छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र काढणारा मनुची नेमका कोण होता ?

गेल्या अनेक काळापासून भारतात प्रवासाच सत्र सुरुये. बर्‍याच प्रवाश्यांनी  व्यापासाठी, धार्मिक प्रसार करण्यासाठी, राजकीय प्रभाव वाढविण्यास आणि शेजारी देशांशी संबंध निर्माण करण्यासाठी भौगोलिक सीमा ओलांडल्या. असाच एक इटालियन प्रवासी म्हणजे निकोलाव मनुची. जो सतराव्या शतकात भारतात आला आणि इथचं राहिला.

मोजक्याच  पुस्तकात असलेल्या उल्लेखाशिवाय,  त्याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही. मुळचा व्हेनिसचा असलेल्या या मनुचीचा जन्म १६३८ मध्ये झाला. जगभर फिरण्याचं खूळ त्याच्या डोक्यात होत. त्यामुळच १४ वर्षाचा असताना १६५३ मध्ये त्यान घरातून कल्टी मारली, अनं व्हेनिस बंदरातून  स्मिर्ना शहराकड जाणाऱ्या जहाजात जाऊन लपला. आणि इथूनच त्याची भटकंती सुरु झाली. 

लॉर्ड बेलोमाँट या इंग्रज सरदारानं  त्याला कामावर घेतलं, त्याच्याबरोबर मनुची आशिया मायनरवरून तो पर्शियाला पोहोचला. नंतर सी हॉर्स या ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजात बसून तुर्कस्तान, इराण भटकला , आणि १६५६ साली भारत गाठला. भारतात आधी सुरत तिथनं बऱ्हाणपूर, ग्वाल्हेर, धोलपूर मग आग्र्याला पोहोचला.

दरम्यान, या प्रवासात त्याचा मालक लॉर्ड बेलोमाँटने  होडल गावात दम सोडला.

पुढ मोगल बादशाह शाहजहानचा मोठा मुलगा दारा शुकोव्हनं त्याला आपल्याकड कामाला ठेवलं, जिथ त्याला ८० रुपये पगारावर तोफखान्यात ठेवलं गेल. यानंतर समुगडची लढाई झाली ज्यात दाराला आपली शस्त्र खाली ठेवून हार मानायला मागली. यादरम्यान मुरादबक्षला बंदी बनविण्यात आल्यानं मनूची औरंगजेबाच्या ताफ्यात काही दिवस काम करत होता.

दाराला मारल्यानंतर औरंगजेबानं त्यांना नोकरीच लालच दिल, पण त्यानं ते धुडकाऊन लावल. याकाळात त्यात शिपाईगिरी, वैद्यकीय व्यवसाय आणि राजनैतिक शिष्टाई अशी वेगवेगळ्या प्रकारची काम केली.

१६६३ मध्ये मनुचीने  पाटणा, डाक्का इथ प्रवास केला . जिथ त्याची किरतसिंगकडून मिर्झाराजा जयसिंहाशी ओळख झाली. यांनतर १६६४ मध्ये जेव्हा जयसिंहाची दख्खनवर नेमणूक झाली, तेव्हा मनूची जयसिंहाबरोबर  दक्षिण हिंदुस्थानात भटकला.

मनुचीन लिहून ठेवलेल्या आपल्या साहित्यात अनेक किस्से नमूद केलेत.

गोव्याहून परत येत असताना तो पंढरपुरात आला होता, जिथं त्याला लुटल्याचं त्यानं लिहिलंय. तसचं लाहोर शहराला बारा दरवाजे असल्याचं  त्यान म्हंटलय. १६६५ साली पुरांदरात झालेल्या लढाईच्या वेळी जयसिंहाच्या तळावर असताना त्याची छत्रपती शिवाजी महाराजांशी भेट  झाल्याच त्यानं लिहून ठेवलंय.

जयसिंहाच्या विजापूरवरच्या मोहिमेत मनुचीला घेतलं होत. पुढे काबूलमध्ये नेताजी पालकर यांच्याशी झालेली भेटही त्याने सांगितली आहे.

मुघलांसोबत काम केल्याने  त्याला फार्सी व उर्दू भाषा तर येतच होती, सोबतच दरबारातले रीतिरिवाज सुद्धा त्यांना चांगलेच ठाऊक होते. १६८० मध्ये औरंगजेबाच्या जोधपूर मोहिमेत शाह आलम बरोबरही  त्याने भाग घेतला होता, त्यावेळी अजमेरच्या वाटेवर  धुमकेतू पहिल्याच त्यानं लिहलय.

