सिंधिया होतील न होतील पण ८० वर्षांपूर्वी MPचा पहिला मुख्यमंत्री एक मराठी माणूस होता.

आज मध्य प्रदेश म्हणून ओळखतो त्याला भाषावार प्रांत रचना होण्यापूर्वी मध्य प्रांत म्हणायचे. मराठी भाषिक विदर्भाचा देखील यातच समावेश होता. हिंदी भाषिकांची या राज्यात संख्या मोठी होती, तरीही या राज्याचा पहिला मुख्यमंत्री एक मराठी माणूस होता.

त्याच नाव डॉ.नारायण भास्कर खरे.

डॉ.खरे यांचा जन्म मूळचा पनवेलचा. त्यांचे वडील भिवंडीमध्ये वकिली करत असत. वडिलांच्या अकाली निधनानंतर नारायण यांचा संभाळ त्यांच्या सावत्र भावाने केला. हाच भाऊ पुढे जाऊन पुरीचे शंकराचार्य बनले.

नारायण खरे यांना लहानपणापासून शाळेत हुशार म्हणून ओळखलं जायचं. १९०२ साली त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून डिग्री पूर्ण केली. त्यांना मध्यप्रदेश मधून डॉक्टरीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तिथे ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. खामगाव येथे असिस्टंट सर्जन म्हणून नेमणूक झाली.

पुढे ते पंजाब विद्यापीठातून पहिले एमडी बनले. याच काळात लोकमान्य टिळकांच्या सभांनी तात्यांच्यावर मनावर परिणाम केला. स्वातंत्र्यलढ्यात उडी घेण्याचा त्यांचा ओढा दिसू  लागला.यातूनच एकदा ब्रिटिश वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद होऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. नागपूर मध्ये खाजगी प्रॅक्टिस करता करता ते राजकारणातही सक्रिय झाले.

१९१८ सालच्या इन्फल्युएंझा साथीमध्ये त्यांनी नागपूरमध्ये प्रचंड काम केलं. यातूनच त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. ते व त्यांच्या प्रमाणे अनेक टिळकांच्यावर प्रेम करणारे तरुण काँग्रेसमध्ये सक्रिय झाले.

पुढे १९२३ साली त्यांनी प्रांतीय कायदे मंडळाची निवडणूक लढवली आणि सलग दोन वेळा निवडूनही आले. १९३० साली गांधीजींच्या सत्याग्रहावेळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास देखील झाला. हरिजन आंदोलनात त्यांनी केलेल्या कामामुळे खुश होऊन खुद्द महात्मा गांधींनी देखील त्यांची पाठ थोपटली होती.

१९३० च्या दशकात गांधीजींची आंदोलने व भारतातील वाढता असंतोष पाहता ब्रिटिशांनी काही प्रमाणात भारतीयांना स्थानिक प्रशासनात सहभागी करून घेण्यास मान्य केलं. १९३६ साली कायदेमंडळाच्या निवडणूका आल्या. काँग्रेसने मध्य प्रांताचं नेतृत्व ना.भा.खरे यांच्याकडे दिलं. अगदी तिकीटे वाटपापासून सगळे अधिकार खरेंच्या कडे होते. फक्त एक उमेदवार बदल्याण्यावरून पटेलांचा आणि खरेंचा वाद झाला व खरेंनी राजीनामा दिला.

तरीही त्यांची समजूत काढण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने हि निवडणूक मोठ्या बहुमताने जिंकली.

जिंकूनही गांधीजी व इतर मोठ्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली नाही. यामुळे इंग्रज सरकारने काळजीवाहू सरकार स्थापन केले. ई.राघवेंद्र राव यांच्या कडे हि जबाबदारी देण्यात आली. काही दिवसांनंतर काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला अन ना.भा.खरे मध्य प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बनले.

त्याकाळी मुख्यमंत्र्याना प्रायमर म्हणजेच पंतप्रधान म्हणलं जायचं. मराठी भाषिक असूनही मध्य प्रान्तात प्रचंड कार्य आणि लोकांच्यात मान्यता असल्यामुळे काँग्रेसने त्यांची या पदावर नियुक्ती केली होती.

