आज तर माहिती करून घ्या, डुक्कर गाडी कोणत्या कंपनीची होती ?

आपल्या पैकी प्रत्येकाने ही गाडी जुन्या पिक्चरमध्ये पाहिली असेल. अनेकांनी तिला प्रत्यक्षात सुद्धा पाहिलं असेल. छोटा ट्रक आणि रिक्षा यांच्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या प्रमाणे दिसणारी गाडी.

तिच्या दिसण्यावरून तिला डुक्कर गाडी म्हणतात.

या गाडीचं खरं नाव टेम्पो हॅनसिट. साधारण १९३० सालच्या दरम्यान जर्मनीच्या ऑस्कर विदाल यांनी आपल्या टेम्पो कंपनीमध्ये या गाडीची निर्मिती केली. मोटारसायकलला आणखी दोन चाके जोडून मालवाहू छोट्या गाडीची निर्मिती केली यातूनच या गाडीचा जन्म झाला.

सुरवातीला सिंगल सिलिंडर किंवा डबल सिलिंडर टू स्ट्रोक ४०० सीसी असलेली ही तीन चाकी गाडी जर्मनीमध्ये प्रचंड फेमस झाली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टेम्पोला लष्करी गाड्यांची बरीच कामे मिळाली प्रचंड पैसा कमावता आला.

हॅनसिट सुद्धा यात मागे नव्हती. युद्धक्षेत्रात छोटी ऍम्ब्युलन्स म्हणून देखील तिचा वापर झाला.

टेम्पोची ती फ्लॅगशिप गाडी म्हणून फेमस होती.

पण महायुद्ध संपले आणि जर्मनीचा मोठा पराभव झाला. या पराभवातुन आलेल्या आर्थिक संकटात हात दिला या डुक्कर गाडीने.

माल वाहतूक करत होतेच पण त्यात थोडेसे बदल करून ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा वापरलं जाऊ लागलं. कमी खर्चात कमी डिझेल खाऊन चांगलं मायलेज देणारी टेम्पो हॅनसिट संपूर्ण युरोप मध्ये गाजली.

फक्त युरोपातच नाही तर आशियातल्या विकसनशील देशांमध्ये देखील याची मागणी जोरात होती.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यलढ्यातील दोन सुप्रसिद्ध घराणी बजाज आणि फिरोदिया यांनी एकत्र येऊन पुण्यात गाड्या बनवण्याचा कारखाना सुरू केला.

यात फिरोदियानी टेम्पो हॅनसिटबरोबर करार करून ही तीन चाकी गाडी भारतात बनवायचा परवाना मिळवला.

मुंबईत १९५८ साली गोरेगाव येथे टेम्पो हॅनसिट बनवण्याचा कारखाना सुरू केला गेला.

भारतात सुद्धा हॅनसिट तितकीच फेमस झाली. याच गाडीवरून कल्पना घेऊन नवलमल फिरोदिया यांनी रिक्षाची निर्मिती केली होती. रिक्षा आणि आणि हॅनसिटमध्ये फरक हा होता की रिक्षाला स्कुटरप्रमाणे हँडल असते तर हॅनसिटला स्टिअरिंग असते.

हॅनसिटचे गियर हा वेगळाच संशोधनाचा विषय.

समोर स्टिअरिंग शेजारी दोरी गिअर लोम्बकळत ठेवलेले असायच. त्याला बाहेर ओढून h च्या आकारात गियर टाकलं जायचं.

फक्त १ लिटर डिझेलमध्ये २५ किमी दौडणारी शून्य मेंटेनन्स लागणारी डुक्कर गाडी संपूर्ण भारतात विशेषतः पंजाब, युपी, बिहार, राजस्थान, एमपी या काऊ बेल्ट मध्ये फेेमस झाली.

मान मोडून काम करणारी डुक्कर गाडी दिसायला कशी ही असली तरी सगळ्यांची लाडकी होती.

भारतीय जुगाडू लोकांनी या डुक्कर गाडीमध्ये हजारो बदल केले. तिला दुल्हन प्रमाणे सजवलं. आजकाल लोक शौक म्हणून आपआपल्या अत्याधुनिक कार मॉडीफाय करतात. पण त्याच्याही कित्येक वर्षे अगोदर पासून डुक्कर गाडी शौक नाही तर गरजे पोटी मॉडीफाय होत आलेली आहे.

पुढे टेम्पो आणि फिरोदिया यांच्या फोर्स मोटर्स यांनी अनेक गाड्या आणल्या.

यात मॅटेडोर, मिनिडोर, टेम्पो ट्रॅक्स, टेम्पो ट्रॅव्हलर अशा गाड्यांचा समावेश होता. या सगळ्या गाड्या श्रीमंतांच्या नव्हत्या तर कष्टकरी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या होत्या.

अशीच ही डुक्कर गाडी जवळपास पन्नास वर्षे गोरगरीब जनतेला वाहून नेण्याचं काम करत राहिली.

दुसऱ्या महायुद्धानंतर काही वर्षांनी युरोपात हॅनसिटच प्रोडक्शन बंद झालं असेल पण भारतात अगदी दोन हजारच्या दशकापर्यंत फोर्स मोटर्स तर्फे डुक्कर गाड्या बनतच होत्या.

आजही युपी पंजाबच्या ग्रामीण भागात गेलं तर रेल्वेस्टेशनच्या बाहेर सवारीच्या प्रतीक्षेत जुनी खटारा झालेली डुक्कर गाडी उभी असलेली दिसेल.

साधारण वीस पंचवीस यात्रेकरू आपापल्या गावी पोहचवण्याच पुण्य एकाच वेळी करणारी  तीन चाकी हॅनसिट आता काही दिवसांनी मात्र पूर्णपणे नामशेष होईल.

हे ही वाच भिडू.

4 Comments
  1. Santosh kharade says

    I am see this gadi i am 15years old that time

  2. Amod katdare says

    Kalyan madhe hi dukkar gadi hoti

  3. Prapat Dinkar says

    डुक्कर गाडी,han..seat..जर..चांगली..असेल..तर..भारतात..सर्व..खेडेगाव..गाव..शहर..उत्पादन..करण्यास..हरकत..नाही..

  4. विजयदत्त ओक says

    ही डुक्कर गाडी बघितली आहे व प्रवासही केला आहे. शेवटचे आठवते तेंव्हा या गाड्या कल्याण ते उल्हासनगर फेर्या मारायच्या.

Leave A Reply

Your email address will not be published.