बीएस्सी झालेल्या या शेतकऱ्याला आज महाराष्ट्र ‘फणसकिंग’ म्हणून ओळखतोय…

कोकण म्हंटल की डोळ्यासमोर येतो रसाळदार हापूस आंबा. यानंतर नारळ, काजू-सुपारीची झाडं, तांदळाची शेती. फणसाचं झाड दिसतं ते अगदीच आपल्या वापरापुरतं एखाद-दुसरं. पण मागच्या काही वर्षांपासून कोकणातील या फणसाला देखील ग्लोबल ओळख मिळायला सुरुवात झाली आहे.

यात प्रयोगशील शेतकऱ्यांचा वाटा तर आहेच, पण याची सुरुवात होते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे गावातील हरिश्चंद्र देसाई यांच्यापासून.

त्यांनी जवळपास १३ एकरावर फणसाचं क्षेत्र विकसित केलं आहे. यात त्यांनी आपल्याला माहित असलेल्या कापा आणि गरपा याच्या पलीकडे जावून जगभरातील ७५ जातीच्या १३०० फणसाच्या झाडांची लागवड केली आहे.

एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फणसाचं उत्पादन घेणारे ते राज्यातील एकमेव शेतकरी आहेत.

त्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्र हरिश्चंद्र देसाईंना ‘फणसकिंग’ म्हणून ओळखत आहे. 

देसाई हे मूळचे रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावचे. गणितात B.Sc. पूर्ण झाल्यावर ते रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात क्ष–किरण वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाले. पण नोकरी करत असताना त्यांना शेतीची ओढ मात्र कायम होती.

शेतीच्या या आवडीतूनच त्यांनी लांजा तालुक्यातील झापडे गावात जमीन विकत घेतली, आणि नोकरी करत असतानाच उरलेल्या वेळेचा सदुपयोग म्हणून त्यांनी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करायला सुरुवात केली. मात्र त्यासोबतच त्यांनी फणसाच्या शेतीवर अधिक भर दिला.

६० वर्षीय हरिश्चंद्र यांनी ‘बोल भिडू’ शी बोलताना सांगितलं की,

फणसात आज शेतकऱ्याचं नशीब बदलण्याची ताकद आहे, प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेच्या आधी व्यापारी माझ्याकडून येऊन फणस घेऊन जातात, यात आम्हाला ५ ते १० रुपये मिळतात, पण यंदा हेच एक फणस ७०० रुपयापर्यंत विकलं जात आहे.

हरिश्चंद्र यांचं शेत बेनी नदीच्या किनाऱ्यावर आहे, आणि ते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फणसाची शेती करतात. त्यांच्या मते ठिबक मधून देखील फणसाची शेती शक्य आहे. आणि पहिले ३ ते ४ वर्षच याला पाणी देण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात फणसाच्या शेतीला चालना देण्यासाठी हरिश्चंद्र यांनी एक नर्सरी देखील सुरु केली आहे. या नर्सरीतून त्यांनी लॉकडाउनच्या दरम्यान सांगली, नाशिक, पुणे, कराड, सातारा आणि अगदी सोलापूर, मराठवाड्यापर्यँत जवळपास ३ हजार फणसाच्या झाडांची विक्री केली आहे. आणि यंदा १० हजार पेक्षा जास्त झाड तयार करत आहेत. मध्यप्रदेशमधून देखील ५०० झाडांची ऑर्डर आहे.

हरिश्चंद्र देसाई यांची महाराष्ट्रातील एकमेव लायसन्स धारक फणसाची नर्सरी आहे.

यात त्यांच्याकडे जगभरातील १२८ प्रजातींपैकी ७५ प्रकारची झाड आहेत. यात थायलंड, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम सारख्या देशातील वाण आहेत.

या झाडांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशात फळ देणाऱ्या झाडांचा पण समावेश आहे. उदा. एखाद्या जातीचं झाड हे रत्नागिरीत फळ देत नाही, पण तेच नाशिकच्या वातावरणात आणि तिथल्या मातीत देत. अशाच काही जाती विदर्भातील वातावरणात देखील फळ देणाऱ्या आहेत.

