दाऊद माफीया डॉन होऊ शकला ते “खालिद पहिलवान” याच्यामुळेच

१९७० चा काळ होता. मुंबईत माफिया नावाचा प्रकार नव्याने रुजू पाहत होता. पण अगदीच छोट्या प्रमाणावर. छोट्या-छोट्या गल्ल्या, तिथली हुकूमत, स्मगलींग आणि इतर काळ्या कामांचे बिझनेस हे असं सगळं छोट्या प्रमाणावर होत.

पण अशाच छोट्या गल्लीमध्ये एक मोठा माफिया तयार होत होता.

आशियामधील सगळ्यात मोठा आणि मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच ठिकाणी तयार झाला. भारतासाठी दाऊद हा त्याच्या बेकायदेशीर कृत्ये आणि दहशतवादी कारवायांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबईतील डोंगरी ही माफियांचा परिसर म्हणून नावारुपास येत होतं. सोबतच पायधुनी, जे.जे. बाजार, उमरखडी हा परिसर देखली. कमी जागेत जास्त घरं असलेली दाटीवाटीची वस्ती, अस्वच्छता, भौतिक सुविधांचा आभाव अशा डोंगरीच्या वस्तीत अंडरवर्ल्डचे अनेक नामचिन भाई तयार झाले.

यात दाऊद इब्राहिम सोबतच तेली मोहल्लाचा बाशु दादा, खांदा मोहल्लाचा हसू महाराज, सिद्धी मोहल्लाचा करीम सिध्दी हे होते.

करीम सिद्धी हा युगांडाचे तत्कालीन हुकूमशहा इदी अमीन यांच्या सारखा दिसत होता. पोलिसही नावाने त्याला ओळखायचे. त्यामुळे तो ही तसाच दिसण्याचा आणि वावरण्याचा वारंवार प्रयत्न करायचा. दर शुक्रवारी जुम्मा नंतर काळ्या रंगासारखा सैनिकी गणवेश घालून एका व्यासपीठावर उभं राहून समुदायातील लोकांना ज्वलंत भाषणे द्यायचा.

जोपर्यंत करीम सिद्धी जिवंत होता तोपर्यंत कोणताही गुंड, माफिया डॉन किंवा पोलिसांनी त्याच्या समोर हत्यार उपसण्याच धाडस केलं नव्हत. मुंबईच्या या इदी अमीनने आपल्या छोट्या-छोट्या वस्त्यांवर एकहाती राज्य केले.

त्यादरम्यान अब्दुल रहीम खान आणि अब्दुल करीम खान (करीम लाला) हे भाऊ दक्षिण जेल रोड आणि ग्रँट रोड भागात राज्य करत होते.

त्यानंतर शाहिद हा अरब गल्लीचा होता. तो कामठीपुरातील रेड लाईट एरिया आणि फोरस रोड आणि प्लेहाउसच्या भागात राज्य करायचा. तो एक वेश्या व्यवसायाचा दलाल ही होता. त्या दरम्यान झंजीर आणि बॉबी सारख्या ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपटांसाठी प्रेक्षक तुफान गर्दी करु लागले.

शाहिदने ही संधी ओळखली आणि त्याने तिकीट ब्लॅक करायला सुरुवात केली. मुंबईतील ताज टॉकीज, शालीमार, निषाद, सुपर टॉकीज आणि रॉयल टॉकीज सिनेमांगृहांमध्ये तिकीट ब्लॅक करुन शाहिदने बरेच पैसे कमावले, परंतु त्याच वेळी यामुळे उमर संतापला.

त्याच्या एरियामध्ये येवून कोणीतरी पैसे कमवू जात होत. पण इथे करीम लालाने मध्यस्थी केली. एकुणच करीम लाला हा त्याच्या भागात दादा होता आणि त्याशिवाय वरदराजन मुदियार आणि हाजी मस्तान सारख्यांना ही तो जोडून होता.

वरदराजन मुदालियार याची दारूच्या व्यवसायावय मक्तेदारी होती. धारावी ते डहाणू आणि मध्य रेल्वे मार्गावर डोंबिवलीपर्यंत दारू विक्री करण्याचा अधिकार सर्वस्वी त्याचा होता.”

अशा प्रकारे प्रत्येक जण विशिष्ट माफिया गटाशी संबंधित होता.

पण वीस वर्षाच्या दाऊदने या कामांना नकार देत वेगळ्याच कामात शिरला.

दाऊदने वयाच्या १४ व्या वर्षी पहिला गुन्हा केला. १९७४ साली त्याने एका बँकेत चोरी केली होती. चोरी करीत असताना दाऊदला वाटले की तो मस्तानचा पैसा लुटत आहे, परंतु नंतर ही रोकड मेट्रोपॉलिटन बँकेची असल्याचे त्याच्या लक्षात आले. आणि इथूनच त्याची गुन्हेगारी लाईनची सुरुवात झाली.

त्याच काळात पोलिस व्हायचे म्हणून मध्यप्रदेशमधून खालिद पहलवान मुंबईत दाखल झाला. तो डोंगरीपासून लांब मुंबई सेंट्रलमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. पण नंतर तिकडे काही न झाल्यामुळे छोटे-मोठे उद्योग करु लागला. आणि तो एक दिवस सुप्रसिद्ध सोन्याचा तस्कर म्हणून ओळखला जावू लागला.

