वेस्ट इंडिजची क्रिकेट टीम एकदा कोल्हापुरात खेळायला आली होती..

रांगड्या दिलदार लोकांचं गाव म्हणजे कोल्हापूर. इथं शिवी हासडून बोललेलं देखील लाडाचं समजलं जातं. तांबड्या पांढऱ्या रस्याप्रमाणे तिखटजाळ बिनधास्तपणा कोल्हापूरकरांच्या रगात उतरलाय. छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या या करवीर नगरीत खेळ देखील रांगडेच खेळले जातात.

कुस्तीसाठी तर कोल्हापूर संपूर्ण देशात फेमस आहे. इथल्या तालमीतील लाल मातीत घुमून अनेक हिंद केसरी तयार झाले. फक्त कुस्तीचं नाही तर फुटबॉलदेखील कोल्हापूरच्या क्लबस्तरावर अतिशय चुरशीने खेळला जातो.

आखाडा आणि रांगड्या खेळाशी नाते जुळविणाऱ्या या शहराने क्रिकेटमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोल्हापुरात अगदी संस्थानकाळापासून क्रिकेट खेळले जात आहे. सरदार घराण्यांनी नावांनी क्रिकेट संघ तयार केले होते. त्या काळी त्या संघादरम्यान क्रिकेट स्पर्धा व्हायच्या.

कोल्हापुरातील सर्वात फेमस क्रिकेटर म्हणजे भाऊसाहेब निंबाळकर

भाऊसाहेब निंबाळकर यांनी कोल्हापूरात क्रिकेटचा श्रीगणेशा केला. केवळ क्रिकेटला सुरुवात न करता त्यांनी आपल्या खेळीतून अनेक प्रथम श्रेणी सामन्यामध्ये विक्रमी खेळी केली. त्यांचा क्रिकेटचा देदीप्यमान वारसा महिपतराव इंदूलकर, डी. आर. पाटील,अजित इंदुलकर, विजय धनवडे, रमेश हजारे, रमेश कदम, उमेश गोटखिंडीकर, संग्राम अतितकर, संग्राम चव्हाण, अखिल हेरवाडकर यांनी पुढे सुरू ठेवली. पुरुष खेळाडू अशी कामगिरी करत असताना महिला खेळाडू अनुजा पाटील, शिवाली शिंदे यांनी देखील थेट भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

मात्र अजूनही कोल्हापुरात क्रिकेट म्हणावे तेवढे चमकताना दिसत नाही. कोल्हापुरात एकच क्रिकेट स्टेडियम आहे जे बऱ्याचदा तिथे होत असलेल्या दुर्लक्षामुळे चर्चेत असते. इथल्या खेळपट्टीचे तीन तेरा वाजले असल्याची बातमी आपण नेहमी वाचत असतो.

पण एक काळ होता जेव्हा खुद्द विश्वविजेत्या वेस्ट इंडिज टीमने कोल्हापूरचा दौरा केला होता.

गोष्ट आहे १९८३ सालची. नुकताच वर्ल्ड कप झाला होता आणि सलग दोनवेळच्या विजेत्या इंडिजला हरवून अनपेक्षितपणे कपिलने विश्वचषक उचलला होता. त्या पूर्वी भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकं गांभीर्याने कोणी घेत नव्हतं. पण १९८३ च्या त्या वर्ल्ड कपने क्रिकेटची सगळी गणितं बदलून टाकली.

पूर्वीच्या काळी क्रिकेट सामने आजच्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात व्हायचे नाहीत. एक संघ संपूर्ण वर्षभरात एक ते दोन दौरे करत असे. वेस्ट इंडीजसारखी बलवान टीम भारताच्या दौऱ्यावर क्वचितच यायची. मात्र त्यांना वर्ल्ड कपमध्ये हरवल्यामुळे कपिलच्या टीमचं वजन वाढलं होतं.

क्लाइव्ह लॉइडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजची टीम ४ ऑक्टोबर १९८३ साली मुंबईत दाखल झाली. ६ कसोटी सामने आणि ५ वनडे सामन्यांचा हा दौरा होणार होता. या शिवाय विंडीजची टीम काही सराव सामने देखील खेळणार होती. उत्तर विभाग, पूर्व विभाग, दक्षिण विभाग, पश्चिम विभाग व विदर्भ यांच्या सोबत फर्स्ट क्लास मॅचेस होणार होते.

या पैकी वेस्ट इंडिज विरुद्ध पश्चिम विभाग हा सामना १९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरच्या शिवाजी स्टेडियमवर होणार होता.

त्याकाळी कोल्हापुरात विमानतळ नसल्यामुळे वेस्ट इंडिजची टीम बेळगावला उतरली. तिथून घाटगे पाटलांच्या मोहन ट्रॅव्हल्सने त्यांना कोल्हापूरला आणण्यात आलं. इथे टुरिस्ट हॉटेलमध्ये त्यांच्या उतरण्याची सोय करण्यात आली होती.

