आया बहिणींवर हात टाकणाऱ्याला पत्रीसरकार मध्ये एकच शिक्षा होती..

पत्रीसरकार म्हणजेच प्रतिसरकार. प्रचलित शासन व्यवस्था जर कारभार चालवायला नालायक ठरत असेल तर त्याला समांतर चालणारी दुसरी एखादी व्यवस्था अस्तित्वात आली तर त्याला प्रतिसरकार म्हणतात.

सातारा व सांगली जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली १९४२ ते १९४६ ही ४ वर्षे जुलमी ब्रिटिश सरकारच्या विरोधात असे प्रतिसरकार काम करत होते. त्यांनी या भागातून इंग्रजांना घालवून कारभार आपल्या हाती घेतला. सह्याद्रीच्या डोंगराळ भागात लपून शिवरायांचे आधुनिक मावळे ब्रिटिश सत्तेला लढा देत होते.

त्यांनी फक्त इंग्रजच नव्हे तर सावकार, जुलमी जमीनदार, दरोडेखोर यांच्यावर पण जरब बसवली.

गावोगावी न्यायदान करणारी व्यवस्था उभी राहिली.

सासुरवास होणाऱ्या आयाबहिणी पासून जातीय दंगली पर्यंत न्यायनिवडा दिला जाऊ लागला. सरकारी न्यायालये ओस पडली. छोट्या मोठ्या गुन्ह्याला पायावर पत्री मारण्याची शिक्षा दिली जात असे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याला मात्र शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेप्रमाणे एक हात आणि एक पाय तोडण्याची शिक्षा दिली जाऊ लागली. 

भलेभले गावगुंड वठणीवर आले. सातारा भागात गुन्हेगारीचा आकडा एकदम खाली आला. गावोगावचे लोक पत्रीसरकारला दुवा देऊ लागले.

नाना पाटलांना देवदूत म्हटलं जाऊ लागलं होतं. त्यांची तुफान सेना इंग्रज पोलिसांपासून लढताना गावात आली तर त्यांना गावकरी आसरा देऊ लागले. क्रांतिकारकांचा थांगपत्ता  नव्हता. प्रतिसरकारच्या सेनेत स्त्रियांना देखील समान स्थान देण्यात आले होते. क्रांतिवीरांगणा राजमती बिरनाळे, नाना पाटलांच्या सुपुत्री हौसाबाई यांच्याप्रमाणे अनेक महिला या उठावात  होत्या.

पार लंडनच्या संसदेपर्यंत या प्रतिसरकारच्या बातम्या चर्चिल्या जात होत्या. मुंबईत बसलेल्या गव्हर्नरला याविषयी स्पष्टीकरण मागितलं जात होतं.

या सगळ्याचा परिणाम म्हणून इंग्रज पोलीसांनी क्रांतीकारकांना पकडण्याची मोहीम तीव्र केली होती. डीएसपी गिलबर्ट च्या नेतृत्वा खाली पोलिस जंग जंग पछाडत होते पण हे क्रांतिकारक काही नमत नव्हते.

अशातच एकदा सातारला काही पोलिसांनी काशीबाई देशमुख या वीरांगनेला पकडलं. त्यांच्याजवळ प्रतिसरकारची काही गुप्त पत्र व लखोटे होते. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ठाण्यात नेऊन त्यांना जबर मारहाण केली. हे पत्र कोणाला द्यायचं होतं ? प्रतिसरकारची पुढची मोहीम काय असे प्रश्न विचारले गेले.

पण काशीबाईनी तोंड उघडण्यास नकार दिला.

सातारच्या पोलिसांमध्ये एक जामदार होता, जलाल गाजी असे त्याचे नाव. हा गाझी क्रूर होता. त्याला काशीबाईंचे रिमांड घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने काशीबाईंवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या शरीरात तिखट जाळ घातला, मात्र तरीही काशीबाई बदल्या नाहीत. जलाल गाझीने हाल हाल करून काशीबाईंचा जीव घेतला.