१६८२-८३ मध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना आपल्या पेचात  अडकवलं होत, तेव्हा गोव्याच्या गव्हर्नरने मनुचीला पोर्तुगीजांच्या वतीने संभाजी महाराजांकडे वकिलीसाठी पाठवलं होत. पण त्याचा काही उपयोग झाला नव्हत. यांनतर संभाजी महाराजांनी जेव्हा सेंट इस्ट्व्हाव किल्ला जिंकला होता , तेव्हा सुद्धा मनुचीला वकिलीसाठी पाठविण्यात आलं होत.

मनूची मोगलांच्या कारवायांना पार कंटाळला होता. ज्यामूळ तो सगळ्यातून आपली सुटका करून मद्रासच्या  फोर्ट सेंट जॉर्ज इथं आला आणि तिथंच राहिला. जिथं त्यानं पुन्हा एकदा आपली डॉक्टरकी सुरु केली. डॉक्टरकी करण्याएवढे शिक्षण नसताना  मर्यादित  ज्ञानावर त्याने हुशारीने  हा व्यवसाय सुरू केला. त्याला त्याचं यशही मिळालं. या डॉक्टरकीमूळ तो देशभर फिरला.

१६८६ साली  एलिझाबेथ क्लार्क या विधवेशी त्याने विवाह केला. त्यांना एक मुलगा देखील  झाला,  पण तो लवकरच मरण पावला. नंतर १७०६ मध्ये त्याच्या पत्नीचेही निधन झाले. तेव्हा त्यानं आपला बिस्तारा पाँडिचेरीला हलवला. 

पण असं म्हंटल जात कि, आपल्या शेवटच्या दिवसात तो मद्रासला परत आला. मद्रासच्या गव्हर्नरने मनुचीचा टॉमस क्लार्कची मद्रासमधली सगळी संपत्ती, त्याचं घर, बागा देऊन सन्मान केला. मद्रासचा  तेव्हाचा गव्हर्नर टॉमस पीट याचा मनुचीवर जरा जास्तच विश्वास होता, ज्यामुळे त्याने बरीच महत्वाची काम त्याच्यावर सोपवली असल्याचं समजते.

मनुचीची अंक भाषांवर पकड होती. त्यामुळे १७०० च्या सुमारास नवीन ईस्ट इंडिया कंपनीने दुभाषाच्या पदावर मनुचीने यावे, यासाठी प्रयत्न केला. पण आता त्याचे वय झालेय, आणि डोळ्यांनी नीट दिसत नाही असे सांगून त्याने नकार दिला. 

मद्रासमध्ये असताना त्याने आपल्या बऱ्याच आठवणी  फ्रेंच  आणि पोर्तुगीज भाषांत लिहून काढल्या, ज्या चार विभागांत प्रसिद्ध करण्यासाठी पॅरिसला पाठवल्या. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्रसिद्ध राज्यकर्ते, सेनानी यांची अस्सल चित्रे काढलेली होती. तसच भारतातल  शहरी वैभव व गावातील दारिद्र्य याचं उत्तम चित्रण त्यान रेखाटलेलं आढळत. त्यानं लिहिलेल्या माहितीवरून एकंदरीत समजते कि, त्याला  औरंगजेब, पोर्तुगीज आणि जेझुइट यांच्याबद्दल सक्त नफरत होती.

5f39ed9d520fb685bd852706d2803761 scaled

दरम्यान,  मनुचीनं आपला शेवटचा श्वास मद्रासमध्येच घेतल्याचे समजते. त्याच्या स्तोरिआ दो मोगोर ‘या पुस्तकाचे विल्यम आयर्विनने १९०७ मध्ये ‘अ पेपीस ऑफ मुघल इंडिया ‘या नावाने इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले.  त्याची दुसरी आवृत्ती १९८१ मध्ये प्रसिद्ध झाली. १९७४ मध्ये ‘असे होते मोगल ‘ या शीर्षकाने  ज. स. चौंबळ यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर प्रसिद्ध केले. मुघल साम्राज्याचा पहिला लेख मानुचीनेचं लिहिला आहे.  मोगल काळ आणि मराठ्यांचा इतिहास यांची माहिती देणारा एक उपयुक्त साधनग्रंथ म्हणून मनुचीच्या या लिखाणास एक वेगळेचं महत्त्व आहे.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.