पेशवे वाटत असलेल्या लाखोंच्या दक्षिणेला ब्रिटीश अधिकाऱ्याने स्कॉलरशिपमध्ये बदलले !

पेशवाईचा काळ म्हणजे मराठेशाहीच्या वैभवाचा काळ. या काळात पेशावर पर्यंत पोहचलेल्या मराठी घोड्यांच्या टापा उत्तरेच्या बादशहाच्या उरात धडकी भरत होता. सर्वात शक्तीशाली सत्ता म्हणून मराठा साम्राज्य उदयास आल होतं. बाजीराव पेशव्यापासून ते मल्हारराव होळकर, महादजी शिंदेंच्या सारख्या पराक्रमी वीरांमुळे हे शक्य झालं होतं.

या यशाबरोबर प्रचंड पैसा देखील आला. पेशवाई दिवसेंदिवस समृद्ध होत गेली. शनिवारवाड्याच्या सातमजली महालात वैभवाचे कारंजे थुईथुई नाचत होते.

कोकणातून आलेल्या पेशव्यांच्या पाठोपाठ अनेक ब्राम्हण मंडळी पुण्यात आली. यातील काही जण पराक्रमाने सरदार बनले, काहींनी पेशव्यांच्या फडावर कारकुनाची नोकरी मिळवली. तर काहीजण पुण्यातल्या मंदिरामध्ये पुजारीपण करू लागले.

सर्व पेशवे स्वभावाने धार्मिक होते. त्यांनी पुण्यात भरपूर मंदिरे बांधली. जुन्या मंदिरांचे जीर्णोध्दार केले. तिथल्या पूजा अर्चेची व्यवस्था केली.

बाजीरावांचे सुपुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे हे तर प्रचंड  धार्मिक होते. त्यांनीच आपल्या धन्याच्या म्हणजेच सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीसाठी पर्वतीच्या टेकडीवर देवदेवेश्वराच मंदिर उभारलं. या मंदिराच्या शिखरावर १०२० तोळ्याचा सोन्याचा कळस चढवण्यात आला होता.

याच पर्वतीच्या पायथ्याला नानासाहेब पेशव्यांनी एक भव्य दगडी इमारत बांधली, जिचे नाव रमणा.

१७३१ साली त्र्यंबकराव दाभाडेवर मिळवलेल्या विजयानंतर बाजीराव पेशव्यांनी रमणा सुरु केला होता. रमणा म्हणजे एकप्रकारचे ब्राम्हणांचे संमेलन. दरवर्षी श्रावण महिन्यात देशभरातून ब्रम्हवृंद पुण्यामध्ये गोळा होतं. यात उत्तरेच्या बनारस पासून ते दक्षिणेतील रामेश्वरपर्यन्त सर्वठिकाणहून हजारो मंडळी येत. त्यांच्या येण्याचे विशेष कारण म्हणजे दक्षिणा.

पेशवे आपल्या रमण्यामध्ये दक्षिणा व दानधर्माचा कार्यक्रम घेत. श्रावणात ब्राम्हणांना केलेलं दान, आदरातिथ्य हे मोठे पुण्यकर्म आहे अशी तेव्हा समजूत होती. म्हणून एरव्ही देण्यात येणाऱ्या भिक्षावळी पेक्षा रमण्यावेळी देण्यात येणारी दक्षिणा दसपट असे.

पण हे दान सर्वाना समसमान असायचे नाही. त्यासाठी विद्वत्तेची परीक्षा घेतली जाई.

राम शास्त्रीप्रभुणे, बाळशास्त्री, अय्याशास्त्री हे दशग्रंथी विद्वान ब्राम्हणाची परीक्षा घेत. यात उत्तीर्ण झालेल्यानां शनिवारवाड्यात यथास्थित आदरसत्कार करून त्यांच्या पांडित्यानुसार दक्षिणा देण्यात येत असे तर उरलेल्यानां रमण्यात पर्वतीजवळ भोजनासह दक्षिणा दिली जाई.

ही दक्षिणा १ रुपयापासून १००० मोहरापर्यंत कितीही असे. प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार स्वतः श्रीमंत पेशव्यांच्या हस्ते दक्षिणा वाटप होई. गरीब ब्राम्हण शेकडो मैल पायपीट करून मजल दरमजल करत आपल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी पुण्याला येत.

हजारो लोक जमले असल्यामुळे कोणतीही गडबड होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त असे. यासाठी पोलीसदलाबरोबर सैन्यातील हत्यारबंद शिपाई देखील उभे असायचे.

पर्वतीच्या मंदिरावर रोषणाई केली जाई. दक्षिणावाटपाचा कार्यक्रम मोठा दिमाखदार होत असे.