या सराव सामन्यासाठी जगातला त्याकाळचा सुपरस्टार फलंदाज सर व्हिव्ह रिचर्ड्स विंडीजचं नेतृत्व करत होते. माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, क्लाइव्ह लॉइड यांना या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. मात्र त्यांच्याशिवाय गॉर्डन ग्रिनीज, डेसमंड हेन्स, रिची रिचर्डसन, अँडी रॉबर्ट्स हे दिग्गज खेळाडू कोल्हापूरच्या सामन्यात उतरले.

आपल्या पश्चिम विभागाचा कप्तान बलविंदरसंधू हे होते. त्यांच्या सोबत गुलाम पारकर, किरण मोरे, संजय हजारे, चंद्रकांत पंडित, राजू कुलकर्णी इत्यादी खेळाडू विंडीज विरुद्धच्या कोल्हापूरच्या सामन्यात खेळले.

विव्ह रिचर्ड्सला आणि संपूर्ण विंडीजच्या टीमला पाहण्यासाठी सांगली कोल्हापूर सातारा बेळगाव इथून अफाट गर्दी शिवाजी स्टेडियमवर गोळा झाली. रिचर्डसने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. सगळ्यांना वाटत होतं आता कोल्हापुरात शिवाजी स्टेडियमवर त्याची आतिषबाजी पाहायला मिळणार. पण तस घडलं नाही.

डेस्मंड हेन्स, रिची रिचर्डसन,  लॉगी याणी अर्ध शतक झळवल मात्र ज्याच्या बॅटिंग साठी लोकांनी गर्दी केली होती तो विव्ह रिचर्ड्स फक्त ११ धावा काढून अशोक पटेलच्या बॉलिंगवर आउट झाला. विंडीजने ४१७ धावा काढल्या व आपला डाव घोषित केला.

त्यांना उत्तर द्यायला उतरलेल्या पश्चिम विभागाने सर्वबाद २३५ धावा काढल्या. तिसऱ्या दिवशी विंडीजने ७ बाद २०५ धावा काढल्या. भारताला बॅटिंग मिळालीच नाही. तिसऱ्या दिवस अखेर सामना अनिर्णयीत राहिला.

या सामन्यानंतर वेस्ट इंडिजचे नेहमीचे कप्तान सर क्लाइव्ह लॉइड यांनी कोल्हापूरच्या खेळपट्टीचे कौतुक केले होते. भारतातील चांगल्या खेळपट्ट्यांपैकी ही एक खेळपट्टी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कोल्हापूरचे सुभाष बी जोशी यांनी या सामन्याबद्दलच्या काही आठवणी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितल्या आहेत.

या सामन्याच्या ऑर्गनाइजर्सनी कोल्हापूरची खास आठवण म्हणून या संघातील सर्व जणांना श्री महालक्ष्मीचे फोटो भेट देऊन त्यांचा सत्कार केला होता. अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या वेस्ट इंडिज टीमने महाद्वार रोडवर फिरून शॉपिंग केली. त्याचप्रमाणे कोल्हापूरची वैशिष्ट्य पूर्ण जागतिक कीर्तीची कोल्हापूरी चप्पल खरेदी करण्यासाठी ते चप्पल लेनला निघाले.

पण तिथे फॅन्सनी तुफान गर्दी केली. अखेर संयोजकांनी व पोलीस यंत्रणेने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना तिथे जाण्यास अटकाव केला. त्यांच्यासाठी चप्पल हॉटेल मध्ये पाठवून देण्याचं ठरवण्यात आलं. मात्र याला एक अडचण होती. वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू ताडमाड उंच होते. त्यांच्या पायाची मापेदेखील  अवाढव्य(११ नंबरचे पुढे) होती व अशी चप्पल्स सहज उपलब्ध नव्हती.

फक्त त्यातील लॅरी गोम्स या खेळाडूचे पायाचे माप ७/८ नंबर होते.(लहान चणीचा गोरा खेळाडू).

यातून एक मार्ग काढणेत आला.पायाची मापे घेणेसाठी चर्मकार संघटने मधील निष्णात कर्मचाऱ्यांना हाॅटेल मध्येच बोलावून घेतले व अत्यंत थोड्या अवधीत या खेळाडूंना कोल्हापूरी चपलांचा पुरवठा करणेत आला. १८ नोव्हेम्बर ला संध्याकाळी माप घेऊन २१ तारखेला चप्पल खेळाडूंकडे सोपवण्यात आल्या. यातील बहुतेक खेळाडूनी ४/५ जोड मागणी केले होते हे आणखी वैशिष्ट्य.

रांगड्या कोल्हापूरने या विदेशी खेळाडूंचा आपल्या पद्धतीने स्वागत सत्कार केला. इथल्या दुकानदारांनी मेहनतीने बनवलेल्या चपला पुढे बराच काळ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या पायात चमकत राहिल्या. त्यांच्या निमित्ताने कोल्हापूरी पायताण सातासमुद्रापार पोहचले हे विशेष.

संदर्भ-  सुभाष बी जोशी कोल्हापूर 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.