गेली ३० वर्ष नदीपासून ८० किलोमीटर दूर राहूनही गावकऱ्यांच नदीवरचं प्रेम आटलं नाहीय

मित्राच्या कामासाठी मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट गावामध्ये आलो होतो. त्यावेळी त्याचे घर शोधत आलो. त्यांनी नवीन भाड्याने घेतले होते हे घर. अब्दुललाट गावाच्या बाहेर एका धरणग्रस्त वसाहतीमध्ये घेतलेले हे घर शोधत आल्यानंतर मला जाणवले की, इथल्या लोकांनी त्यांचं धरणग्रस्त गाव आहे तसं आणि त्याच्या संस्कृती आणि राहण्याच्या बारकाव्यांसकट वसवलं आहे.

त्याचं कारण म्हणजे जेव्हा त्या भाड्याने घर घेतलेल्या जागेची मालकीण, एक आजीबाई; ती माझ्याशी बोलली की,

आम्ही काळम्मावाडी धरणाच्या भागातले. या गावाचं नाव कोनोली !

गावाबाहेरच अब्दुल लाट आणि लाटवाडी गावच्या रोडवर एक गांगोबाचे ग्रामीण देवस्थान आणि त्याच्या मागे गणपतीचे मंदिर.

img 20210105 105508
आजींच्या घरातून दिसणारे त्रिकोणी रस्त्यांचे गाव

गावाच्या तिहेरी बाजूने उतरत्या छपराची बांधकाम केलेली.

काळम्मावाडी धरण जिथे झालं ते गाव कोकणाच्या अगदी जवळ असणाऱ्या आणि प्रचंड पावसाच्या प्रदेशातील. त्यामुळे तिथली उतरत्या छपरांची कौलारु रचना या ग्रामस्थांनी इथे, इतक्या दूर आल्यावर पण कायम राखली.

दक्षिण कोल्हापूर भागात दिसणार्‍या उतरत्या छपराची कौलारू घरे, एखाद्या चाळीसारख्या अनेक दारे आणि खिडक्या असणार्‍या आणि पुढे बसायचा अंमळ उंचीस एका फुटाचा असणारा ओटा आणि स्वच्छ अंगण असणारी विशिष्ट रचना इथे हमखास दिसली.

हे सगळं वेगळं वाटण्याचे कारण म्हणजे अब्दुल लाट हा भाग तसा सपाट प्रदेशातला आणि पंचगंगेच्या जवळ असल्याने आणि मूळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडे असल्याने जास्त पावसाचा नाही पण तरीसुद्धा ही मजेशीर गोष्ट होती की तिथल्या लोकांनी या प्रदेशाचा किंवा इथल्या संस्कृतीचा आणि घरांच्या रचण्याचा आहे तसा स्वीकार न करता आपली ही उतरत्या छपरांची आणि कलांची रचना कायम ठेवली.

img 20210105 120207
गांगोबा देवालय, दुधगंगा धरणग्रस्त वसाहत (कोनोली), अब्दुल लाट

कोनोली हे गाव त्यांनी आहे तसं ठेवलंय.

हे गाव साधारण 1988-89 मध्ये विस्थापित झाले असावे.  या भागात धरणग्रस्तांसाठी जागा राज्य शासनाने दिल्या असाव्यात आणि त्यानंतर यांनी आपली विशिष्ट रचना असणारे घरे बांधायला सुरुवात केली. कुठेच धाब्याची घरे दिसणार नाहीत इथे. मी ज्या घरात राहतोय त्या घराची जागा त्रिकोणी रस्त्यांच्या एका बिंदूत कडेला आहे. मध्यभागी बरोबर त्रिकोणी जागा सोडून एक छानसं झाड मध्यभागी.

त्या झाडाखाली बांधीव पार आणि त्यावर त्यांचा शेंदूर फासलेला कुठलातरी ग्रामीण देव आणि त्याचे छोटूसे देवडी वजा मंदिर. 

इथल्या लोकांनी आपले कोकणी-दक्षिण कोल्हापुरी डोंगरी असे पेहराव सोडलेले नाहीयेत, कारण कोकणी काष्टा नेसलेल्या आजीबाई मला इथे नेहमी दिसतायत. (अर्थात हे जुने पेहराव फक्त ६० वर्षे+ लोकांमध्ये दिसतात) शिरोळ तालुक्यातल्या किंवा अब्दूल्लाट मधील गावातल्यापेक्षा थोडसं वेगळं गाव हे दूर प्रांतातल्या डोंगुर झाडीतल्या गावाची आणि तिथल्या संस्कृतीशी साधर्म्य सांगणार.

इथल्या लोकांनी झाडे सुद्धा भरपूर लावलीत या भागात. म्हणजे अगदी साग, पिंपळ, वड, आंबा, नारळ, चिकू अशी देशी झाडे आणि त्याचबरोबर कोकणातली मापे (मोठ्या आकाराची आयताकृती जाभ्या दगडाची वीट, तिला कोकणात मापे म्हणतात) सुद्धा अगदी एवढ्या लांब प्रांतामध्ये येऊनही यांच्या घराचा आधार बनली आहेत.

