या गोष्टींमुळे नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन ताकद दिली आहे….

अखेर केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना लॉटरी लागली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ४३ जणांच्या यादीमध्ये नारायण राणे यांच्या नावाचा समावेश आहे. मागच्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जातं होतं. याच विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा होत्या.

मात्र अखेर आज या दोन्ही चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. मात्र नारायण राणे यांना मंत्रिपद देऊन त्यांना ताकद देण्यामागे भाजपची काही राजकीय गणित देखील आहेत. तिचं गणित नेमकी काय असू शकतात याबद्दलचं ‘बोल भिडू’ने राजकीय तज्ञांशी चर्चा करुन घेतलेला आढावा…

या मुद्द्यांमुळे राणेंना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे… 

१. मराठा आरक्षण प्रश्न :

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. अशात मराठा नेते म्हणून ओळख असलेले राणे यांनी राज्यात या प्रश्नावर अक्षरशः रान उठवलं आहे. त्यांनी कधी शिवसेनेवर टार्गेट केलं आहे, तर कधी महाविकास आघाडीलाचं अंगावर घेतलं आहे. इतकचं कशाला त्यांनी कधी थेट संभाजी छत्रपती यांनाही फटकारायचं सोडलं नाही.

त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारवर आणखी कुरघोडी करण्यासाठी भाजप कडून राणेंच्या रुपात मराठा कार्ड खेळलं जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राज्य सरकारनं हा सगळा प्रश्न केंद्राकडे असल्याचं म्हंटलं आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आहे. सोबतचं घटनादुरुस्तीसारखे पर्याय देखील सुचवले जात आहेत. तर राणे हे मराठा आरक्षण प्रश्नांचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्याय अध्यक्षतेखाली तयार झालेल्या समितीनं मराठा आरक्षणाची शिफारस केली होती.

त्यामुळे हा प्रश्न हाताळण्यासाठी केंद्रात कोणीतरी व्यक्ती हवा म्हणून देखील राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळू शकते.

२. शिवसेनेला शह :

राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. १०६ आमदार असूनही विरोधात बसावं लागल्यानं भाजपची खदखद अजूनही कायम आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या तगड्या विरोधकाला महाराष्ट्र सोडून सध्या तरी केंद्रात बोलावलं जाण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे अशावेळी केंद्रातुन शिवसेनेला शह देण्यासाठी राणे हा चांगला पर्याय भाजपला ठरु शकतात.

एक तर ते स्वतः प्रखर शिवसेना विरोधी आहेत. ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, अंगावर घेण्याचं धाडसं त्यांनी अनेक वेळा दाखवलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर शिवसेनेच्या बाबतीत भाजपसाठी राणे फॅक्टर आणि त्यांचं उपद्रव मुल्य हे अधिक महत्वाचं ठरणार आहे.

त्यामुळे राज्यातुन देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातुन राणे अशी महाविकास आघाडी सरकारची दुहेरी कोंडी करुन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न भाजपचा असू शकतो.

३. आगामी मुंबई महापालिका निवडणूक :

आगामी काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणूका जाहिर होणार आहेत. त्यातही मुंबई ही महापालिका सर्वपक्षीयांसाठी महत्वाची आहे. मध्यंतरी हैदराबाद महापालिका निवडणूकांवेळी भाजपनं त्या निवडणूकीला दिलेलं महत्व हा देशभरात चर्चेचा विषय बनला होता.

त्यामुळे आगामी काळात राज्यातील या निवडणूकांना देखील भाजपकडून तेवढचं महत्व दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यातही सध्या मुंबई हा शिवसेनेचा अनेक वर्षापासूनचा गड आहे.

दुसऱ्या बाजूला नारायण राणे हे बराच काळ शिवसेनेत होते. तसंच त्यांना मुंबई महापालिकेतील कामाचा अनुभव असून तिथले खाच-खळगे माहिती आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकतो.

४. भाजपनं दिलेला शब्द :

राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना पक्षानं मंत्रीपदाचा शब्द दिला असल्याचं सांगितलं जातं. सोबतचं अमित शहा मध्यंतरीच्या काळात सिंधुदुर्ग इथं मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी आले होते तेव्हा त्यांनी जाहिर पणे राणेंच्या मंत्रीपदाचे संकेत दिले होते.

त्यावेळी अमित शहा म्हणाले होते,

”नारायण राणे हे मेहनती व अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते आहेत. ते अत्यंत निडरपणे संघर्ष करतात. त्यांची राजकीय कारकिर्द वळणावळणाची असली तरीही त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होणार नाही, त्यांचा सन्मानच होईल, याची मी ग्वाही देतो. राणेंसारख्या नेत्याला कसं सांभाळायचं हे भाजपला चांगलं समजतं.

असं अमित शहा म्हणाले होते. मात्र मंत्रीपदाचा शब्द अजूनही पुर्ण झालेला नाही. मात्र नारायण राणे अजूनही आशावादी असल्याचं चित्र आहे. मंत्रीपदाबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले होते की, जेव्हा निरोप येईल तेव्हा केंद्रात जावू.

५. कोकणमध्ये भाजपची ताकद वाढवणं :

विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र अशी ताकद वाढवल्यानंतर भाजपनं सध्या कोकणावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. इथं मुख्य ताकद आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादीची. दोन खासदार म्हणजेच सिंधुदूर्ग-रत्नागिरीमधून विनायक राऊत आणि रायगडमधून सुनिल तटकरे हे शिवसेना – राष्ट्रवादीचे आहेत. सोबतचं सर्वाधिक आमदार हे देखील सेनेचे आहेत.

त्यामुळे राणे यांच्या रुपानं कोकणात आपली ताकद वाढवण्याचा चंग भाजपनं बांधला आहे. होमग्राउंड असल्यामुळे त्यांची कोकणावर मजबूत पकड आहे. याची चुणूक ग्रामपंचायत निकालामध्ये बघायला मिळाली होती. राणेंच्या नेतृत्वात सिंधुदूर्गमधील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

त्यामुळे आता आणखी ताकद वाढवायची असल्यासं राणे यांना देखील ताकद पुरवणं गरजेचं आहे. राज्यात राहून तर सध्या ही ताकद भाजपला देता येणार नाही. त्यामुळे राणे यांची रवानगी केंद्रात झाल्याचे कयास बांधले जात आहेत.

या सगळ्या कारणांमुळे नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं असण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळी ज्योतिरादित्य सिंधीया, नारायण राणे अशा बाहेरुन आलेल्यांना मंत्रीपद दिल्यामुळे निष्ठावंतांचा एक गट नाराज होवू शकतो. त्यामुळे आगामी काही दिवसं महाराष्ट्रासोबतच केंद्राचं राजकारण चर्चेत राहणार हे नक्की.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.