मायावतींची बसप खरंच भाजपची ‘बी टीम’ आहे का?

असं म्हणतात देशाची सत्ता मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश जिंकणं महत्त्वाचं असतं. सध्या भारतीय जनता पक्षानं ४०३ पैकी तब्बल ३१२ जागा जिंकत उत्तर प्रदेशमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा बिगुलही वाजला आहे. सध्या मात्र उत्तर प्रदेशच्या राजकारणात हॉट टॉपिक आहे तो म्हणजे, मायवतींच्या बसपच्या रणनीतीचा.

बहुजन समाज पक्ष, अर्थात बसप. दलित नेता असलेला देशातला एकमेव राष्ट्रीय पक्ष. याआधी चारवेळा उत्तर प्रदेशची सत्ता मिळवलेल्या बसपला २०१७ च्या इलेक्शनमध्ये फक्त १९ जागा मिळाल्या. यंदा मात्र बसपनं कंबर कसलीये, पण त्यांच्यावर आरोप होतोय की तुम्ही बीजेपीची बी टीम आहात!

उत्तर प्रदेशच्या मीडियामध्ये अशीही चर्चा आहे की, बसप थंड बसून भाजपला अप्रत्यक्ष मदत करतीये; पण मेमध्ये होणाऱ्या इलेक्शनची जोमात तयारीही बसपनंच सुरू केलीये. त्यांनी जवळपास ४०० उमेदवारांची यादी जाहीर करत, दलित, ओबीसी, मुस्लिम आणि उच्च जातींना प्रत्येकी २५ टक्के प्रतिनिधित्व दिलं आहे. ब्राह्मण संमेलन घेत नवा अजेंडाही सेट केला आहे.

पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये मायावतींना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. साहजिकच त्यांची तयारी सुरू नाही किंवा बसप थंड आहे हा दावा फोल ठरतो.

उत्तर प्रदेश आणि बिहार वगळता उत्तरेकडील इतर राज्यांमध्ये बसपची नाममात्र उपस्थिती आहे. या राज्यांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना असतोय. इथं काँग्रेसच्या पारड्यात पडणारी बरीचशी मतं बसपला जातात आणि भाजपला फायदा होतो.

असं असलं तरी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बसपनं बऱ्याचदा युतीची गणितं जुळवली आहेत. मग ते कर्नाटक असो, राजस्थान असो किंवा मध्यप्रदेश. त्यामुळं बसपनं मदतीचा हात काँग्रेसलाच अनेकदा दिल्याचं स्पष्ट आहे.

इतकंच काय केंद्रातही कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता.

देशाच्या दोन्ही सभागृहांमध्ये बसपनं सीएए-एनआरसी विधेयकाला तीव्र विरोध केला. वादग्रस्त शेतकरी कायद्यांच्या विरोधातही बसपनं मतदान केलं. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या बसपचे खासदार राज्यसभेत मात्र गैरहजर राहिले. केंद्राच्या कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला बसपनं उघड उघड पाठिंबा दिला.

आता आणखी एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे भाजप आणि बसप युती करणार का?

याआधी १९९५, १९९६ आणि २००३ मध्ये, बसपनं भाजपची बाजू घेतली होती. तेव्हा विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती असल्यानं बसपनं उत्तम चाल खेळली. ही चाल खेळताना मुख्य अट होती- ती म्हणजे मुख्यमंत्रीपद मायावतींकडेच राहिल आणि ते भाजपकडे जाणार नाही. बसपनं विधानसभेत कधीही भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळं युती झालीच, तरी ती बसपच्या फायद्यासाठी होणार हे नक्की.

साधारण सहा महिन्यांवर आलेल्या या भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या निवडणुकीत भाजप, बसप, काँग्रेस आणि सपा असा चौरंगी सामना रंगणार आहे. मायावतींकडे असलेला अनुभव, बसपची वाढलेली ताकद पाहता यंदाच्या इलेक्शनमध्ये मुसंडी मारण्याची संधी त्यांच्याकडे आहे. तयारी, ताकद आणि इतिहास पाहता सध्याच्या घडीला बसपला भाजपची बी टीम म्हणणं बऱ्याच अंशी चुकीचं ठरतं.

परत एकदा आठवण करून देतो भिडू लोक, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.