बजाज चेतक बाप असेल तर “लॅम्ब्रेटा” आज्जा होती आज्जा !

आपल्या लहानपणी सगळ ठरलेलं असायचं. समस्त कामगारवर्ग सायकलवर, दुधवाले गवळी राजदूतवर यायचे, गावचा पाटील फटफटी बुलेटवर दिसायचा. पाटलाची कॉलेजला जाणारी पोर हिरो होंडा, यामा, जावावर जायची. तर

बाकी मिडलक्लास प्रांत बजाज वर दिसायचा. त्यातही स्कूटर.

या मिडल क्लासमध्ये सुद्धा एक हायर मिडलक्लास म्हणून प्रकार असतो. म्हणजे काय सरकारी कर्मचारी, शाळेत हेडमास्तर, एमबीबीएस झालेले डॉक्टर, नुकताच निवडणूक जिंकलेले नगरसेवक वगैरे वगैरे. यांच्या जवळ असायची “लॅम्ब्रेटा”

लॅम्ब्रेटा मुळची इटलीची. खरं बजाज चेतक सुद्धा ज्या व्हेस्पा वरून तयार झाली ती सुद्धा इटलीचीच.

त्यामुळे इटलीला स्कूटरच माहेरघर म्हटल तरी चुकीच ठरणार नाही.

मिलानमध्ये फर्डीनांडो इनोसेंटी नावाचा एक उद्योजक होता. त्याची स्टील ट्युबींगची फक्टरी होती. जवळपास ६००० लोक तिथे काम करत होते. पण अचानक दुसरे महायुद्ध सुरु झाले. हिटलरच्या गटात असलेल्या इटलीचा दोस्त राष्ट्रांनी प्रचंड मोठा पराभव केला.

अख्खा देश बेचिराख झाला.

इनोसेंटी जेव्हा युद्धानंतर आपल्या कारखान्याकडे आला तर त्याला दिसल की तिथे फक्त राखेचे ढिगारे उरले आहेत. बॉम्बहल्ल्यात संपूर्ण कारखाना उध्वस्त झाला होता. नुकसान प्रचंड झाल म्हणून दुसरा एखादा डोकं धरून बसला असता.

पण गडी मोठा हिंमतीचा होता आणि डोकेबाज पण !

त्याने याच राखेतून नवीन कारखाना उभारायचं ठरवल. इटलीची इकोनॉमी संपूर्ण ढासळली होती. लोकांकडे पैसा नव्हता. सरकारकडे पैसा नव्हता. इनोसेंटीला लक्षात आले की येत्या काळात कोणी कार घेणार नाही. शिवाय गव्हर्नमेंटकडे देखील पब्लिक ट्रान्सपोर्ट उभी करण्यासाठी निधी असणार नाही.  येत्या काळाची गरज स्कूटर आहे !

इनोसेंटीने स्कूटर बनवण्यास सुरवात केली. नाव दिले “लॅम्ब्रेटा” तिथल्या नदीवरून हे नाव देण्यात आलं होतं. 

साधारण याच कन्सेप्टवर वेस्पा पण बनण्यास सुरवात झाली. दोन्हीचा डिझायनर इंजिनियर एकच होता. पण इनोसेंटीबरोबर भांडण झाल्यामुळे हा इंजिनियर वेस्पा कडे गेला व त्यांची स्कूटर तयार केली.

महायुद्धानंतर निम्मी जर्मनी अमेरिकेच्या तर निम्मी जर्मनी रशियाच्या ताब्यात गेली होती. या दोन्ही देशांमध्ये पण वैर होतं.  अमेरिकन सैन्याला जर्मनी गस्त घालण्यासाठी एका दुचाकी वाहनाची गरज होती. त्यांनी इनोसेंटीला मोठी ऑर्डर दिली.

युरोपपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत संपर्ण जगभरात लॅम्ब्रेटा धावू लागली.

