कोलंबिया विद्यापीठातून पासआऊट असणारे वरुण सरदेसाई नेमके कोण आहेत..?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीचा काळ. आघाडी, युती, तिकिटांचा वाटप वगैरे घोळ सुरु होते. आपापसातील तोडायची राखायची वचने आश्वासने देवाण घेवाण सुरु होतं. काँग्रेस राष्ट्रवादीचा पाया खचलाय यावेळी पुन्हा युतीच सरकार येणार अशी चर्चा राजकीय पंडित व्यक्त करत होते. राजकीय आखाड्यात आडाखे मांडले जात होते.

अशा या धामधुमीच्या काळात इंस्टाग्रामवर एक पोस्ट आली आणि बघता बघता ती व्हायरल झाली. फक्त व्हायरल झाली नाही तर त्या पोस्टच्या बातम्या सगळीकडे लागल्या. त्या पोस्ट मध्ये एक फोटो होता आणि खाली  फक्त एवढंच लिहिलं होतं,

‘हीच वेळ आहे..हीच संधी आहे..
लक्ष्य – विधानसभा २०१९ !!
महाराष्ट्र वाट पाहतोय @adityathackeray !  

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करणारी ही पोस्ट होती पण त्या पोस्ट पेक्षाही ती कोणी केली आहे या वरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

ती पोस्ट टाकली होती वरुण सरदेसाई यांनी. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवा सेनेचे सचिव म्हणून त्यांना उभा महाराष्ट्र ओळखत होता. वरुण सरदेसाई यांनी पोस्ट टाकली याचा अर्थ आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत याचे हे संकेत होते. ठाकरे घराण्यातील कोणी तरी पहिल्यांदा निवडणूक लढवणार ही या पोस्ट मागची खरी ब्रेकिंग न्यूज होती.

कित्येकांना तेव्हा प्रश्न पडला की हे वरुण सरदेसाई कोण ?

राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर ते शिवसेनेचे युथ विंग युवा सेनेचे सचिव आहेत पण त्यांची खरी ओळख आदित्य ठाकरे यांची सावली अशी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव आणि आदित्य यांचा सख्खा मावसभाऊ म्हणून ठाकरे कुटूंबियांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे.

पण फक्त एवढीच ओळख त्यांच्या राजकीय महत्व मिळवून देण्यासाठी पुरेशी आहे का?

आदित्य ठाकरे यांना वयाने समवयस्क असणारे वरुण सरदेसाई हे पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत.

अगदी शाळेत असल्यापासून ते हुशार म्हणून गणले जायचे. ते आपल्या मुलाखतींमधून सांगतात की त्यांना दहावी मध्ये ९१ % गुण मिळाले होते. बारावी मध्ये उत्तम मार्क मिळवून त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश मिळवला. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरची पदवी अगदी एका वर्षात मिळवली. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत आले आणि वडिलांच्या व्यवसायात हातभार लावू लागले.

आदित्य यांना मदत करता करता ते आवड म्हणून युवा सेनेशी जोडले गेले.

त्यांची राजकीय समज, त्यांचे नव्या पिढीशी असलेलं कनेक्ट, सोशल मीडियावरील पकड यामुळे वरुण सरदेसाई यांची निवड आदित्य यांनी आपल्या टीममध्ये केली. हळूहळू आपल्या हुशारीने वरूण यांनी एवढा जम बसवला की त्यांचे पक्ष संघटनेतील महत्व देखील वाढत गेलं.

२०१७ मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीतदेखील त्यांनी सेना उमेदवारांच्या प्रचारात भाग घेतला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी  कल्याण पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण त्यांनी स्वतःच्या उमेदवारीपेक्षा आदित्य यांच्या निवडणुकीकडे जास्त लक्ष दिले.

त्यांच्या संवाद यात्रेपासून ते निवडणूक प्रचारातल्या प्रत्येक बैठकीपर्यंत सगळ्याच नियोजन वरुण सरदेसाई यांच्याकडेच होतं.

अचानक प्रकाश झोतात आल्यानंतर त्यांच्या भोवतीचे वलय आणि वाद देखील जोडीने येत गेले आहेत. आदित्य यांची मंत्रिमंडळात निवड झाल्यावर त्यांच्या सोबत बैठकांना वरुण सरदेसाई देखील जेव्हा दिसू लागले तेव्हा अनेकांनी टिका केली. पुढे वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवल्याने विरोधकांनी त्यांना टिकेचे लक्ष्य केले.

विशेषतः सध्या भाजपमध्ये असलेल्या राणे कुटुंबियांच्या टीकेचा झोत वरुण सरदेसाई यांच्यावरच असायचा. 

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त बनत गेलेल्या अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा प्रकरणात मात्र नितेश राणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यात त्यांनी आयपीएल मधल्या बेटिंग पासून खंडणीच्या धमकी पर्यंतचे हात असल्याचं म्हटलं. मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या एपीआय सचिन वाझे यांच्या व वरून देसाई यांच्या कॉल हिस्ट्रीचे, संभाषणाचे रेकॉर्ड चेक करण्याची मागणी देखील नितेश राणे यांनी केली.

यावर वरुण देसाई यांनी आजच पत्रकार परिषद घेतली आणि हे सगळे आरोप तथ्यहीन पुरवा असेल तर तो दाखवण्याचे उघड आव्हान दिले. इतकेच नाही तर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.