रमण्यात आत जाण्यासाठी ४ प्रवेशद्वार असायचे. या चारही प्रवेशद्वारावर नाना फडणवीस व अन्य अधिकारीवर्ग उभा असायचा. खुद्द पेशवे कुटुंबातीलही एखादी व्यक्ती प्रवेशद्वारपाशी उभी असायची. कोणी एखादा चतुर माणूस दोनवेळा दक्षिणा उपटू नये म्हणून आत जाणाऱ्या प्रत्येकाच्या सदऱ्यावर किंवा शरीरावर लाल गंधाची खूण केली जाई.

उत्तर पेशवाईमध्ये रमण्याचे प्रस्थ प्रचंड वाढले. लाखो रुपये यावर खर्च होत असत. अख्ख्या भारतात हे संमेलन गाजू लागले.

अत्यंत शिस्तबद्ध  चालत असलेला हा समारंभ अत्यंत प्रेक्षणीय आणि रोमांचकारी म्हणून ब्रिटीश रेसिडेन्सीमध्ये सुद्धा ख्यातनाम झाला होता. अनेक युरोपियन अधिकारी हे दक्षिणावाटप पाहण्यासाठी पुण्याला येत. मात्र ते ब्राम्हण नसल्यामुळे त्यांना प्रवेश मिळायचा नाही.

पर्वतीच्या टेकडीवर उभे राहून इंग्रज अधिकारी हा कार्यक्रम पहात.

कॅप्टन मूर नावाचा अधिकारी दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात म्हणजे १८९७ साली रमणा पाहायला आला होता. त्याने आपल्या आठवणी लिहितो की,

“यावर्षी दक्षिणेप्रीत्यर्थ वाटली जाणारी रक्कम नेहमीपेक्षा बरीच मोठी होती. श्रीमंत बाजीराव पेशवे हे उधळ्या स्वभावाचे होते, कारण त्यांना लोकप्रियतेची हाव होती, परंतु असे म्हणतात की, नाना फडणवीसांनी या उधळपट्टीस अटकाव केला.”

त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की ब्राम्हणांच्या विद्वत्तेची परीक्षा कोठे घेतली जाते हे दिसलेच नाही. दक्षिणा वाटपामध्ये प्रचंड भेदभाव होत होता. श्रीमंत व दरबारी वजन असणारे ब्राह्मण जास्तीची दक्षिणा लाटत होते.

पुढे पेशवाईच्या पाडावानंतर इ.स. १८१८ मध्ये रमणा बंद करण्यात आला.

मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर बनलेल्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने मात्र या संस्थेचा मूळ उद्देश आणि त्यामागील भावना याचा परामर्श घेऊन इस. १८२१ साली लिहिले,

“दक्षिणेचा मुलभूत उद्देश ज्ञानार्जनास उत्तेजन देणे हा आहे. त्याची रक्कम यापूर्वी ८-10 लाख रुपये  झाली होती. ही गोष्ट खरी आहे की पेशव्यांचे या कार्याला असलेले उत्तेजन न्यायीपणाने योग्य दिशेने जाऊ शकले नाही. तथापि या संस्थेचे एकूण परिणाम उपयुक्त होते हे नाकारता येणार नाही.” 

एल्फिन्स्टनने दक्षिणा फंड स्थापन केला. ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, संस्कृत पाठशाळा, संस्कृत व मराठी भाषावृद्धी साठी करण्यात येऊ लागला.फक्त ब्राम्हणच नाही तर सर्व जातीजमातीच्यामधील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ लागला. महात्मा जोतीबा फुले यांचा देखील यात मोठा वाटा होता.

या सर्वाची सुरवात झाली त्या पर्वती पायथ्याच्या रमण्याच्या जागी एक गणपती मंदिर उभे आहे ज्याला रमणा गणपती असे ओळखले जाते.

संदर्भ- पेशवेकालीन पुणे. लेखक- रा. ब. दत्तात्रय बलवंत पारसनीस

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. उमेश says

    दाभाडे यांच्यावर विजय मिळवला …?
    .शाहू ने ब्राम्हणांना दान करायची जबाबदारी सेनापती दाभाडे यांनी दिली होती .कुणी कर्तृत्ववान न राहिल्याने ती जबाबदारी बाजिराला दिली .
    … इंग्रजांनी ब्राम्हणांचा द्वेष नको आणि धार्मिक बादित लक्ष्य नघाळण्याच धोरण ..म्हणून ही रमाना पद्धत पुढं वाढवली.तोंडी ज्ञान लेखी स्वरुपात सरकार ला सादर करा मग हे लोक काहीही फालतु लिहून बक्षीस मागू लागले म्हणून दक्षिण प्राईज कमिटी च बंद केली .

    इंग्रजांची ही काम दुसरा बाजीराव पुण्यात राज्य करत असताना पण चालू होतीच

Leave A Reply

Your email address will not be published.