साधारण याच काळात भारत इंग्रजांपासून स्वतंत्र झाला होता. ज्या कारणामुळे इनोसेंटीने इटलीत स्कूटर तयार केली तेच कारण भारतात देखील स्कूटरच्या उदयास कारणीभूत ठरले. आपली लोकसंख्या अफाट होती. लोकांना फिरायला वाहन उपलब्ध करणे देशाची गरज होती.

पंडीत नेहरूं च्या सरकारने इनोसेंटीशी करार केला. पन्नासच्या दशकात भारतात ऑटोमोबाईल प्रोडक्ट्स ऑफ इंडिया या सरकारी कंपनीने भारतातली पहिली स्कूटर बनवली. ४८ सीसी टू स्ट्रोक इंजिन असलेलं हे पहिल मॉडेल होत.

इटलीच्या लॅम्ब्रो नदीच नाव असलेली स्कूटर गंगाकिनारी दिसू लागली.

या स्कूटरने अगदी सुरवातीपासून भन्नाट वेग पकडला. त्याकाळी हिची किंमत फक्त उच्च मध्यमवर्गीयांना परवडत होती. तरी ही लॅम्ब्रेटाच्या खरेदी साठी रांगा लागत होत्या. तीच सक्सेस बघून पुण्यात बजाज वाल्यांनी देखील स्कूटर बनवायचं ठरवलं.

लॅम्ब्रेटाच्या रायव्हल कंपनीबरोबर म्हणजे वेस्पा बरोबर करार केला व बुलंद भारत की बुलंद तसबीर बजाज चेतक आली.

पण कोणी काहीही म्हणो लॅम्ब्रेटा चेतकचीही बाप होती.

सत्तरच्या दशकात या दोन्ही स्कूटरनी भारतात राज्य केलं. लॅम्ब्रेटा दिसायला थोडी मोठी थोडी जास्त स्टायलिश वाटायची. आजही अनेक जण जुन्या आठवणी सांगतात. कस शम्मी कपूर आपल्या पिक्चरमध्ये लॅम्ब्रेटावरून पोरी पटवायचा, कसं एयरटेलचे सुनील मित्तल दिल्लीत एकेकाळी लॅम्ब्रेटावरून लजपतनगर मार्केटला जायचे.

अगदी साताऱ्यात सुद्धा छत्रपती अभयसिंह राजे हे आपल्या जनतेला लॅम्ब्रेटावरून भेटत असत हे आवर्जून सांगितल जात.

एका वेळी चार,पाच जणांचा संसार सहज वाहू शकणारी लॅम्ब्रेटा स्कूटर मध्यमवर्गीयांचं स्वप्न असायचं. तिच्या बुकिंगसाठी नम्बर लागायचे. १९८० साली तब्बल ३५ हजार स्कूटर खपल्या होत्या.

पण याच काळात युरोपमध्ये अर्थव्यवस्था सुधारली. लोकांनी स्कूटरपेक्षा छोटी कार घेण्यास सुरवात केली. लॅम्ब्रेटाला आपलं तिथलं प्रोडक्शन बंद कराव लागल. पण भारतात तिचा धडाका जोरात होता.

पण ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात देखील लॅम्ब्रेटाचे वाईट दिवस सुरु झाले.

सरकारी कंपनी असल्यामुळे नोकरशाहीची खास काम करण्याची पद्धत, बजाजचे आक्रमक मार्केटिंग, बाजारात येणाऱ्या जापनीज गाड्या यामुळे लॅम्ब्रेटा हळूहळू नामशेष होत गेली.

काही वर्षांपूर्वी हिचे इलेक्ट्रिक मॉडेल येणार म्हणून चर्चा सुरु झाली. २०१८ साली मिलानमध्ये तिचे अनावरण देखील झाले. येत्या वर्षभरात ती भारतीय रस्त्यांवर देखील धावेल म्हणतात. बघू हा स्कूटरचा आज्जा वीस वर्षांनी पुन्हा कसा दिसतोय ते.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.