यशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते?

यशवंतराव बळवंतराव चव्हाण. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात काँग्रेसच्या आजवरच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यशवंतरावांनी स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस बहुजन समाजापर्यंत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी महाराष्ट्रात काँग्रेसवर आलेलं संकट त्यांनी एकहाती थोपवून धरलं.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले पुढे नेहरूंच्या हाकेला ओ देऊन देशाचे संरक्षण मंत्री बनले. केंद्रीय पातळीवर गृहमंत्रालय, अर्थमंत्रालय अशी अनेक महत्वाची जबाबदारी पार पाडली. देशाचे उपपंतप्रधान देखील बनले. या सगळ्या घडामोडीत त्यांनी काही काळासाठी त्यांनी काँग्रेस सोडली पण काँग्रेसची विचारधारा सोडली नाही.

पण याच यशवंतराव चव्हाणांनी कम्युनिस्ट पक्ष जॉईन करायचा विचार केला होता असं जर तुम्हाला सांगितलं तर?   

यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी वामनराव कुलकर्णी या त्यांच्या सातारा जिल्ह्यातील सहकाऱ्याने एके ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या पूर्वी भारतात ज्या विचारधारा होत्या त्यात मानवेंद्र रॉय यांच्या नेतृत्वाखालील डावी विचारधारा प्रचंड फेमस झाली होती. कित्येक तरुण या विचारधारेकडे ओढले गेले होते. काँग्रेस मध्येच अनेक विचारप्रवाह एकत्र नांदत होते यातच रॉयवादी डाव्या विचारसरणीचा देखील समावेश होता.

वामनराव कुलकर्णी लिहितात,

यशवंतराव चव्हाण रॉयवादी होते, आणि म्हटले तर नव्हतेही. देशपातळीवर जे जे अत्यंत उच्च नेते झाले त्यांच्यात त्यांचा समावेश होतो. ज्यांची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विश्लेषण करण्याची जबरदस्त हातोटी होती त्यांपैकी यशवंतराव एक होते. सन १९३२ पासून ते ४० सालापर्यंत आम्ही एकत्र काम केले. येरवडा जेलमध्ये आम्ही एकत्र होतो.

मी तसा रॉयना मानणारा आणि रॉयवादी कार्यकर्ता होतो. यशवंतराव चव्हाण हे त्या वेळी माझ्या मते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. सातारा जिल्ह्यात त्या वेळी आत्मारामबापू पाटील यांचे नेतेपद निर्विवाद होते. असेंब्लीच्या निवडणुकीच्या वेळी आत्मारामबापू पाटील ३६ हजार मतांनी निवडून आले.

तिकीट कोणाला द्यायचे, हे अच्युतराव पटवर्धन, जेधे, शंकरराव देव यांनी विचारले. त्या वेळी मी त्यांना आत्मारामबापूंचे नाव सुचविले. त्या वेळच्या काँग्रेसमध्ये काँग्रेस सोशालिस्ट पार्टी असा गट होता. त्यात कम्युनिस्ट होते. रॉयिस्ट होते. यशवंतराव मात्र सोशालिस्ट, कम्युनिस्ट की रॉयिस्ट या तीनपैकी कोणत्या गटात जायचे, या संभ्रमावस्थेत होते.

रॉय त्यांना समजला किंवा नाही, हा भाग वेगळा, परंतु रॉयिस्ट विचारसरणीचा गौरव यशवंतराव नंतर नंतरच्या काळात आपल्या भाषणात करीत असत. म. गांधीजींच्या आदेशाने अहिंसेद्वारा राज्य पदरात पडेल, असे मी, लालजी पेंडसे अशा मंडळींना वाटत नव्हते.

१९३२ मध्ये यशवंतराव आमच्या गटात सामील झाले. सातारा जिल्ह्यात त्या वेळी मी पोलिस खात्यात नोकरीला होतो. मी ती नोकरी सोड़ून बाहेर पडलो. त्यामुळे जनमानसात एक उसळी तयार झाली. त्या वेळी आम्ही बिळाशी येथे सत्याग्रह केला. या सत्याग्रहामुळे सातारा जिल्हा खडबडून जागा झाला. जुन्या कार्यकर्त्यांच्या संघटित आंदोलनामुळे तरुण कार्यकर्ते आम्हाला येऊन मिळाले. जेलमध्ये आम्ही अडकलो, त्या वेळी आमच्यावर “रॉयवादी” लेबल लागले.

