नानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याची दिशा बदलली आणि पुण्याचं शहरीकरण सुरु झालं

आज पुणे एका नव्या वादावरून दणाणून गेलंय. वाद होता आंबील ओढा परिसरात सुरु असलेल्या कारवाईचा. गेली कित्येक वर्षे पुण्यात सारसबागेपासून दत्तवाडी पर्यंत आंबील ओढ्याच्या काठावर झोपडपट्टी उभी आहे. दरवर्षी येणाऱ्या पुराचा देखील फटका या भागाला बसतो. पण तरीही अनेकांचे संसार या ओढ्याच्या किनाऱ्यावर उभे आहेत.

पोलिसी कारवाईमुळे आंबील ओढ्याच्या जवळ राहणाऱ्या रहिवाश्यांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला आहे. या वादग्रस्त आंबील ओढ्याचा इतिहास मात्र खूप जुना आहे.

फार फार प्राचीन काळापासून पुणे परिसरात भरपूर पाणी असलेले दोन ओढे होते. त्यापैकी एक होता नागझरी तर दुसरा आंबील ओढा.नागझरीप्रमाणे हा ओढा देखील तीनशे वर्षांपूर्वी पुण्यातून भर बुधवार पेठातून वाहायचा. जिलब्या मारुती जवळ आंबील ओढ्याकाठी स्मशान भूमी देखील होती असं म्हणतात. सध्याचा बाजीराव रोडचा मार्ग आहे तिथून शनिवार पेठेच्या मार्गाने अमृतेश्वर मंदिरापाशी हा ओढा मुठा नदीला जाऊन मिळत असे.

पूर्वी पुणे हे एक छोटस खेडेगाव होत. आदिलशाही सरदारांनी या गावात गाढवाचा नांगर फिरवला होता. शहाजी महाराजांच्या या जहागिरीच्या गावाला पुन्हा वसवलं राजमाता जिजाऊंनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून सोन्याचा नांगर चालवला. त्यांना राजकारणाचे सुरवातीचे धडे याच गावात शिकवले.

बाल शिवबा व राजमाता जिजाऊ त्याकाळी ओढ्याच्या किनाऱ्यावर असलेल्या तांबडी जोगेश्वरीच्या मंदिरात जायचे असे उल्लेख इतिहासात आढळतात. हाच तो आंबील ओढा असावा.

पुढे शंभरभर वर्षांनी बाजीराव पेशाव्यांनी पुण्यात छत्रपतींच्या लाल महालाजवळच शनिवार वाडा बांधला. त्यांच्या काळात आज शनिपार जिथे आहे तिथे ओढ्याच्या किनाऱ्यावर असलेली समशानभूमी मुठेच्या तीरावर नडगेमोडी येथे हलवण्यात आली. पेशवे बाजीरावांनी बांधलेल्या शनिवार वाड्यामुळे पुण्याचं महत्व वाढलं मात्र अजूनही हे शहर बनलं नव्हतं.  

गावच्या पश्चिम सीमेवरून वाहणारा आंबील ओढा पुण्याचा एकार्थे संरक्षकच होता 

पुण्याचा खरा वैभवशाली विकास सुरु झाला नानासाहेब पेशवे यांच्या काळात. त्यांनी संपूर्ण शहराला तटबंदी उभारली, आज जे शनिवारवाड्याचे भव्य स्वरूप दिसते ते नानासाहेब पेशवे यांच्या काळातच उभे राहिले. त्यांचे चुलते चिमाजी अप्पा यांनी आंबील ओढ्याच्या शेजारी पश्चिम तट उभारायची मोहीम हाती घेतली होती.

नानासाहेब पेशवे दूरदृष्टीचे होते. भविष्यातील नगरनियोजनाची आखणी करून त्या दिशेने त्यांनी पावले टाकण्यास सुरवात केली होती. अशातच १७५२ साली आंबील ओढ्याला अचानक मोठा पूर आला. त्यात चाळीस पन्नास माणसे अक्षरशः वाहून गेली. तेव्हा मात्र नानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याचा प्रवाह बदलायचे ठरवले.

त्यांनी सारसबाग येथे असलेल्या तळ्याला व ओढ्याच्या पाण्याला अडवण्यासाठी छोटे धरण उभारले. ओढ्याचा प्रवाह पर्वतीच्या टेकडीच्या खालच्या बाजूला वळवून नदीला मिळवला. यामुळे आंबील ओढ्याची दिशाच बदलली. एकेकाळी गावातून वाहणारा प्रवाह गावाबाहेर गेला.

आंबील ओढ्याची दिशा बदलणे हि पुण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना होती.गावातून जाणारा ओघ थांबल्यामुळे प्रचंड मोठी जागा खुली झाली. 

ओढ्याच्या दोन्ही बाजूनं अनेकांच्या बागा होत्या. शनिवार पेठेच्या दक्षिणेला खुद्द पेशव्यांची हुजूरपागा होती. तिच्या समोर खाजगीवाल्यांची मोठी बाग होती. शेजारी सरदार पटवर्धनांच्या बागा होत्या. ओढ्याचे पाणी संपल्याने अशा मोकळ्या बागा अल्पावधीतच वस्तीखाली आल्या.

बुधवार चौकाचा रस्ता जोगेश्वरी पुढे अप्पा बळवंत चौकापर्यंत वाढला. पुढे शनिवारवाडा ते अप्पा बळवंत चौक असा नवीन रस्ता नव्याने निर्माण झाला. हुजूरपागा ते रमणबाग या परिसरात शनिवार पेठेच्या विस्तार झाला. एकूणच काय,ओढ्याच्या पलीकडे वस्ती वाढेल हा नानासाहेबांचा अंदाज अचूक ठरला आणि ओढा बुजल्याचा खेड वाटेनासा झाला.

पुढच्या पंधरा वीस वर्षात आंबील ओढ्याचा रिकामा खड्डा हळूहळू बुजला आणि त्यावर रस्ते झाले. लोकांनी घरे बांधली. पुण्याचं पश्चिम क्षितिज विस्तारले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी तयार केलेल्या पहिल्या विकास आराखड्यामुळे इ.स.१७६९ मध्ये सदाशिव पेठ आणि १७७३ मध्ये नारायण पेठेची वस्ती झाली. अल्पावधीतच ती एवढी वाढली कि, शनिवार, नारायण व सदाशिव पेठ एकमेकींस घट्ट जोडल्या गेल्या.

नानासाहेब पेशव्यांच्या या निर्णयामुळे पुण्याची भरभराट तर झालीच, पण एका खेड्याचं शहर बनण्याकडे पहिलं पाऊल पडलं.  भविष्यात डेक्कन, कोथरूड व पश्चिमेकडील इतर उपनगरे बनून पुणे महानगर तयार झाले ते त्याच ऐतिहासिक घटनेनंतर.

संदर्भ- हरवलेलं पुणे डॉ.अविनाश सोवनी  

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.