लुना येण्याआधी घाटग्यांची लक्ष्मी म्हाताऱ्या माणसांचा आधार होती

आजकाल छोट्याशा स्कुटीपासून ते हार्ले डेव्हिडसन पर्यंत प्रत्येक गाडी आपल्या भारतीय रस्त्यांवर पळताना दिसत असते. गाड्या घेणे म्हणजे खूप काही कौतुकाची गोष्ट नाही. तरी आज फिटनेसच्या दृष्टीने देश  सायकलींकडे वळू लागला आहे.

जगाची चक्रे पुन्हा उलटी फिरू लागली आहेत असं म्हणतात. पण एक काळ होता जेव्हा फिटनेस वगैरे नखऱ्यासाठी नाही तर गरज म्हणून सायकल वापरली जायची. निम्मा भारत देश सायकलवर फिरायचा. मोटरसायकल म्हणजे मोठी चैन असायची. स्कुटर वगैरे गाड्या मिळवायच्या झाल्या तर वर्षानुवर्षे आधी बुकिंग करून ठेवायला लागायचं.

त्याकाळात एक गाडी आली होती जी भारताला सायकलवरून स्कुटरकडे नेतानाचा एक टप्पा मानली गेली.

तिचं नाव लक्ष्मी ४८

या लक्ष्मीला बनबलं होतं कोल्हापूरच्या वसंतराव घाटगे यांनी.

मूळच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या हसूरचंपूची घाटगे फॅमिली. वसंतराव सर्वात धाकटे. मुळातच हुशार. कॉलेजला शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, बॉटनीमधून पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतली, परत कोल्हापुरात येऊन राजाराम कॉलेजमध्ये मास्तरकीची नोकरी सुरु केली.

साधारण चाळीसच्या दशकातला हा काळ. वसंतराव घाटगे मृदू स्वभावाचे होते, कॉलेजमध्ये  आपण भलं आपलं काम भलं. त्यांचा मित्र परिवार मात्र मोठा होता. एकदा साध्या खोकल्याचंनिमित्त झालं आणि टीबीच्या रोगाने त्यांना ग्रासलं. बोलताना खोकल्याची मोठी उबळ यायची. शिकवण्यासाठी सलग बोलतच राहावं लागायचं.

अखेर वसंतराव घाटगेंनी नोकरीचा राजीनामा दिला.

राजीनामा तर दिला पण करायचं काय हा मुख्य प्रश्न वसंतरावांपुढे होता. 

वसंतराव घाटगेंचा मोठा भाऊ सिव्हिल इंजिनियर होता. तेव्हा त्याला कोल्हापूरचे विमानतळ उभारण्याचे काँट्रॅकट मिळाले. बांधकामाच्या कामासाठी लागणारे वाळू, खडी,सळी इतर गोष्टीच्या वाहतुकीसाठी त्यांना  २ ट्रक लागणार होते. एक ट्रक त्यांचा स्वतःचा होता. पण दुसरा ट्रक कुठे मिळणार याच्या शोधात होते. तेव्हा वसंतरावांना आपल्या एका मित्राचा ट्रक आहे हे आठवलं.

जयकुमार पाटील हे त्यांचं नाव. त्यांचा ट्रक कोल्हापूर मुंबई ट्रिपा मारून मालाची ने आण करायचा. कधी कधी जयकुमार पाटील हे स्वतः तो ट्रक चालवायचे. वसंतरावांच्या विनंतीनुसार त्यांनी विमानतळाच्या कामासाठी आपला ट्रक पाठवून दिला.

काम संपलं पण वसंतराव आणि जयकुमार या दोघांनी आपली पार्टनरशिप तशीच पुढं कंटिन्यू करायचं ठरवलं. या दोन ट्रकच्या साथीने घाटगे पाटील ट्रान्सपोर्टचा जन्म झाला. ते सालं होतं १९४३.

1280px Vasantrao Ghatge with her friend and then business partner Mr. Jaykumar Patil

दुसऱ्या महायुद्धाचा काळ. देशभर अनेक वस्तूंचा तुटवडा होता. सुरवातीला छोटी मोठी वस्तू ने आण करणाऱ्या घाटगे पाटील ट्रान्सपोर्टला राजाराम रायफल्सचा काँट्रॅक्ट मिळालं आणि तिथून त्यांचा वैभवाचा काळ सुरु झाला. सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करत असलेल्या घाटगे पाटलांचं फक्त कोल्हापूरचं नाही तर कोल्हापूरच्या बाहेर देखील नाव झालं.

दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वत्र रस्ते बांधणी व इतर कामे चालत होती. वसंतराव घाटगेंनी निरीक्षण केलं की या काळात गाड्यांचे स्पेअरपार्टस खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे पण कोल्हापुरात चांगले स्पेअरपार्ट मिळायचे नाहीत. आपल्या ट्रक साठी लागणारे स्पेअरपार्ट मुंबईतून ते खरेदी करत तेव्हा त्यांनी जादाचे स्पेअरपार्टस आणून कोल्हापुरात त्याची विक्री सुरु केली.

यात प्रचंड फायदा झाला. पुढे ट्रकची बॉडी बनवण्याचंही काम सुरु केलं. कोल्हापुरातील पोलिसांची व्हॅन त्यांनी बांधली होती.

स्पेअरपार्ट विकता विकता त्यांनी ट्रक विक्रीची एजन्सी देखील घेतली. मॉरिस मोटर्स, जनरल मोटर्स या मोठमोठ्या कंपन्यांचे ट्रक ते विकू लागले.  हात लावेल त्याच सोने करणाऱ्या घाटगे पाटलांनी यातही प्रचंड यश मिळवलं.     

