काय आहे अप्पा बळवंत चौकाच्या नावामागची आख्यायिका?

पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. विद्या नावाची मुलगी नाही तर विद्या म्हणजे शिक्षण. ख्याख्या ख्या..जोक हो. तर या विद्याप्राप्तीसाठी पूर्ण पुण्यात शेकडो शाळा कॉलेजेस आहेत. इंजिनियरिंग म्हणून नका, डॉक्टरकी म्हणू नका, शेती कॉलेज, डीयड बियड सगळ आहे इथ. गेला बाजार एमपीएससी युपीएससी, सिए, एमबीयेचे क्लासेस आहेत. एकप्रकारे दुकानंच हो ही विद्येची. पण खरी दुकाने बघायला गेली तर ती आहेत अप्पा बळवंत चौकात.

पुण्याला शिकायला आलाय आणि त्याला अप्पा बळवंत चौक माहित नाही असं कधी होत नाही. आपल्या गावाकडं शाळेची वह्या पुस्तक घ्यायचं म्हटल्यावर एक दुकानं असत. पण या विद्येच्या माहेरघरी वह्या पुस्तकांचं एक छोट गावचं वसलंय. त्याला अप्पा बळवंत चौक म्हणतात. हां आजकालच्या बाहेरून आलेल्या निर्वासित पुणेकरांनी त्याच नाव एबीसी असं काहीतरी केलाय.

काही दीड शहाणे एबीसी चौक असं ही म्हणतात. असल्या जोकवर खरे पुणेकर दीड किलो अपमान फ्री मध्ये देतात. इंग्लिशचं झाडायचं आहे ना तर एबी चौक म्हणा ना !!

बर असो. पुण्यात शिकायला आलेल्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या आयुष्याला जोडले गेलेले अप्पा बळवंत चौक चे अप्पा बळवंत नेमके कोण? हा प्रश्न आपल्याला पडत असतो पण उगीच आणखी अपमान विकत घ्यायला नको म्हणून आपण कधी कोणाला विचारत नाही. अशा लोकांच्या मदतीसाठीच बोल भिडू आहे.

तर हे अप्पा बळवंत म्हणजेच ‘कृष्णाजी बळवंत मेहेंदळे’ .

बाजीराव पेशव्यांनी आपली राजधानी पुण्याला हलवली. तिथे भव्य असा शनिवार वाडा बांधला. तेव्हा त्यांच्या अनेक सरदारांनी या वाड्याजवळ जागा घेऊन आपापले वाडे उभारले होते. यातच होते मेहंदळे कुटुंब. हे मेहंदळे  म्हणजे नात्याने पेशव्यांचे मामा लागायचे.  त्यांची गणना पेशव्यांच्या प्रमुख सरदारांमध्ये केली जायची.

अप्पा बळवंत यांचे वडील म्हणजे बळवंत मेहंदळे हे अत्यंत कुशल लढवय्ये होते. त्यांना नानासाहेब पेशव्यांच्या खास मर्जीतले सरदार असं समजल जायचं.  बळवंतरावांनी त्यांच्या कारकिर्दीत पराक्रम गाजविला होता

हे बळवंतराव मेहेंदळे नानासाहेबांचे बंधू सदाशिवराव भाऊ यांच्या सोबत उत्तर मोहिमेला आले होते.. पण दुर्दैवाने १७६० मध्ये पानिपत येथे झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. क्रूर अहमदशाह अब्दालीने त्यांचे शिर सदाशिवभाऊंना भेट म्हणून पाठवले . बळवंतरावांची पत्नीही तिथे सती गेल्या.

पेशव्यांसाठी हा धक्काचं होता. तेव्हा या मेहंदळे घराण्याचा वारस असलेल्या अवघ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन कृष्णाजी उर्फ अप्पांची जबाबदारी पेशव्यांनी उचलली. माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, रघुनाथ राव पेशवे, सवाई माधवराव पेशवे अशा अनेक पेशव्यांची कारकीर्द अप्पा बळवंत मेहंदळेनी जवळून बघितली.

शनिवार वाड्याकडून हुजुरपागेकडे जाणारा रस्ता बुधवार पेठेतून नारायण पेठेला जिथे मिळतो त्या ठिकाणी सरदार मेहंदळे यांचा वाडा होता. या वाड्यातील एक भुयार थेट शनिवारवाड्यापर्यंत होते. काही गुप्त बैठका घ्यायच्या असतील तर पेशवे या भुयारातून मेहेंदळ्यांकडे येत .याच अप्पा बळवंत मेहंदळे यांच्या वाड्यामुळे या चौकाला अप्पा बळवंत चौक म्हणतात. झालं एवढी सिम्पल गोष्ट.

आता पुणेकर म्हटल्यावर एवढ्या सहजासहजी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांना आख्यायिका लागते. अशीच एक आख्यायिका या अप्पा बळवंत चौकाच्या नावामागे देखील जोडली गेलेली आहे. हरवलेले पुणे या पुस्तकात हा किस्सा लिहिला आहे.

एके दिवशी म्हणे सवाई माधवराव पेशव्यांची स्वारी हत्तीवरून पर्वती दर्शनाला गेली होती. शनिवारवाड्याकडे परतताना उन्हामुळे पेशवे ग्लानीत होते. त्यांच्यापाठीमागे अंबारीत अप्पा बळवंत हे देखील बसले होते. हत्तीच्या चालीतील हेलकाव्यामुळे सवाई माधवराव पेशव्यांचा तोल गेला. ते खाली पडणार तोच मागे बसलेल्या अप्पासाहेबांनी योग्य वेळी त्यांना सावरले , नीट बसवले. अपघात होता होता वाचला.

पेशवे खाली पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता. तो अप्पासाहेब मेहंदळे यांच्या प्रसंगावधानाने टळला म्हणून हा प्रसंग जेथे घडला, ती जागा त्यांच्या नावाने ओळखली जाईल , असे सवाई माधवराव पेशवे यांनी जाहीर केले. 

तेव्हा पासून या चौकाला अप्पा बळवंत चौक म्हणतात.

आज मेहंदळे वाडा तिथे नाही. काळाच्या ओघात, रस्ता रुंदीकरण वगैरे मुळे वेळोवेळी वाडा पाडला गेला. आता तिथे फक्त आणि फक्त पुस्तकांची दुकाने आहेत.

हा झाला इतिहास. पण या चौकात पुस्तके कशी आली? किबेंच  लक्ष्मी थिएटर ज्याला नंतर प्रभात थिएटर म्हणून ओळखलं जाऊ लागलं ते तिथ कसं आलं? तिथ के सागरच्या लायनीत सुप्रीम एवन सँडविचचं दुकानं कसं आलं?  वगैरे वगैरे नवे प्रश्न आपल्याला पडतच असतील. भिडू आहेच त्याच्या शोधात.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Satish Inamdar says

    Mehendale musical instruments atta tya Chaukat ahe te tya Mehendalyachya vanshaja paiki ekache ahe

  2. Ravindr says

    Mast Hi website khup mast aahe yatun pratekala havi ti punyatil mahiti Milo shakel asi bolbhidu be ha prayatn changala kela aahe ya baddal Abhinandan 😊🙏🏻🙏🏻

Leave A Reply

Your email address will not be published.