महात्मा फुले पुतळ्याचा ठराव सभागृहात सर्वप्रथम “यांनी” मांडला होता…

महात्मा जोतिराव फुले यांची आज 194 वी जयंती. महात्मा फुलेंच्या पवित्र स्मृतीस सादर अभिवादन!

महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचे प्रवर्तक म्हणजे महात्मा जोतीराव फुले. जोती-सावित्री या फुले दाम्पत्याने जर त्या काळात सामाजिक सुधारणांसाठी कठोर संघर्ष केला नसता, तर आज बहुजन, स्त्रिया, शूद्रातिशूद्र कुठे असते याची कल्पनाही करता येणार नाही!

“विद्येविना मती गेली… ”

असा जागर मांडत प्रस्थापितांना भिडणारे जोतिराव फुले म्हणजे पुरोगामी चळवळीचे आद्य प्रवर्तक. अशा महात्म्याचा पुतळा त्याच्याच कर्मभूमीत नसावा ही अत्यंत दुर्देवी बाब असल्याचे जाहीर विधान करणारे आणि फुलेंच्या पुतळ्यासाठी नगरपालिकेकडे अधिकृत ठराव पाठवणारे पहिले नेते म्हणजे देशभक्त केशवराव जेधे!

पुणे म्युनिसिपालटीत फुले पुतळ्याचा ठराव :

जुलै 1925मध्ये नऊ नगरसेवकांच्या सह्यांनिशी केशवराव जेधेंनी महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा ठराव पुणे म्युनिसिपालिटीकडे पाठवला. पुणे म्युनिसिपालिटीत टिळक गटाचा वरचष्मा होता. त्यामुळे टिळक अनुयायांनी पंडित मोतीलाल नेहरुंच्या हस्ते टिळक पुतळ्याचे अनावरण 1924 सालीच करून घेतले होते; तर त्याच वर्षी विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या पुतळ्याचे अनावरण दस्तुरखुद्द महात्मा गांधींच्या हस्ते झाले होते. शिवाय, टिळकांच्या पुतळ्याचा खर्च म्युनिसिपालिटीच्या तिजोरीतून करण्यात आला होता.

या पार्श्‍वभूमीवर, महात्मा फुलेंचा पुतळा पुण्यात असायलाच हवा असा केशवरावांनी आग्रह धरला.

पण नेहमीप्रमाणेच त्यांना प्रखर विरोध झाला.पुणे म्युनिसिपालिटीचे त्या वेळचे अध्यक्ष होते, तात्यासाहेब केळकर. टिळक गटाचं नेतृत्व करणार्‍या केळकरांनी फुलेंच्या पुतळ्याला तीव्र विरोध तर केलाच; पण भालाकार भोपटकरांनी फुलेंच्या कार्यकर्तृत्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं. “फुलेंचा पुतळा उभारण्याची योग्य जागा पुणे नसून, कोल्हापूर आहे” हे भोपटकरांचं विधान पुण्यातील तत्कालीन समाजव्यवस्थेचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर आणण्यासाठी पुरेसं आहे.

फुलेंचा अपप्रचार आणि पुण्यातील टोकाचा संघर्ष :

पुण्यातील काही सनातनी लोकांनी एका पुस्तिकेच्या माध्यमातून फुले हे मिशनरी लोकांचे पगारी हस्तक-प्रचारक होते; ते स्वतः ख्रिस्ती झाले होते अशी राळ उठवली होती. या धर्तीवर पुण्यातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर या पक्षांत टोकाचा संघर्ष उभा राहिला होता.

परस्परांना नामोहरम करण्यात दोन्ही गट सरसावले होते. म्युनिसिपालिटीत केशवराव जेधेंनी फुले पुतळ्याचा ठराव मांडून सभागृह दणाणून सोडले होते, प्रस्थापित व्यवस्थेला जेधेंनी हादरवून टाकले होते; तर सभागृहाबाहेरही पुण्यातील सार्वजनिक जीवनात वाद-प्रतिवादांच्या फैरी दोन्ही बाजूंनी झडत होत्या.

फुले पुतळ्यासाठी 44 वर्षे अविरत संघर्ष 

जेधेंनी फुले पुतळ्याचा ठराव मुकाट्यानं मागे घ्यावा, अशा शब्दांत भोपटकरांनी भाष्य केले.

जेधेंनी मांडलेला महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा ठराव पुणे म्युनिसिपालिटीत फेटाळण्यात आला. पुढे फुले पुतळ्यासाठी जवळपास 44 वर्षे संघर्ष सुरू राहिला आणि अखेरीस 1969 साली आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात या पुतळ्याचे अनावरण झाले. विशेष म्हणजे, या वेळीदेखील पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीतून पुतळ्याचा खर्च झाला नाही; तर माळीनगरच्या सहकारी कारखान्याने हा पुतळा भेट दिला होता.

केशवराव जेधे यांनी फुले पुतळ्याची मागणी सातत्यपूर्वक लावून धरली नसती, तर हा मुद्दा विस्मृतीत गेला असता, हे निश्‍चित.

या अर्थाने, जेधेंचे फुले पुतळ्याच्या संदर्भातील संघर्षकार्य म्हणजे एक प्रकारची पूर्वतयारीच म्हणावी लागेल. पुणे मनपाच्या प्रांगणात असलेला फुलेंचा पुतळा समाजसुधारणेचा वसा जपणार्‍या केशवराव जेधेंची आजही साक्ष देत आहे. हा पुतळा महाराष्ट्रातील सत्यशोधक आणि पुरोगामी चळवळीची आजही अखंड प्रेरणा आहे.

  •  दिग्विजय जेधे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.