बाळासाहेबांनी आग्रह धरला म्हणून संपूर्ण “मराठवाडा मुक्ती दिन” साजरा होऊ लागला..

मराठवाडा. कायम दुष्काळाने होरपळत आलेला भाग. फक्त अस्मानी नाही तर हैद्राबादच्या निजामाच्या सुलतानी संकटाने देखील या भागाला छळले. भारत स्वतंत्र झाला तरी हा भाग पारतंत्र्यात होता. निजामाविरुद्ध मराठवाड्याने मुक्तिसंग्राम छेडला. रझाकारांनी अत्याचार केला, या मुक्तिसंग्रामात कित्येकांनी आपलं रक्त सांडलं.

अखेर सरदार वल्लभभाई पटेलांनी लष्करी कारवाई करून मराठवाड्याला मुक्ती मिळवून दिली.

वल्लभभाई पटेलांनी तो निर्णय घेतला नसता तर आज देशाच्या कुशीत दुसरा पाकिस्तान वावरला असता आणि मराठवाडा या पाकिस्तानचा भाग असता.

या मराठवाडा मुक्तिसंग्रामाने महाराष्ट्राला आणि देशाला अनेक नेते दिले. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या नेत्यांनी शंकरराव चव्हाण, पी.व्ही.नरसिंह राव यांच्या पर्यंत कित्येकांना याच मुक्तिसंग्रामाने घडवलं.

नेतेच घडले नाही तर कित्येक कार्यकर्ते देखील घडले. या लढ्यात रक्त सांडलेल्या कार्यकर्त्यांची आठवण रहावी म्हणून मराठवाड्यात १७ सप्टेंबर हा दिवस मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनल्यावर हा दिवस साजरा करण्यास सुरवात झाली, पण त्याकाळात हा दिवस फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित होता. 

पुढे शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्यासारखे मराठवाड्याचे सुपुत्र राज्याचे मुख्यमंत्री बनले. पण अजूनही मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला शासन दरबारी मान्यता मिळाली नव्हती. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी दिलेला लढा, कित्येकांचे त्याग याकडे एकार्थाने दुर्लक्षच झालं होतं.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला खरा न्याय मिळवून दिला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या मुळे. 

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. पहिल्यांदाच महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार सत्तेत आलं होतं. मात्र या युती शासनाच्या सत्तेचा रिमोट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता.

तेव्हा मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते दिवाकर रावते.

या काळात मराठवाड्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी दिवाकर रावते असंख्य लोकांना भेटत होते. त्यांनी तेव्हा प्रत्येक जिल्हा पिंजून काढला. मुक्तिसंग्रामाचा लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनाही अनेकदा भेटणे व्हायचे.

लातूर येथील स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर वाजपेयी यांच्याशी रावते यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या. वाजपेयी यांनी त्यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात प्रामुख्याने सा देशाचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो तसा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन १७ सप्टेंबरला साजरा व्हायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली.

दिवाकर रावते याना त्यांनी बोललेले ते वाक्य सतत राहून राहून आठवत होते. मुंबईला आल्यावर त्यांनी यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निजामाच्या राजवटीतून मुक्तता मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान स्व. बाळासाहेब ठाकरे यांनाही खूप चांगल्या प्रकारे माहिती होते. त्यामुळे हा दिवस अगदी जल्लोषात साजरा व्हायला हवा, या लढ्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी, अशी त्यांचीही आग्रही भूमिका होती.

त्यांनी मान्यता दिल्यानंतर रावते हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी बोलले. त्याचा प्रस्तावही सादर केला. लातूर येथे १९९७ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा मेळावा घेतला. याच कार्यक्रमात त्यांनी पुढील वर्षीपासून शासकीय स्तरावर मुक्तिसंग्राम दिन साजरा करणार असल्याची घोषणा केली.

शासकीय स्तरावर मुक्तिसंग्राम दिन साजरा होण्याआधी त्या त्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी स्वातंत्र्यसैनिकांना बोलावून चहापान करून पाठवायचे. पण याची घोषणा झाल्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा पहिला कार्यक्रम नांदेडमधील श्री गुरू गोविंदसिंग स्टेडियममध्ये झाला.

यात स्वातंत्र्यसंग्रामात प्रत्यक्ष सहभाग घेणारे व राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हुतात्मा स्तंभ उभारले गेले.

आजही मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन थाटामाटात साजरा केला जातो याच खरं श्रेय जातं बाळासाहेब ठाकरे यांना.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.