उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली सौर कुंपण योजना काय आहे ?

वनक्षेत्रा जवळच्या भागात असणाऱ्या गावांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही अश्या गावांमध्ये शेती करणे कोणत्या जोखमीपेक्षा कमी नसते. पिकाच्या हंगामा दरम्यान शेतकऱ्यांना शेतातच पहारा द्यावा लागतो. जेणेकरून जंगली जनावरं शेतात येऊन पीक खाणार नाही. पण रात्रभर जागरणामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

आता या सगळ्या अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजनेअंतर्गत वनक्षेत्रात जवळ असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपण योजना राबवण्याच्या सूचना दिल्यात. सोबतच या संदर्भातील मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी करण्याचे आदेश देत निधीच्या प्रस्तावावरही मंजुरी दिली आहे. 

आता ही  सौर कुंपण योजना नेमकी आहे तरी काय?

तर या सौर कुंपण योजनेत वनक्षेत्राच्या जवळच्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता शेताभोवती सौर कुंपण लावण्यात येते. यात सोलर पैनल, बैटरी, तार याचा समावेश असतो. पिक नसेल तेव्हा हे कुंपन काढून ठेवता येते. याकरिता येणार एकूण खर्च प्रत्येक शेतकऱ्यांमागे अंदाजे १३ हजार रुपये असल्याचे बोलले जाते. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यास १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. यास आवश्यक घटक खरेदी करण्यास लाभार्थी स्वत: ३ हजार खर्च करतो.

यामुळे शेतात येणारे वन्यप्राणी शेतपिकापासून दूर राहतात. या शेताच्या कडेने लावल्या तारांमधून फक्त करंटचा झटका लागतो. करंट कायम राहत नाही. महत्वाचं म्हणजे यामुळे कोणत्याही प्राण्याच्या जीवाला धोका होत नाही, फक्त करंटचा झटका लागतो.  आणि कोणत्या प्राण्याने झटका लागल्यानंतरही शेतात घुसण्याचा प्रयत्न केला तर सायरन वाजते. ज्यामुळे संबंधित शेतकऱ्याला समजते कि, शेतात प्राणी घुसलाय.

या योजनेमुळे या भागातील शेतकऱ्यांचा ताण बऱ्या प्रमाणात कमी होतो. त्यांना शेतात राहण्याची किंवा रात्रभर जगण्याची गरज नसते आणि शेतकरी सगळं पीक आपापल्या घरी नेऊ शकतात. कोरडवाहु सोबत रबी व अन्य पीके घेणे सहज शक्य होते. अशा शेती जमिनीमध्ये बांबू लागवड, फळझाड लागवड, चारा लागवड, करता येऊ शकते.  त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळू शकते.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्ष यावर उपाययोजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सध्या ९३९ गावांचा समावेश असून या योजनेत आणखीन काही गावांचा समावेश करण्यात येणार असून या योजनेत स्थानिकांना उपयुक्त ठरणाऱ्या इतर गोष्टींचाही यात समेवश करण्यात येणार आहे.

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजनेत वन क्षेत्राजवळ असलेल्या पाच संवेदनशील विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्हात २१८ ठिकाणी सौर बोरवेल तयार करून त्यावर खोडतळे निर्माण करण्यात येणार आहे, जेणेकरून या पाणवठ्यामुळे वनजीवांचा पिण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. यासाठी सहा कोटी रुपयांचा खर्चही करण्यात येणार आहे. 

जिल्ह्याच्या ठिकाणी जंगल सफारी सुरू करण्यात आली असली तरी निसर्ग पर्यटनाला असलेला वाव लक्षात घेऊन आणखी स्थळांचा  शोध घेतला जाणार आहे. तसेच, वाघांचा वावर असणाऱ्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार असून  काही वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येईल.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.