१९३४ मध्ये सातारा जिल्ह्यात आपले किती कार्यकर्ते आहेत हे पाहण्यासाठी मी कराडमध्ये मुक्काम ठोकला. जेलमध्ये भेटलेले सर्व मित्र रॉयिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळे कार्यकर्त्यांची चाचपणी करायची मी ठरविले. 

मात्र त्या वेळी यशवंतराव चव्हाण कोणी होते का? का ते नगण्य होते? असा मी विचार केला. तर त्या वेळी ते तसे नगण्यच होते. सुमारे १२५ कार्यकर्ते आमच्या गटाकडे होते. दुसरा गट गांधीवादी होता. त्या गटाकडे २०-२५ कार्यकर्ते होते. मग मोठा गट कोणता? तर रॉयिस्ट ! म्हणून यशवंतराव आमच्या प्रवाहात येऊन मिसळले. त्या वेळी सांगलीचे गौरीहर सिंहासने आमच्याबरोबर होते. 

असेंब्ली निवडणुकीनंतर मी, आत्माराम पाटील, गौरीहर सिंहासने, आबा फाटक आणि यशवंतराव असे बोरगावला जमलो होतो. त्या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली परंतु यशवंतरावांनी एका फुलस्केप कागदावर एक स्टेटमेंट लिहून आणले होते. कम्युनिस्ट पक्ष स्वीकारावा, असे त्यात त्यांनी म्हटले होते. 

गौरीहर सिंहासने यांनी तो कागद वाचला व फाडून टाकला. 

“तू एकटा काही निर्णय घेऊ नकोस. सर्व कार्यकर्त्यांनी मिळून निर्णय घेऊ.” असे सिंहासने यांनी त्यांना सांगितले. तरी देखील यशवंतरावांची संभ्रमावस्था जाईना!

कऱ्हाडमध्ये यशवंतरावांच्या घरी मी बैठक घेतली व सातारा जिल्हा काँग्रेसची कमिटी निवडली. त्यात यशवंतराव चव्हाण व ह. रा. महाजनी यांना सेक्रेटरी निवडले. ही पहिली व शेवटचीच बैठक ठरली. त्या बैठकीला फार माणसे नव्हती. अगदी २० ते २५ कार्यकर्ते होते. 

त्यानंतर कॉँग्रेस सोशालिस्ट पार्टीत मतभेद निर्माण झाले. समाजवादी मंडळी म्हणून बाहर पड़ून स्वतंत्र पार्टी करण्याच्या नादाला लागली. त्या वेळी रॉय यानी दोन पत्रे लिहिली. ती पत्रे मी पं. नेहरूंना नेऊन दिली.लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनात ती पत्रे दिली. मला तीन दिवस नेहरूंनी पाहुणा म्हणून थांबवून घेतले. परंतु त्या पत्रातील मजकुराचा जाहीर उल्लेख अलाहाबाद कॉाँग्रेसमध्ये करू असे सांगितले. 

त्या पत्रात काँग्रेस सोशालिस्ट पार्टी फुटू नये, शिवाय काँग्रेसच्या निष्ठेला तडा जाऊ नये, असे लिहिले होते. दरम्यान १९३८ सालापर्यंत काँग्रेसमधील रॉयवादी गट स्वतंत्र आकार घेऊ लागला. त्रिपूरा काँग्रेसच्या वेळी या प्रकारची दिशा स्पष्ट होऊ लागली. आता फार काळ रॉयिस्ट गट काँग्रेसमध्ये राहणार नाही असे मला वाटले. 

१९३९ मध्ये यशवंतराव रॉयिस्ट म्हणूनच काम करीत होते. परंतु सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट याबद्दलही त्यांच्या मनात द्विधा अवस्था होती. युद्धाचे सावट पड़ू लागले. १९४० ला वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला. त्याच वेळी युद्धाच्या बाजूने की विरोधी असा मतप्रवाह पुढे आला. सोशालिस्ट काँग्रेसबाहेर पडले आणि रॉयिस्टही बाहेर पडले.

त्याच वेळी यशवंतराव कॉंग्रेसबरोबर राहिले. आम्ही अलग झालो. तथापि यशवंतरावांचे मोठेपण मी त्यांच्या जाहीर सभांतून पाहिले. विचार कसा करावा हे मी रॉयपासून शिकलो,” असे ते सांगायचे. 

दूरगामी परिणामाचा विचार करणारा व विचार करण्याची क्षमता असलेला हा एकमेव नेता की, ज्याचा समावेश देशपातळीवरील निवडक नेत्यांतच होतो.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.