या जातींची नाव म्हणजे सुपर फॅन्सी, जलभोग राजा, चंपादक, सिंगापुरी, व्हिएतनाम सीडलेस, जे ३३, मिल्की व्हाइट, मॅडागास्कर गोमलेओस, रामचंद्र अशी आहेत. त्यांनी यासोबतच एक विशिष्ट वाण विकसित केलं आहे, ज्याला त्यांनी देसाई कप्पा नाव दिलंय. हेच त्यांच्या सगळ्यात आवडीचं फळ देखील आहे.

आपल्याकडील १३ एकर क्षेत्रावर ते फणसाची शेती तर बाकीच्या १२ एकरावर ते काजू, आलं आणि हळदीची देखील शेती करतात.

यासोबतच ते शेतकऱ्यांना फळाच्या टीएसएस (टोटल सॉल्यूबल सॉलिड्स) याबद्दल देखील मार्गदर्शन करतात. त्यांच्या जवळ अशी अनेक प्रकारची झाड आहेत, ज्याचा टीएससचा स्तर १५ ते ३० टक्क्यांच्या आसपास आहे.

हरिश्चंद्र यांच्या मतानुसार, एक फणसाचं झाडं वर्षात जवळपास २०० फळ देत, तर जे जुनं झाड आहे ते जवळपास ५०० फळ वर्षाला देत. त्याच्यातून त्यांना लाखोंचं उत्पादन मिळतं. त्यासाठी विशेष मेहनत करण्याची देखील गरज नसते किंवा ३ वर्षानंतर खत, कीटकनाशक यांची देखील गरज लागत नाही.

केवळ कापणीच्या काळात अतिरिक्त मजुरांची गरज भासते.

२०१७ मध्ये केरळमधील वायनाड इथं आयोजित आंतरराष्ट्रीय जॅकफ्रुट महोत्सवात महाराष्ट्रातून भाग घेणारे एकमेव शेतकरी होते. 

हरिश्चंद्र यांच्या या कामात त्यांचा २८ वर्षीय मुलगा मिथिलेश हा देखील उतरला आहे.

मिथिलेशचं ऍग्री इंजीनियरिंग पूर्ण झालयं, आणि प्रशासकीय परीक्षांची तयारी करत होता, पण शेतकरी बनण्याचं स्वप्न तयार झाल्यानं त्याने शेतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मागच्या ४ वर्षापासून तो केवळ फणस शेती आणि त्याच्या विकासावर लक्ष देत आहे.

सध्या देसाईंनी वर्ल्ड बँकेसोबत महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या स्मार्ट या योजनेत भाग घेतला आहे. यातून त्यांनी त्यांच २.५ कोटी रुपयांचा फ्रुट प्रोसेसिंग युनिट चालू केलं आहे. या माध्यमातून केवळ फणसाच उत्पादनच नाही तर त्यासोबत फणसावर प्रक्रिया देखील करणार आहेत. यात जॅकफ्रुट पावडर, जॅकफ्रुट चिप्स, जॅकफ्रुट पासून वाईन अशी उत्पादनावर प्रयोग सुरु आहेत.

केरळ कृषि विद्यापीठाच्या डॉ. पी. राजेंद्रन यांच्या एका शोध निबंधानुसार फणसाची झाड ही सोलर इफिशन्ट असतात. ती ५ वर्षात मातीत १२ टक्क्यापर्यंत जैविक कार्बन वाढवू शकतात, जे कि ४० टन कार्बनच्या बरोबरीचं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये फणसाला आज वेगन मीट म्हणजेच शाकाहारी मटण म्हणून ओळखलं जात आहे.

शास्त्रज्ञच्या म्हणण्यानुसार फणसाच्या बियांची पावडर ही डायबेटीसवर उपायकाराक ठरत आहे.

मिथिलेश देसाईच्या सांगण्यानुसार,

त्यांचं सयाजी शिंदे यांच्या देवराई माध्यमातून पण काम चालू आहे. त्यातून देखील फणसाच्या झाडांची लागवड करण्याचा विचार आहे. तसेच जॅकफ्रुट ऍग्रो टुरिझम हा प्रकल्प देखील येत्या काही काळात सुरु करणार आहेत.

फणसाला देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानं ओळखलं जात, केरळमध्ये चक्का, महाराष्ट्रात फणस, तर उत्तर भारतात कटहल, पश्चिम बंगालमध्ये इचोर, तर कर्नाटकमध्ये हलासु, कुजी किंवा हलासिना हनु ओळखलं जात. पण सगळ्या जगात चव मात्र एकच..!!!

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.