महाराष्ट्रातल्या या गावाला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखलं जातं

महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा कुठला तर यवतमाळ. मोठं जंगलक्षेत्र, हेमाडपंती मंदिरं, वेगवेगळ्या समाजाची पण एकत्र राहणारी लोकं आणि विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे दिग्गज ही या जिल्ह्याची मुख्य ओळख.

आता कापसाला पांढरं सोनंही म्हणतात आणि यवतमाळच्या अर्ध्याहून जास्त जमिनीवर कापूस पिकतो. सगळं कसं पांढरंफटक. पण याच जिल्ह्यातल्या वणी तालुक्याला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखलं जातं.

याचं कारण म्हणजे तिथं मुबलक प्रमाणात असलेल्या कोळशाच्या खाणी

सगळ्यात आधी तुम्हाला वणीचा इतिहास सांगतो-

सुरुवातीला गावाचं नाव होतं यवत, पण आजूबाजूनं टेकड्या, डोंगर असं सगळं माळरान असल्यानं यवतमाळ हे नाव प्रचलित झालं. देश ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली असताना १८३३ मध्ये यवतमाळ जिल्हा उर्वरित बेरारसोबत ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित झाला. १८६४ मध्ये यवतमाळ, दारव्हा, केळापूर आणि वणी हे तालुके मिळून स्वतंत्र यवतमाळ जिल्हा तयार झाला. १९०५ मध्ये बेरारच्या सहाही जिल्ह्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावेळी वणी हे जिल्ह्याचं नाव बदलून यवतमाळ करण्यात आलं. विशेष म्हणजे, इंग्रज काळात हे गाव ‘वून’ या नावानं प्रसिद्ध होते.

आता कोळसा खाणींबद्दल बोलू

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड ही कोल इंडियाची उपकंपनी आहे. या कंपनीचं वणी शहराच्या परिसरात कोळसा खाण क्षेत्र आहे. शहराजवळ उकनी, पिंपळगाव, जुनाड, कोलारपिंप्री, राजूर, कुंबरखणी, घोन्सा, नीलजाई, नायगाव या ठिकाणी त्यांच्या जवळपास १३ कोळसा खाणी आहेत. यातल्या दोन खाणी भूमिगत असून, इतर खाणी खुल्या आहेत.

वणीची अर्थव्यवस्था कोळशाचे उत्खनन आणि शेती व्यवसायावर अवलंबून आहे. कोळशाच्या खाणीमुळं ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला चालना तर मिळालीच आहे. सोबतच स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळाला. जवळच चुनाखडीही सापडल्यानं त्याला पूरक व्यवसायही उभे राहिले आहेत.

ब्लॅक डायमंड सिटी हे नाव कसं पडलं?

अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमध्ये ब्लॅक डायमंड सिटी आहे. हे नावही तिथं मोठ्या प्रमाणावर सापडणाऱ्या कोळशाच्या खाणींमुळं पडलेलं आहे. त्यावरून वणीही महाराष्ट्राची ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखलं जातं.

मोठ्या प्रमाणावर खाण क्षेत्र असल्यानं आजूबाजूची बरीचशी जमीन वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडनं ताब्यात घेतली. यामुळं अनेक गावांचं पुनर्वसन करावं लागलं. मात्र, बरीचशी गावं पुनर्वसनापासून वंचित राहिली.

भारतात सगळ्यात जास्त कोळसा धनबादमध्ये मिळतो, म्हणूनच गँग्स ऑफ वासेपूर सिनेमात धनबादचा संदर्भ दाखवण्यात आला आहे. आता भविष्यात कधी मराठीत गँग्स ऑफ वासेपूर आला, तर परफेक्ट लोकेशन आहेच- ब्लॅक डायमंड सिटी, अर्थात वणी!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.