रेलिग सायकल पासून ते फर्ग्युसन ट्रॅक्टरपर्यंत अनेक गाड्यांचे डिलरशिप त्यांच्या कडे होते. वाहतुकीशी निगडित प्रत्येक गोष्टीत घाटगे पाटील होते. त्यांनी फौंड्री उद्योगातहि उडी घेतली होती.

आता फक्त एकच गोष्ट उरली होती, स्वतःचा गाडी बनवण्याचा कारखाना.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरू सरकारने प्रत्येक गोष्ट आपल्या देशात बनवायची असं धोरण आखलं होतं. देशातल्या मध्यमवर्गाला परवडेल अशा स्कुटरची निर्मिती करायची म्हणून इटलीच्या इनोसेंटीशी करार केला. या इनोसेंटीने त्यांच्या तीन गाड्यांपैकी दोन गाड्यांचे लायसन्स भारत सरकारला दिले.

पन्नासच्या दशकात एम ए चिदंबरम यांनी स्थापन केलेल्या ऑटोमोबाईल प्रोडक्ट्स ऑफ इंडिया या कंपनीने लॅम्ब्रेटा हि भारतातली पहिली स्कूटर बनवली. अगदी काही काळातच ती तुफान गाजली. लोक स्कुटर घेण्यासाठी नम्बर लावू लागले. पुण्याचे बजाज देखील वेस्पा बरोबर करार करून स्कुटर बनवण्याच्या क्षेत्रात उतरले.

या लॅम्ब्रेटा स्कुटरचे देखील डिलरशिप घाटगे पाटील यांच्याकडेच होते.

या गाड्यांचे वितरण करत असताना वसंतराव घाटगेंच्या डोक्यात कल्पना आली की इनोसेंटीचे जे तिसरे मॉडेल आहे टायची निर्मिती आपण का करू नये? किर्लोस्कर ग्रुपचे शांतूनराव किर्लोस्कर यांनी या कल्पनाला पाठिंबा दिला आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.

वसंतराव घाटगेंनी ४८ सीसी लॅम्ब्रेटा स्कुटरेटच लायसन्स मिळवलं.

किर्लोस्करांच्या मदतीने  कोल्हापूर जवळच्या उचगाव येथे कारखाना देखील उभा राहिला. याला नाव देण्यात आले Kirloskar Ghatge Patil Auto Ltd. किर्लोस्कर किसान ऑइल कंपनी त्यांना इंजिन बनवून देणार होती तर ओगले ब्रदर्सनी बॉडी,फ्युएल टॅंक, फ्रंट आणि रियर चाकाच्या फोर्कची असेम्ब्ली करून दिली.

४८ सीसी लॅम्ब्रेटा स्कुटरेट ही गाडी म्हणजे सायकल आणि मोटारसायकल या दोन्हीच्या मधला टप्पा. अगदी छोट्या गावातील मुलींना देखील वापरता येईल अशी ही सुटसुटीत कमी वजनाची मोपेड. टू स्ट्रोक इंजिन, ७० किमी एवढं चांगली मायलेज असणारी गाडी. वेळ प्रसंगी सेल्फ स्टार्ट साठी पायडल मारण्याची देखील सोय दिली होती.

वसंतराव घाटगेंनी कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद म्हणून या गाडीला लक्ष्मी हे नाव दिले. १९७२ साली ही गाडी मार्केटमध्ये उतरली.  

220px

लक्ष्मी ४८ या नावाने ही गाडी फेमस झाली. कॉलेजला जाणाऱ्या तरुणांना तर ती आवडलीच. पण  सायकलीवर बसून आयुष्य काढलेल्या आणि घरच्यांनी किती जरी सांगितलं तरी रोज शेताची फेरी न चुकवणाऱ्या म्हाताऱ्या आज्जाला देखील जरा आराम मिळावा म्हणून त्यांना झेपणारी लक्ष्मी गाडी घेऊन दिली जाऊ लागली.

काही काळातच लक्ष्मी हिट झाली. अनेक छोट्या छोट्या खेडेगावातही लक्ष्मी जाऊन पोहचली. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिण भारतात अनेक ठिकाणी लक्ष्मीची हवा होती. 

पण लक्ष्मीला काही मर्यादा होत्या. या गाडीवर खूप सामान मावायचं नाही. तरुणांना कॉलेजमध्ये बुंगाट पळवायची इच्छा देखील लक्ष्मी पूर्ण करायची नाही. सायकलच्या वेगात साधी सरळ सोपी असलेली लक्ष्मी नाकासमोर चालणारी गाडी होती.

पुढे फिरोदियांनी आणलेली लुना, बजाजची एम-५० या गाड्यांनी लक्ष्मीचं मार्केट खाऊन टाकलं. या गाड्यांचा मेंन्टेन्स देखील खूप कमी होता. या गाड्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये लक्ष्मीचा स्पीड कमी पडला. वसंतराव घाटगेंच्या मृत्यू नंतर चार वर्षांनी १९९० साली घाटगे पाटील यांनी लक्ष्मीचं प्रोडक्शन थांबवलं आणि कारखाना बंद केला.

आजही अनेक जण आपली पहिली गाडी म्हणून लक्ष्मी जपून ठेवताना दिसतात. भारतातील व्हिंटेज गाड्यांच्या चर्चेत लक्ष्मीचं नाव आवर्जून घेतलं जातं. आज जर ही गाडी रस्त्यावर दिसली तर आपल्याला गंमत वाटेल पण लक्ष्मीने एक काळ गाजवला हे नक्की.

 हे ही वाच भिडू.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.