सुभाषबाबूंनी हिटलरला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धाची मूर्ती भेट दिली होती.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नाव म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस. परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. भारतात आणि जागतिक पातळीवर धर्माच्या नावावरून चाललेल्या कत्तली त्यांचं मन व्यथित करत असे. धर्माच्या आणि जातीच्या भावनेत न अडकता यातून पुढे जाऊन जो देशासाठी काम करील तो खरा देशभक्त असा नेताजींचा बाणा होता.

दुसरीकडे राजरोसपणे माणसांच्या कत्तली करणारा हिटलर आपली हुकूमशाही चालवत होता. जर्मनीमध्ये त्याने क्रूरकर्मांचा कळस गाठला होता. त्याला विरोध करणारेसुद्धा त्याच्या कृत्यांकडे पाहून शांत झाले होते. तानशाह म्हणून कुप्रसिद्ध असलेलय हिटलरला भेटण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस गेले होते.

महानायक या विश्वास पाटलांच्या कादंबरीतील हा प्रसंग.

हिटलर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस हि भेट ऐतिहासिक होती. इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलच्या नियमानुसार राज्यप्रमुखांना भेटतेवेळी कुठलीतरी भेटवस्तू द्यावी, हिटलर हा गुंतागुंतीचा आणि बहुपक्षीय व्यक्तिमत्व होता. आता हिटलरला रुचेल पचेल अशी कुठली भेटवस्तू भेटीवेळी द्यावी असा पेच नेताजी सुभाषचंद्रांपुढे उभा राहिला होता.

आता हा प्रश्न सोडवण्यासाठी नेताजींनी पत्नीला इमिलीला विचारले कि हिटलरच्या स्वभावाला शोभेल आणि त्याला आवडेल अशी कुठली भेटवस्तू मी त्याला द्यावी ? यावर बोसांची पत्नी इमिली म्हणाल्या कि एखाद दुर्मिळ पुस्तक किंवा एखादं ऑइल पेंटींग असलेलं चित्र भेट म्हणून द्या. अगोदरच्या काळात हिटलर हा चित्रकारी करायचा.

परस्परविरोधी ध्येयाची आणि विचारसरणीची दोन दिग्गज माणसं भेटणार होती. हिटलर सोबतच्या ऐतिहासिक भेटीची तारीख दोन वेळा बदलली गेली. पुढे २९ मे १९४२ हि तारीख नक्की होऊन नेताजींची भेट पक्की ठरली. नेताजींनी बर्लिनहून हिटलरच्या भेटीसाठी स्पेशल विमानातून प्रवास केला. त्यांच्यासोबत विमानात केप्लर आणि ऍडम ट्रॉट होते.

हिटलरच्या अगदी जवळचे काही म्हत्वाचे लोक नेताजींना घ्यायला विमानतळावर अगोदरच पोहचले होते. भारताच्या बलाढ्य लोकांपैकी एक असलेल्या नेताजी सुभाष चंद्रांना भेटण्यासाठी हि सगळी मंडळी उत्सुक होती.

हिटलर आणि नेताजींची भेट हिटलरच्या अभ्यासिकेत झाली. नेताजींशी हस्तांदोलन केल्यावर हिटलरने सगळ्यांना बसण्यास सांगितले. नेताजींनी आपल्याजवळचा भेटीखातर आणलेला बॉक्स हिटरलच्या हाती दिला. हिटलरला आश्चर्य वाटलं त्याने उत्सुकतेपोटी तो बॉक्स फोडला. आतमध्ये एक मातकट रंगाचा ब्रॉन्झचा पुतळा होता. त्या पुतळ्याच्या उघड्याबंब अंगाकडे हिटलर डोळे वासून पाहतच राहिला. ट्रॉटही आश्चर्याने त्या मूर्तीकडे पाहत होता.

परंतु हिटलरला मूर्तीची ओळख न पटल्याने त्या मूर्तीला तो बारकाईने न्याहाळत होता, मग नाक फेंदारून त्याने नेताजींना विचारलं,

हा मुष्टियोद्धा कोण ?

यावर नेताजी सुभाष चंद्र बोस म्हणाले कि ,

ते भगवान बुद्ध आहेत , त्यांनी बौद्धधर्माची स्थापना केली. शांतता , अहिंसा दयेची शिकवण दिली.

त्या मूर्तीकडे पाहून हिटलर विचारू लागला

शांतता ? अहिंसा ! तर मग हे गृहस्थ मिस्टर गांधींना सिनिअर कि जुनिअर ?

यावर सुभाष चंद्र बोस म्हणाले कि,

महोदय जगातल्या सर्वांनाच ते सिनिअर आहेत.

अशा श्रेष्ठ पातळीच्या बैठकीत हसण्याची चोरी होती नाहीतर नेताजी पोट धरून हसले असते. ऍडम ट्रॉटना मात्र हसू फुटलेलं पण हिटलरपुढे हसणार कसे. त्यांनी आपलं हसू दाबलं आणि एकीकडे त्यांना हिटलरच्या अज्ञानाचीही कीव येत होती.

या भेटवस्तूमुळे हिटलर शांत झाला . कुणीही काहीच बोलत नव्हते.  नेताजी सुभाष चंद्र बोसांनी दिलेल्या भेटवस्तू मुळे हिटलर चांगलाच अवाक झाला होता. बुद्धाची मूर्ती हि हिटलरला भेट देणं हे  मोठं दिव्य कार्य नेताजींनी पार पाडलं होतं.

ट्रॉटने पुढे सांगितले कि,

बुद्ध आणि विवेकानंदांचा संदेश आणि शिकवण पचवूनही सुभाषचंद्रांसारखा एक उच्चविद्याविभूषित हिंदी नेता जर्मनीच्या वेशीपर्यंत कशासाठी धाव घेतो ! ३८ कोटी जनतेचे श्वास , तिचा ध्यास – हिटलरसारख्या बत्थड डोक्याच्या मनुष्याला सारं कसं समजणार ?

संदर्भ : महानायक- विश्वास पाटील

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.