मुख्यमंत्री म्हणून खरे यांनी चमकदार कामगिरी केली. २६ जानेवारी रोजी राज्यात सुट्टी जाहीर करावी म्हणून गव्हर्नर बरोबर त्यांनी वाद घातला. त्यांच्यामुळेच फक्त मध्य प्रांतात नाही तर संपूर्ण देशभरात हि सुट्टी लागू केली. त्यांनी ब्रिटिशांच्या काळात थांबलेला विदर्भाचा विकास पुन्हा मार्गी लावला. यासाठी अनेकदा इंग्रज गव्हर्नरच्या विरोधात जावे लागत असले तरी त्यांनी त्यासाठी मागे पुढे पाहिले नाही.

मात्र एक पेचप्रसंग निर्माण झाला आणि त्यात त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले.

झालं असं होतं की एकदा त्यांच्या राज्यात एका तेरा वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार झाला. त्यावेळी त्यांच्याच मंत्रिमंडळातील शरीफ नावाच्या एका मंत्र्याने खरे यांना अंधारात ठेवून या बलात्काऱ्यांना ‘दया दाखवून दोषमुक्त करावे’ अशी शिफारस गव्हर्नरांकडे केली. या आरोपींत पहिल्या दर्जाचा एक आयसीएस अधिकारीही सामील होता.

पुढे जेव्हा सरदार पटेलांना या प्रकरणाबद्दल कळालं तेव्हा त्यांनी याची मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली. तेव्हा मुख्यमंत्र्यानी शरीफांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. पुढे या प्रकरणाला जातीय रंग देण्यात आला. पण तरीही ही केस उच्च न्यायालयासमोर गेली व तिथे सगळ्या आरोपींना कठोर शिक्षा सुनावल्या. पटेलांनी स्थापन केलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या चौकशी समितीने या प्रकरणात शरीफ व खरे हे दोषी असल्याचा अहवाल दिला. मुख्यमंत्र्याना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले.

पटेलांना शह देण्यासाठी खरे यांनी आपला राजीनामा तर दिलाच पण गव्हर्नरच्या मदतीने बाकीच्या पक्षांचा पाठींबा घेत पुन्हा सरकार स्थापनेचा दावा केला. पण अखेर पटेलांनी त्यांचा डाव उलटवला, खरेंच्या जागी विद्याचरण शुक्ल यांना मुख्यमंत्री करण्यात आलं.

डॉ.ना.भा.खरे या सत्तेच्या चढाओढीत काँग्रेसमधून बाहेर पडले. या प्रकरणात झालेली आपली मानहानी खऱ्यांना दीर्घ काळपर्यंत विसरता आली नाही. त्यांचा पटेलांवर राग होताच, शिवाय त्यांना साथ दिली यासाठी त्यांचा गांधींवरही रोष होता. सुभाषचंद्र बोस यांनी देखील त्यांना यावेळी मदत केली नाही.

पुढे खरे यांनी राजकारणात व स्वातंत्र्यलढ्यात आपला एकाकी लढा सुरूच ठेवला. व्हाइसरॉय एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मध्येही त्यांचा समावेश झाला. अमेरिकेतील भारतीय रहिवाश्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न, पुण्यातील खडकवासला येथे मिलिटरी अकॅडमीची स्थापना,काँग्रेसच्या कार्यकत्यांची जेल मधून सुटका अशी अनेक कामे त्यांनी या काळात केली.

मधल्या काळात गांधीजींनी त्यांना पक्षात परत येण्याची विनंती केली पण त्यांनी अमान्य केली असं सांगितलं जातं.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी काही काळ अल्वर संस्थांचे दिवाणपद स्वीकारले. याच काळात त्यांनी सावरकरांच्या हिंदू महासभेत देखील प्रवेश केला होता. पुढे जेव्हा गांधीजींची हत्या झाली तेव्हा ना.भा.खरे यांना देखील काही काळासाठी अटक करण्यात आली होती. पण त्यांना पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली. १९५२ साली ते ग्वाल्हेर मधून लोकसभेवर निवडून देखील गेले.

राजकारणातून निवृत्ती नंतर ते नागपूर मध्ये परत आले. १९७० साली त्यांचं निधन झालं.

आज ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसणार काय याच्या चर्चा सुरु असतात तेव्हा त्यांच्याहि आधी नव्वद वर्षांपूर्वी एक मराठी माणूस त्या पदावर बसून आलाय हे मात्र अनेकांच्या लक्षात नसते

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.