केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का ? काय असते त्याची प्रक्रिया ?

आज जे काही राजकीय वादळ आलं आहे ते आपण सर्वच पाहत आहोत. आणि या वादळाला कारणीभूत ठरलेत आहेत नवनियुक्त केंदीय मंत्री नारायण राणे !

भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे कि, एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी राज्य सरकारने आदेश काढले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. 

पण प्रकरण नेमकं काय आहे ?

तर जन आशीर्वाद यात्रेच्या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. तसेच  रायगड जिल्ह्यातील महाड इथं जनआशीर्वाद यात्रेमध्ये असताना, पत्रकारांशी बोलताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत राणे म्हणाले,

“त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” या इतरही त्यांनी काही वक्तव्य केलीत. 

मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका केल्याप्रकरणी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. आणि नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने देखील तात्काळ नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच महाडमध्ये ही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केली. आणि महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुण्यातही शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम यांनी तक्रार दिली होती. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुणे पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहे. या पथका मध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे.

नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील. या दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता हे प्रकरण इतक्यावरच थांबणार नाही तर आणखी चिघळतच जाणार आहे.  

कोणत्या कलमांखाली नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे ?

नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम १८९, ५०४, ५०५(२), ५०६, १५३-ब (१) (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कलमांतर्गत मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होईल असे वक्तव्य करणे यांसारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत.

यानिमित्ताने सगळे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत कारण सर्वांनाच असा प्रश्न पडला आहे कि,  केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का ?

कारण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर माध्यमांसमोर आणखी काही गंभीर वक्तव्य केले आहेत. “मी केंद्रीय मंत्री आहे, सामान्य माणूस नाही, आमचं हि सरकार केंद्रात आहे, तुमची उडी कुठवर जाते ते पाहू, मी शिवसेनेला भीक घालत नाही नारायण राणेंचं प्रत्युत्तर, उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात,तेव्हा गुन्हा होत नाही का ? मी शिवसेनेला भीक घालत नाही, बोलणाऱ्यांची समोर यावं. अशी वक्तव्य करत त्यांनी आदेश काढणारे पोलीस आयुक्त राष्ट्रपती आहेत का ? असंही नारायण राणे यांनी म्हणलं आहे.

तर नितेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे, 

कायदा काय म्हणतो ?

नारायण राणे यांच्याविरोधात ज्या कलमांच्या नुसार गुन्हे दाखल झाले आहेत ती IPC मधील कलमे दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचे आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांसाठी अटक करतांना पोलीस आयुक्तांना परवानगी मागायची आवश्यकता नसते, तसेच तपास अधिकाऱ्यांना अटक करण्याचा सर्वस्वी अधिकार असतो. 

यासबंधी बोल भिडूने कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,

“केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याचा अधिकार हा पोलीस विभागाला असतो. राणे यांनी त्यांनी केलेले वक्तव्य असभ्य, हिंसक व बेतालपणाचे आहे. नारायण राणे यांच्याविरोधात ज्या कलमांच्या नुसार गुन्हे दाखल झाले आहेत ती IPC मधील कलमे दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचे आहेत. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण नाही. कारण संसदेत केलेल्या वक्तव्यांना असलेले विशेषाधिकाराचे संरक्षण आहे. पण केंद्रीय मंत्री राणे यांनी हे वक्तव्य जाहीर भाषणात केले आहे. कोणत्याही मंत्र्याने त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून एखादे वक्तव्य केले किंवा मत व्यक्त केले तर कदाचित त्यांचा कामाच्या जबाबदारीचा भाग म्हणून सद्भाभावनेने (good faith) ते वक्तव्य केले असा बचाव करता येऊ शकतो.”

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यालयीन कामकाजाचा किंवा जबाबदारीचा भाग म्हणून ते अपमानजनक व उद्धट वक्तव्य केलेले नाही त्यामुळे त्यांना मंत्री आहे या सबबीखाली कोणत्याही विशेषाधिकाराचे कायदेशीर संरक्षण मिळू शकत नाही”.

“त्यामुळे कलम 41 CrPC नुसार अटक का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस पोलीस नारायण राणेंना देऊन, त्यांना स्पष्टीकरणासाठी वाजवी कालावधी देऊन त्यानंतर नारायण राणेंना अटक होऊ शकते. ते उच्च न्यायालयात जाऊन अटकेपासून संरक्षण मिळवू शकतात”.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.