हि बातमी कळाल्यावर प्रतिसरकाचे क्रांतिकारक पेटून उठले. गाझीला धडा शिकवण्याची गरज होती. पण नाना पाटलांनी सगळ्यांना सबुरीचा इशारा दिला. पोलिसांनी सातारा शहरात जाळे आखले होते. त्यांना माहित होते जलाल गाझीला शिक्षा करण्यासाठी क्रांतिकारक गावात येणार. नाना पाटलांनी हे काम प्रतिसरकारच्या बाहेरच्या व्यक्तीकडून करून घ्यायचं ठरवलं.

हि मोहीम देण्यात आली डॉ.राम भोसले यांच्याकडे.

राम भोसले हे सुप्रसिद्ध मसाजतपस्वी होते. त्यांचं वैद्यकीय शिक्षण झालं नव्हतं, मात्र त्यांच्या वडिलांनी एकेकाळी एका इंग्रजांचा जीव वाचवला असल्यामुळे त्यांना लहानपणी दवाखान्यात कंपाऊंडरची नोकरी मिळाली होती. तिथून पैसे साठवून ते जर्मनीला गेले व मेडिकल स्कुलला ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न केला.

त्यांना तशी परवानगी मिळाली नाही मग अखेर राम भोसलेंनी जर्मनीमध्ये असलेल्या सुभाषचन्द्र बोस आणि विठ्ठलभाई पटेल यांची मदत घेतली. त्यांनी देखील या मराठी तरुणावर विश्वास टाकत त्याला मसाज कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. भोसले यांनी बर्लिनमध्ये Doctor of Manipulative surgery यात डिप्लोमा मिळवला. काही काळ युरोपमध्ये प्रॅक्टिस केली. तिथे त्यांचं भरपूर नाव झालं. पण मन रमत नसल्यामुळे भोसले भारतात परत आले.

भारतात येण्या पूर्वीच त्यांची प्रचंड लोकप्रियता इथवर पोचली होती.

अनेक इंग्रज अधिकारी त्यांच्याकडून उपचार करून घेत होते. खुद्द महात्मा गांधींना देखील मसाज थेरपी करण्याचा योग त्यांना मिळाला होता. १९४२ चे चले जावं आंदोलन सुरु झालं तेव्हा ते गांधीजींच्या बरोबरच होते. संपूर्ण देश पेटून उठला असताना आपण मागे राहायचं नाही हे त्यांनी मनाशी ठरवलं होतं.

स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्याची वेळ त्यांना लवकरच मिळाली. नाना पाटलांनी डॉ.राम भोसलेंना जलाल गाझीला धडा शिकवण्याचं काम त्यांच्याकडे सोपवल. राम भोसलेंनी हि कामगिरी व्यवस्थित पार पाडली.

त्यांनी जमादार जलाल गाझीला गोळ्या घालून ठार केलं. इंग्रज सरकार हादरलं. ज्या राम भोसलेंच्या कडे ब्रिटिश अधिकारी मसाज थेरपी घेत होते ते असे उलटतील हे कोणालाही वाटलं नव्हतं. राम भोसलेंना पकडण्यासाठी ब्रिटिश पथके मागावर सुटली. पण भोसलेंनी त्यांच्या हातावर तुरी देऊन थेट हिमालय गाठलं होतं. ते तिथेच एका गुहेत अज्ञातवासात अनेक वर्ष राहिले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळणार याची घोषणा झाल्यावर ते परत आले.

स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली पण आजही सातारा सांगलीच्या पट्ट्यात प्रतिसरकारच्या न्यायीपणाचे किस्से सांगितले जातात. आजही कुठे बलात्कार किंवा महिला अत्याचाराची घटना घडली तर नाना पाटलांच्या वाघांचं पत्री सरकार हवं होतं हेच जुनी जाणती माणसं सांगत राहतात.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.