कार्लोस ‘द जॅकल’ने एका वेळी ३२ मंत्र्यांच अपहरण करुन जगात खळबळ उडवली होती

या जगात किती खतरनाक गुन्हेगार, डॉन, दहशतवादी होवून गेले याचा आपण नुसता विचार केलेलाच बरा. त्यांच्या गुन्ह्यांच्या सुरस कथा केवळ ऐकुनच अंगावर काटा उभा राहतो. यात मुंबईतील हाजी मस्तान पासून अरुण गवळी पर्यंत आणि अमेरिकेतल्या अल कपोन पासून पाकिस्तानातील लादेन, दाऊद, हाफिज सईद वगैरे सगळीच.

पण तरीही यातील एखादा घावला असता तरी त्यांना सगळ्यात मोठ्या फाशीच्या शिक्षेनंतर दुसरी सर्वात मोठी कोणती शिक्षा झाली असती, तर आजीवन कारावास. आणि ती ही एकदाच.

पण आज आम्ही तुम्हाला अशा एका गुन्हेगार आणि दहशतवाद्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला त्याच्या जीवनामध्ये एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

लॅटिन अमेरिकेच्या व्हेनेझुएलामध्ये १२ ऑक्टोबर १९४९ रोजी जन्मलेला इलिच रेमीरेज सांचेज.

पण त्याची खरी ओळख आहे ती ‘कार्लोस द जॅकल’ म्हणून. १९७० आणि १९८० च्या दशकामध्ये फ्रान्सने त्याला त्यावेळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केला होता. आणि फ्रान्सच्या पोलिस दलाने आपली संपूर्ण ताकद २० वर्ष त्याला शोधण्यामध्ये लावली होती.

कार्लोस द जॅकल हा वयाच्या फक्त २४ व्या वर्षी  ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन’ मध्ये सहभागी झाला आणि अतिरेक्यांच्याकडे क्रांतिकारी प्रशिक्षण घेऊ लागला आणि प्रशिक्षणानंतर स्वतःला क्रांतिकारी कार्लोस म्हणून घोषित केले.

३० डिसेंबर १९७३ रोजी त्याने आयुष्यातील पहिलाच हल्ला आणि तो देखील मार्क्स अँड स्पेन्सर्सचे तत्कालीन अध्यक्ष जोसेफ एडवर्ड सेफ यांच्या कंपनीच्या लंडन येथील स्टोरवर.

त्याने सेफ यांच्या दातामध्ये गोळी मारली, पण नशीब चांगले म्हणून या हल्ल्यातुन ते कसेतरी वाचले. यहुदी नेते आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जात असलेल्या सेफ यांच्यावरील या हल्ल्यानंतर त्याचा गुन्ह्यांचा सिलसिला चालू झाला.

कार्लोस आपल्या गुन्ह्यांमुळे सगळीकडेच चर्चेत होता. सत्तरच्या दशकामध्ये जेवढे मोठे अतिरेकी हल्ले झाले त्या सगळ्यांत त्याचे नाव येई.

मग त्यामध्ये म्यूनिकमधील इस्रायली खेळाडूंच्या हत्या असो वा पॅरिसमधील दक्षिणात्य वर्तमानपत्रांच्या कार्यालयावर आणि रेडिओ स्टेशनवर हल्ला असो, किंवा हेगमध्ये फ्रेंच दूतावासावर हल्ला करून ते काबीज करणे असो, असे अनेक मोठे मोठे हल्ले केले.

१९७४ मध्ये फ्रान्सच्या राजधानीमध्ये स्थित एका शॉपिंग सेंटरवर त्याने ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये दोन लोक मारले गेले होते आणि इतर ३४ लोक जखमी झाले होते.

पण जेव्हा कार्लोसने व्हिएनामध्ये तेलाचे उत्पादन करणाऱ्या अर्थात ओपेक देशांच्या एकावेळी ३२ मंत्र्यांचे अपहरण केले, तेव्हा त्याचे नावाची आणि या घटनेची खळबळ जगभरात झाली. २१ डिसेंबर १९७५ रोजी सकाळी कार्लोसने ओपेकच्या मुख्यालयात हत्यारांसह प्रवेश केला. सकाळपासूनच वर्दळ असल्यामुळे तपासणी झाली नाही.

आत गेल्यानंतर तिथल्या मुख्य सभागृहात चालू असलेल्या बैठकीत शिरला आणि बंदुकीचा धाक दाखवत तिथल्या सौदी अरेबिया, इराण आदी विविध देशांच्या जवळपास ३२ मंत्री आणि त्यांच्या सहयोगींना बंदी बनवले. आणि ऑस्ट्रिया सरकारकडून विमानाची मागणी केली.

कार्लोसचे मुख्य टार्गेट हे सौदी अरेबियाचे मंत्री शेख यमनी होते. पण त्यानं सगळ्यांचं अपहरण केले आणि ऑस्ट्रिया सरकारने दिलेल्या विमानाने अल्जेरियाला घेवून गेला. पुढे अल्जेरियामध्ये यमनी आणि इराणचे गृहमंत्री अमूज़ेगर यांना विमानातच बसवून बाकीच्या ३० मंत्र्यांना सोडून दिले.

पुढे एका मुलाखतीमध्ये कार्लोसने सांगितले

“मी या दोघांना मारणारच होतो पण अल्जेरिया सरकारने मला ५ कोटी डॉलर दिले आणि जिवंत सोडण्याची गळ घातली. त्यामुळे हे दोन मंत्री वाचले”

१९८२मध्ये पॅरिस आणि टुलुजमध्ये धावणाऱ्या रेल्वेतील बॉम्ब हल्ल्यामध्ये पाच लोक मारले गेले होते आणि २८ लोक जखमी झाले होते. या घटनेमध्ये देखील कार्लोस द जॅकलचे नाव जोडलेले होते. एका महिन्यानंतरच त्याने पॅरिसमधीर सिरीया विरोधी वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. यात जवळपास ६० जण मृत्युमुखी पडले होते.

याव्यतिरिक्त १९८३ मध्ये मार्स आणि पॅरिसच्या दरम्यान एका रेल्वेमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. यामध्ये तीन लोक मारले गेले होते आणि १३ लोक जखमी झाले होते. तसेच, मार्शल स्टेशनवर झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये देखील दोन लोकांचा जीव गेला होता. या घटनांमध्ये देखील कार्लोसचाच हात होता.

पॅरिस आणि मार्समध्ये १९८२ आणि १९८३ मध्ये चार बॉम्ब हल्ले झाले होते आणि यामध्ये कार्लोस दोषी असल्याचे समोर आले होते. या हल्ल्यांमध्ये ११ लोक मारले गेले होते आणि १५० लोक जखमी झाले होते.

स्वतःला ‘पेशेवर क्रांतिकारी’ म्हणवणाऱ्या कार्लोस द जॅकलचा उपद्रव चालूच असताना अखेरीस १९९४ मध्ये सूडानमध्ये अटक करण्यात यश मिळाले. त्याला अटक करुन फ्रान्सला घेऊन जाण्यात आले. तिथल्या न्यायालयांनी त्याला अशा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी ठरवले आहे. त्यावेळी त्याला पहिल्यांदा आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली.

त्यानंतर २०११ मध्ये देखील कार्लोसला दोषी ठरवण्यात आले आणि आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली. पुन्हा तीन वर्षापुर्वी म्हणजे २०१३ मध्ये त्याला तिसरी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. म्हणजेच नियमांनुसार कार्लोसला मरेपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार ते देखील तीनदा. आता हे कसं शक्यय ते न्यायालयाला आणि त्या कार्लोसलाच माहित.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.