याचं राहून राहून आश्चर्य वाटतं की, एखादी संस्कृती त्या गावाशी किती जोडलेली असते आणि जर ते गाव पूर्ण उचलून तुम्ही दुसऱ्या एखादया वेगळया सांस्कृतिक आणि भौगोलिक ठिकाणी ठेवलं, तरीही ती संस्कृती काही नष्ट होत नाही किंवा आजुबाजुच्या वातावरणात मिसळून जात नाही (अगदी अपवाद आहे हा तरीही), तर ती माणसे ती झाडाची, डोंगराची, देवाची, जगण्याची, जत्रांची, व्यवसायाची संस्कृती घेऊन जातात.

हेच मला अब्दुललाट आणि कोनोली या धरणग्रस्त वसाहतीत राहून आणि त्यांच्या निरीक्षणातून जाणवले.

विशेष म्हणजे धरणग्रस्त म्हटल्यावर गरिबी असणार, असे गृहीत धरल्यास चांगलाच धक्का बसणार कारण इथे सर्वजण (अगदी अपवाद वगळता) संपन्नतेने आपली घरं बांधून दिलेल्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करतात.

img 20210105 121437
आजींचे घर : आधुनिक घर डॉक्टर मुलाचे व बाजूचे कौलारू घर शेती करणाऱ्या मुलाचे.
(आधुनिक घरातील एक भाग मित्राने भाड्याने राहण्यासाठी घेतलेला)

उदाहरणादाखल ज्या आजीबाईंच्या घरामध्ये मी राहतोय त्यांची दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांनी आपल्याला हव्या तशा प्रकारे घर बांधलेले आणि ते सर्व सोयींनी युक्त आहे. एक छकडा आहे तो ओढायला एक घोडा, एखादा बैल, गाई-म्हशी, घरामागे गोठा, कोंबड्याच खुराडं, शेळ्या आणि त्यांना टाकलेले जोंधळे; अशाप्रकारे हे लोक आपली जी काही शेतीची पूर्वापार संस्कृती आहे ती आनंदाने करताहेत आणि सुरुवातीला आलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या अडचणी आता काही प्रमाणात कमी होऊन ते बरेच सधन झालेले आहेत, असे माझे प्राथमिक निरीक्षण आहे.

या घरातल्या आजीबाईंनी काल गप्पात सांगितल्या प्रमाणे हे लोक अजूनही त्यांच्या गांगोबा, दिरबादेवी आणि लिंगोबा अशा आपल्या ग्रामदेवतांची पूजा करतात. इथल्या (अब्दूल्लाट) गावच्या ग्रामदेवतेस (कल्लेश्वर, शंकराचे एक रूप) कौल लावून मगच इकडे आणला त्यांनी.

थोडक्यात सपाटीवरचा कल्लेश्वर आणि डोंगरातला गांगोबा यांची दोस्ती १९८८ साली या धरण विस्थापना मुळे झाली.

दिरबादेवीचे मंदिर कुठे आहे? असे विचारल्यावर ‘त्या काळम्मावाडी च्या मागे डोंगराच्या मधल्या डव्हात (डोहात) ती बसली आहे,’ श्रद्धात्मक भावाने आजी सांगू लागली. तिच्या मनात अतिशय ममतेचा आणि कृतकृत्य भाव दाटून आलेला मी पाहिला.

पुढची माहिती ऐकून मला धक्काच बसला. इथे सगळ्या घरांवर ‘दुधगंगा कृपा’ असे लिहिले आहे.

आपल्या जीवनदायिनी नदीला कृतज्ञतेने आठवणीत जपून ठेवण्याचा हा सुंदर मार्ग. पुढे समजले की,

इथे लोक ८०  किलोमीटरवरच्या आपल्या नदीचेच पाणी पितात, तेही ३ किलोमीटर वर अब्दुल्लाट शेजारून पंचगंगा वाहत असतानाही ! हे त्यांनी कसे साधले, अशा विचारात असतानाच आजींनी सांगितले की, इथे दानवाड गावाजवळून आमची दुधगंगा वाहते, तिथून (१६ किमी.)

पाइपलाईन टाकून आम्ही वर्गणी काढून ‘दुधगंगा’ घरी आणली आहे आणि तेच पाणी आम्ही (गेले ३० वर्षे) पिण्यासाठी आणि खर्चासाठी (वापरण्यासाठीच्या पाण्यासाठीचा ‘कोल्हापूरी’ शब्द) वापरतो. १५०० रुपये वर्षाचा एका कुटुंबाचा खर्च येतो.

असे का, हे विचारता, आजी आपल्या भाषेत म्हणाली, ‘ दुधगंगेवर कंपनी नाही,(म्हणजे त्या नदीवर कोणत्याही औद्योगिक वसाहतीचे दुषित पाणी मिसळत नाही)  हितं पंचगंगेचं पानी साफ न्हाय.

हे असं कोनोली गाव आणि त्या गावकऱ्यांचं आपल्या नदीशी असणारं ८० किलोमीटरवरून ३० वर्षे अव्याहत चालणारं  ‘पिरेम’ प्रकरण ! 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.