तेव्हा भावाला उचलून कित्येक किलोमीटर पायी चालतं मायावतींनी हॉस्पिटल गाठलं होत

मायावती. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि देशाच्या राजकारातलं एक मोठं नाव. ज्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यातुन पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री बनून समोर आल्या. आणि एकदाच नाही तर तब्बल ४ वेळा मायावतींनी यूपीच्या  मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळलीये. त्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यही होत्या, तेही कुठलचं पॉलिटिकल बॅकग्राउंड नसताना.

एका अत्यंत गरीब आणि दलित कुटुंबातून आलेल्या मायावती १९७७ मध्ये कांशीरामच्या संपर्कात आल्या. ज्यानंतर त्यांनी पूर्णवेळ राजकारणी बनण्याचा निर्णय घेतला. कांशीराम यांच्या अंतर्गत त्या कोर टीमच्या  भाग होत्या. हेच १९८४ मध्ये बसपाची स्थापना झाली. यांनतर पक्षातला त्यांचा दबदबा वाढत गेला आणि आज बसपाची कमान त्यांच्या हातात आहे.

पण अनेकांना ऐकून विश्वास बसणार नाही कि, आज झेडप्लस सेक्युरिटी वावरणाऱ्या मायावती यांना एकेकाळी भावाचा जीव वाचवण्यासाठी ६ किलोमीटर पायी चालावं लागलं होत.  तेही भावाला खांद्यावर घेऊन.

मायावतींनी २००९ मध्ये अजय बोस यांच्या ‘बेहेनजी: अ पॉलिटिकल बायोग्राफी ऑफ मायावती’ या पुस्तकात आपल्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगितला होता.

मायावती यांचा जन्म १५ जानेवारी १९५६ मध्ये नवी दिल्लीत झाला. वडील प्रभू दास गौतम बुद्ध नगरमध्ये पोस्ट ऑफिसचे कर्मचारी होते. त्यांच्या एकट्याच्या जीवावर आई, ६ भाऊ आणि २ बहिणी असं कुटुंब चालायचं.

मायावतींनी आपल्या जीवनातला हा किस्सा सांगताना म्हंटल कि, जेव्हा त्यांचा चौथा भाऊ सुभाष जन्माला आला जेव्हा त्या अवघ्या ११-१२ वर्षांच्या होत्या. पण जन्मानंतर काही दिवसांनी सुभाषला निमोनिया झाला. त्याला तत्काळ उपचारांची गरज होती. नाहीतर त्याचा जीवही जाऊ शकला असता. पण मायावतींचे वडील तेव्हा शहराबाहेर होते आणि आईसुद्धा खूप आजारी होत्या आणि बाकीची भावंडं मायावतींपेक्षा लहान.

त्यामुळे त्याच्या उपचाराची जबाबदारी मायावतीवर येऊन पडली. आता गावाच्या आसपास कुठलचं दवाखाना नव्हता आणि असता तरी पैशांची अडचण तर होतीचं ना. त्यामुळे त्यांनी आपल्या भावाला गावापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय रुग्णालयात न्यायचं ठरवलं. कारण त्यांचे वडील सरकारी कर्मचारी असल्याने उपचार मोफत मिळणार होते.

आता उपचाराचा खर्च वाचला पण त्याला त्या सरकारी दवाखान्यात न्यायला साधा गाडी खर्चही नव्हता. आता करायचे काय? या प्रश्नावर विचार करत बसण्यापेक्षा मायावतींनी आपल्या भावाला उचललं आणि पायवाट पकडली.

मायावतींनी भावाला घेतले, सोबत पाण्याची बाटली घेतली आणि हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. पण हॉस्पिटलला जाणारा ६ किमीचा प्रवास खूप भीतीदायक होता. एकतर जंगलातून जाणारा त्यात निर्मनुष्य. भाऊ वाटेत रडला कि, पाण्याच्या बाटलीतून दोन घोट द्यायचे.

कधी उजव्या कड्यावर तर कधी डाव्या कड्यावर असं करत मायावती हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या. तिथं पोहोचल्यावर मायावतींनी तिच्या भावाला गरजेचं असणार इंजेक्शन दिलं, औषधे घेतली आणि मग त्याच वाटेने घराच्या दिशेने पायी परत निघाल्या. रात्री ९.३० च्या सुमारास मायावती घरी पोहोचल्या.

त्या जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा आपल्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा पाहून मायावतींच्या आईला खूप आनंद झाला. मायावतींचं एवढ्या कमी वयात आलेलं शहाणपण आणि हिमतीसाठी त्यांनी घट्ट मिठी मारली. यावेळी दोघीना सुद्धा आनंदाश्रू अनावर झाले.

अश्या अवघड परिस्थितीतही आज मायावतींनी जे सध्या केलंय  क्वचित लोकांना जमत. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.