चेरापुंजीचा देखील विक्रम त्या दिवशी मुंबईच्या पावसाने मोडला होता..

अत्यंत गतिमान शहर म्हणून नावाजलेल्या मुंबईचे व्यवहार २६ जुलै, २००५ रोजी झालेल्या पावसाने व त्यानंतर आलेल्या महापूराने अक्षरश: ठप्प झाले. २६ जुलैनंतरचे दोन दिवस मुंबई शहराने ‘न भूतो न भविष्यति’ असा महापूर अनुभवला. या पुरामध्ये सुमारे एक हजार जण मृत्युमुखी पडले, तर शेकडो बेपत्ता झाले.

२६ जुलै या एकाच दिवसात मुंबईत ९९४ मिलीमीटर इतक्या पावसाची विक्रमी नोंद झाली. भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण असलेल्या चेरापुंजीमध्ये १९१० साली ८३८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद केली गेली होती. चेरापुंजीचा हा विक्रम मुंबईच्या २६ पावसाने मोडला. आभाळ फाटणं म्हणजे काय हे या दिवशी जुलैच्या मुंबईकरांनी अनुभवलं. या प्रचंड पावसामुळे मुंबई बुडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

जनजीवन ठप्प, अनेक मृत्युमुखी : 

मुंबईत झालेल्या तुफानी पावसामुळे मुंबईतील सखल भागात प्रचंड पाणी साचलं आणि रस्त्यावरील माणसं-मोटारी वाहून जाव्यात, अशी बिकट परिस्थिती तयार झाली. एकीकडे संततधार पडणारा पाऊस, दुसरीकडे पाण्याचा निचरा न होणं आणि तिसरीकडे समुद्राच्या भरतीचं पाणी शहरात घुसणं यामुळे परिस्थिती पाहता पाहता हाताबाहेर गेली.

उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणारे रस्ते बंद झाले. टॅक्सी, बस व खाजगी वाहने यांची ये-जा बंद झाली. पूर्ण शहराचा वीजपुरवठा बंद झाल्याने मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्वे सेवाही थांबली. टेलिफोन, मोबाईल बंद पडले.

मुंबईचं विमानतळही ठप्प झालं. घरं-इमारती पाण्याखाली बुडल्या. झोपडपट्ट्या पाण्याने वेढल्या गेल्या. कारखाने, कार्यालये व अन्य आस्थापने बंद पडली. लाखो लोक अडकून पडले. चाकरमाने आपापल्या कार्यालयांमध्ये अडकून पडले. शाळांमध्ये गेलेल्याचे हाल झाले.

अनेक लोक पाण्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडले. मोटारींमध्ये बसून राहिलेले लोक गुदमरून अथवा बुडून मेले. अनेक लोक बसेसच्या टपांवर, झाडांवर, इमारतींवर आणि जिथे शक्य असेल त्या उंच ठिकाणावर बसून राहिले. कल्पनेतही येणार नाहीत अशी दृश्यं मुंबईने या आपत्तीत पाहिली.

या महापुरात मध्यमुंबई तर पाण्याखाली गेलीच; शिवाय या परिसरात सुमारे १० हजार ट्रक-टेम्पो पाण्याखाली गेले. ९०० बेस्ट बसेस पाण्यात बुडाल्या. ४ हजार टैक्सी, ३७ हजार रिक्षा आणि हजारो खासगी वाहने पाणी घुसल्याने खराब झाली. पन्नासहून अधिक लोकल रेल्वेचे डबे निकामी झाले.

मुंबईत पाण्याचा जोर एवढा होता की, पाण्यातून मृत माणसं, जनावरं, भाजीपाला व अन्य वस्तू तरंगताना दिसत होत्या. मात्र या पुरामध्ये मुंबईकरांनी असीम धैर्याचं दर्शन घडवलं. पुरामध्ये अडकलेल्या हजारो लोकांना मदत करून त्यांचे जीव वाचवण्याचं काम केलं गेलं.

नैसर्गिक आपत्तीमागील विपरीत कारणं : 

असं म्हटलं जातं की, मुंबई हे कधीही न थांबणारं शहर आहे आणि भारतातील सर्वांत कार्यक्षम असं शहर आहे. मात्र २६ जुलैच्या अशा पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा सज्ज नव्हती. या अटीतटीच्या प्रसंगी मुंबई महानगरपालिका व राज्यशासन व्यवस्था अक्षरशः हतबल ठरली. अखेरीस नौदल, हवाई दल आणि लष्कराला पाचारण केलं गेलं. २६ ते २८ जुलै, २००५ हा काळ मुंबईकर कधीही विसरणार नाहीत.

शासनाच्या अनेक निर्णयांमुळे मुंबईवर ही आपत्ती कोसळली, असं नंतर म्हटलं गेलं. मुंबईतील मिठी नदीवर झालेली अतिक्रमणं, नदी व नाल्यांमध्ये केले गेलेले भराव, मुंबईच्या इंच न् इंच जमिनीवर बांधल्या गेलेल्या इमारती, मैदानांसह मोकळ्या जागांवर झालेली अतिक्रमणं आणि इमारतींभोवतालच्या जमिनीवरही केलं गेलेलं काँक्रीटीकरण या कारणांमुळे मुंबईत महापुराची स्थिती आली. 

म्हणजेच, नैसर्गिक कारणांशिवाय अशा भ्रष्ट व्यवस्थेने निर्माण केलेल्या कारणांमुळे महापुराचं संकट अधिक तीव्र झालं, हे पुढे अधोरेखित झालं. 

मुंबईची ड्रेनेज व्यवस्था बरीच जुनी असल्याने शहरातील अतिरिक्त पाणी वाहून नेण्यास ती कुचकामी ठरली व मुंबईत पाणी साचत राहिलं. एवढंच नव्हे; तर समुद्रातील पाणीही शहरात शिरलं, असं निरीक्षण नंतर नोंदवलं गेलं.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.