पुढे तब्येतीमुळे आणि आपल्याला तस्करीसाठी अडचण येवू नये म्हणून डोंगरीच्या बाशु दादा चा बॉडीगार्ड म्हणून काम करु लागला. पण दाऊदने जेव्हा बाशु दादाची गँग संपवली तेव्हा त्याने खालिदला हात पुढे केला व एकत्र काम करण्याचा प्रस्ताव दिला. आणि खालिदने तो स्विकारला देखील.

दाऊदने खालिदला आपला गुरु मानले आणि इथेच डी – कंपनीची सुरुवात झाली.

जे. डे. आपल्या ‘खल्लास’ या पुस्तकात लिहीतात, दाऊदला त्याच्या नावाने हाक मारणारी खूप कमी जण होते. त्यातीलच एक होता, खालिद होता. दाऊद डोक्याने हुशार होता तर खालिद ताकदीने मजबूत आणि धष्ट-पुष्ट होता. पुढे खालिदने डी-कंपनीच्या विरोधी गँग असलेल्या पठाण गँगमधील अनेकांना मारलं आणि ती गँग जवळपास संपवली. आणि मुंबईत डी-कंपनीचा पाया मजबूत केला.

खालिद हा समुद्रामार्गे सोन्याची आणि इतर गोष्टींची तस्करी करत होता. लोकल पातळीवर अडचण येवू नये म्हणून यातुनच रायगड, अलिबाग आणि मुंबई इथल्या अनेक मराठी मुलांना काम आणि पैश्यांच्या आमिष दाखवून तस्करी कामाला लावलं.

खालिदने दाऊदला मोठी मोठी स्वप्न दाखवायला सुरुवात केली. त्यासोबत इकडे दाऊद मुंबईवर आपली पकड मजबूत बनवत होता.

दाऊद, खालिद यांचा स्मगलिंग कारभार गुजरातपर्यंत पसरला होता. त्याचा काही माल गुजरातच्या बंदरावरून आणला जायचा. त्यामुळे गुजरातचा स्थानिक डॉन इस्माइल खानने दाऊदच्या गाडीवर गोळीबार केला होता, परंतु दाऊद त्यातूनही बचावला.

गुजरात पोलिसांना हल्ल्याची खबर लागताच दाऊदला ताब्यात घेतले गेले. पण ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे दाऊदच्या मदतीला धावून गेले होते. गुजरात हायकोर्टात अपील करून दाऊदला त्यांनी सोडवून आणलं होतं.

१२ फेब्रुवारीच्या रात्री साबिरला मारल्यानंतर पठाण गँग जेव्हा दाऊदला मारण्यासाठी त्याच्या घरी येत होती तेव्हा खालिदने लांबूनच येणाऱ्या पठाण गँगच्या गाडीला ओळखले आणि गेटमधूनच अंदाधूंद गोळीबार केला न् दाऊदला त्या घटनेतुन वाचवलं.

इथेच खालिदला गोळी पण लागली. जर त्यावेळी खालिदने एका सेकंदाचा जरी उशिर लावला असता तरी दाऊद त्यादिवशी वाचला नसता.

एकदा नागपाडा पोलिस स्टेशनमधून बाहेर पडताना दाऊदवर होणारा गोळीबार त्यांने क्षणात ओळखला होता आणि त्याला वाचवलं होतं. जैदी दाऊद मेंटर: द मॅन हू मेड इंडियाज बिग्गेस्ट डॉन या पुस्तकात पुढे लिहीतात की,

दाऊद इब्राहिमच्या आयुष्यात जर खालिद खान नावाची व्यक्ती नसती तर तो फार पूर्वीच गँगवॉर किंवा पोलिसांच्या शुटआऊटमध्ये मारला गेला असता. पण खालिदने दाऊदला प्रत्येक अडचणीपासून दूर ठेवले. खालिदने अनेकदा दाऊद उपकार केले.

हळू हळू खालिदने सोन्याऐवजी हिऱ्याची तस्करी सुरु केली. सोन्यापेक्षा हिरे तस्करी करणे अधिक फायदेशीर आणि सोपे होते. विमानांतुन सोनं नेणं रिस्की होत. पण विमानतळांवरून हिरे तस्करी सहज करता येईल असं त्यांनी ताडलं. कित्येक लाखांचे हिरे सहजपणे खिशात ठेवता येतात किंवा ते अंडरवियरमध्ये लपलेले किंवा इतर सामानांमध्येही लपवले जावू शकतात.

शिवाय हिऱ्याला २०० टक्क्यांपेक्षा जास्त मार्जिन होतं. आणि मुंबईतील ओपेरा हाऊस, झवेरी बाजारात किंवा सुरत अहमदाबाद हिरा बाजारात सहज विकता यायचे.

पण कालांतराने खालिद विरोधात दाऊदचे कान भरण्यास सुरुवात झाली. खालिद एक मोठा तस्कर बनू पाहत असल्याच दाऊदला सांगण्यात आलं. यातुनच त्याने खालिदपासून अंतर राखण्यास सुरुवात केली.

एक दिवस दाऊदने जेनाबाई दारुवाली (हिला दाऊद मावशी मानायचा) सोबत घेवून खालिदच्या मालाची टिप पोलिसांना दिली आणि माल पकडला गेला.

खालिदला ही आता कळून चुकलं होत की आता वेगळ होण्याची वेळ आली आहे. पुढे १९८८ ला दाऊदने भारत सोडला आणि त्याच्याच आसपास खालिदनेही. सध्या वय झालेला खालिद लंडन मध्ये असल्याचे सांगण्यात येते तर दाऊद पाकिस्तानमध्ये.

हे ही वाच भि़डू 

Leave A Reply

Your email address will not be published.