प्लेगच्या साथीमुळेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना झाली…

पुणे आणि गणेशोत्सव हे अनोखं नातं. मानाचे पाच गणपती, ढोल – ताश्यांचा गजर आणि त्यावर थिरकणारी मंडळी. पण पुण्याच्या या गणेशोत्सवात वैशिष्ट्य असते ते श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईचं. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती जगभरात आहे. आज याच दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

असो या श्रीमंत दगडूशेठ हलवाई च्या दर्शनासाठी फक्त पुण्यातीलचं मंडळी नाही तर बाहेर गावापासून ते अगदी बाहेरच्या देशातून सुद्धा येतात. कोणतीही व्यक्ती पुण्यात आलीये आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं नाही, ही जवळपास अशक्य गोष्ट आहे.

आता या गणपतीची ख्याती जशी प्रसिद्ध आहे, तसाचं त्याचा इतिहास देखील.

तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातल्या बुधवार पेठेत असणारं दत्त मंदिर हे त्यांचं राहायचं ठिकाणं होतं. दरम्यान, त्यावेळी पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्यामूळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले. ज्यामुळे ते आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई दोघेही दुःखी झाले.

त्यांच्याा या अडचणीत त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर देत सांगितले की,

‘तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठिकाणी होईल. दरम्यान, एक उपाय म्हणून तूम्ही एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जशी आपली मुले आपल्या आपल्या आई बापाचे नाव उज्वल करतात, त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचं नाव उज्ज्वल करतील.

महाराजांच्या सांगण्यावरून दगडूशेठ हलवाई शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मुर्ती बनवून घेतली.

लोकमान्य टिळकांच्या हस्ते ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, भाऊसाहेब रंगारी, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, बाबुराव गोडसे, मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, शिवरामपंत परांजपे, या लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती.

दगडूशेठ गणपतीची ही मूर्ती शुक्रवार पेठेतल्या अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे. जिची आज लाखो भाविक रोज पूजा करतात.

संपूर्ण पुणे शहराला प्लेगच्या साथीने छळलं तेव्हा दगडूशेठ यांच्या नवसाची आणि त्यांच्या गणपतीची ख्याती सगळीकडे पसरली.लोक नवस मागायला त्यांच्या मंदिरात येऊ लागले.

१८९३ मध्ये या मंडळाची स्थापना झाली आणि ‘दगडूशेठ गणपती’ असं नाव या गणेश मूर्तीला मिळालं. आधी साधारण मूर्ती असल्याने मंडळाने १९६८ मध्ये प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअण्णा शिल्पी यांच्याकडून ही सूंदर अशी मूर्ती बनवून घेतली. ही मूर्ती घडविण्यात मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही योगदान होते.

दरम्यान कि मूर्ती घडविण्याचे काम सुरू असताना सूर्यग्रहण लागले होते. शिल्पी यांचं म्हणणं होतं की, त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल.

त्यांच्या या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला आणि धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली.

ही मूर्ती इतकी आकर्षक आहे की, दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक ही मूर्ती डोळे भरून पाहून नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हा देखील उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूने पाहिले तर ही गणेशमूर्ती आपल्याकडेचं पाहतेय असे वाटते.

पुढे १९८४ साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. आपल्या नवसपूर्तीसाठी पाच किंवा अकरा नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची इथं रांग पहायला मिळते.

दगडूशेठ हलवाई गणपतीशी संबंधित आणखी एक किस्सा बहूतेक जणांना ठावूक आहे. तो म्हणजे ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता.

त्यानंतर अमिताभ बच्चन जेवा सुखरूप बरे झाले, तेव्हा अमिताभ आणि जया बच्चन या दांपत्याने सोन्याचे कान या गणेश मूर्तीला अर्पण केले.

गणपतीच्या या ख्यातीमूळं लाखो भाविकांची गर्दी इथं जमा व्हायला लागली आणि मंदिर अपूरं पडायला लागलं. त्यामुळे २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले.

दगडूशेठ मंदिराचे नावलौकिक होण्यामागे मंदिराच्या ट्रस्टचे देखील योगदान आहे. ट्रस्टने गणेशोत्सव हा केवळ आपल्या मंडळापुरताच न ठेवता राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली. तसेच गणेशोत्सवामध्ये ऋषिपंचमीला हजारो महिलांचा सहभाग असलेला अथर्वशीर्ष उपक्रम जगभर पोहोचला आहे.

ट्रस्टतर्फे कोंढव्यामध्ये देवदासी महिला आणि त्यांच्या मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देणारे बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालविण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातल्या पिगोरी गावात जलसंधारणाची कामे ट्रस्टने यशस्वीरीत्या पूर्ण केलीत. ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजनसेवा दिली जात आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू असतो. दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत मंडळाने भाविकांचं लक्ष कायमचं आपल्याकडे वेधून घेतलयं. म्हणून दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला याबद्दल शहरात आनंद व्यक्त करण्यात येतोय.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.