिनची निर्मीती होवू लागली. १९२६ सालात डिझेल इंजिन मोटारीला लावून त्याच प्रात्यक्षिक त्यांनी गव्हर्नरला दाखवले होते. १९३३ पासून त्यांच्या कारखान्यात डिझेल इंजिनची निर्मीती होवू लागली. १९३३-३४ साली ते मुंबई प्रांतिक सरकारमध्ये स्वराज्य संस्था खात्याचे मंत्री झाले. याच काळात ब्रिटीश सरकारने त्यांना नाईटहुड किताब बहाल केला.

या किताबामुळे धनजीशा कूपरचे ते सर धनजीशा कूपर झाले.

पुढे १९३७ च्या मुंबई प्रांताच्या गव्हर्नर कार्यकारी मंडळाचा सभासद या नात्याने अर्थ व महसूल खात्यांची कारभार त्यांनी पाहिला व १९३७ साली त्यांनी घटनात्मक पेचप्रसंगामुळे मुंबई प्रांताच पहिला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली.

१ एप्रिल ते १२ जुलै १९३७ या काळात ते मुंबई प्रांताचे पंतप्रधान होते. त्यांना ब्रिटीशांनी खानबहादूर हा किताब देखील दिला होता. १९४७ साली त्यांचे मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.