शिवराई बंद पाडायचा प्रयत्न इंग्रजांनी केला होता, पण १९ व्या शतकापर्यंत ही नाणी टिकून होती.

मराठ्यांचे स्वतंत्र राज्य म्हणजेच आपलं हक्काचं स्वराज्य निर्माण होत असतांनाच, याच प्रवासात आणखी एक ऐतिहासिक गोष्ट घडली होती आणि ते म्हणजे स्वराज्याचे प्रतिनीधीत्व करणारे स्वचलन!  हि काही साधारण घटना नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या वर्चस्वाला डावलून देवनागरी लिपीतली स्वत:ची ‘नाणी’ आणली होती. ती म्हणजे शिवराई.  

शिवराई बंद करण्यासाठी आधी मुघलांनी आणि त्यानंतर इंग्रजांनी फार प्रयत्न केले पण शिवराई १९व्या शतकापर्यंत टिकून राहिली होती…

बघूया या शिवराईचा प्रवास काय होता…

स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे नाणे “शिवराई” छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ला टांकसाळीत केलेले तांब्याचे नाणे होते.  शिवराई हे तांब्याचे नाणे शिवाजी महाराजांनीच प्रथम पाडल्याचे दिसते, कारण १६८३ च्या एका पत्रात शिवराईचा उल्लेख दिसतो. हि नाणी ११-१३ ग्रॅम वजनात आढळतात. या शिवराईची त्याकाळातली किंमत १ पैसा होती आणि अशा ६४ शिवराई मिळुन १ रुपया होत असे.

त्याकाळची परिस्थिती पाहता मुघलांच्या नाण्यांचा प्रभाव हा फार मोठ्या प्रमाणावर होता आणि पर्यायाने त्यांचीच नाणी सगळीकडे चलनात होती. बॉम्बे प्रेसिडेंसिचे पैसेही काही प्रमाणात चलनात होते. अशा वेळी एका नव्या राजाने सुरु केलेले चलन बाजारात टिकेल का ? ते मुघलांच्या नाण्यांची बरोबरी करू शकेल का ? असे प्रश्न त्या काळी पडले होते.

  हे झालं मुघलांच्या काळातलं. पण इंग्रजांच्या काळातलं पाहणं देखील महत्वाचं आहे. 

शिवराई नाणे स्वराज्यात आल्यापासून म्हणजेच 1674 पासून ते तब्बल 19 व्या शतकापर्यंत, शिवराई नाणे चलनात राहिले, अर्थात महाराजांनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी अशीच नाणी पडून चलनात आणली. शिवराई हि १७००, १८०० आणि १९०० अशी तीन शतके टिकून राहिली, त्यात योग्य ते बदल होत ती पुढे येत राहिली. शिवकाळानंतरच्या शिवराईत आपल्याला बदल आढळतो, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांसारखी नाणी पाडली आणि नंतरच्या राज्यकर्त्यांनीं दुदाण्डी प्रकारातील शिवराई चालवली. 

खरं तर १९ व्या शतकात शिवराई बंद करण्यासाठी इंग्रजांना फार प्रयत्न करावे लागले असल्याचे काही  कागदपत्रांवरून दिसते.  ‘मंडळातील नाणी’ या ग.ह. खरे लिखित पुस्तकाच्या प्रस्तावनेत द.वा. पोतदार यांनी लिहिलंय कि, “शिवाजी महाराजांची शिवराई परवा परवापर्यंत पुण्याच्या मंडईत आम्ही वापरीत होतो. “७२ ही प्रस्तावना १९३३ साली लिहिलेली आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. शिवाजीमहाराजानी सुरू केलेला हा नाणेप्रकार संभाजी महाराज, राजाराममहाराज, ताराबाई, शाहू महाराज तसेच पेशव्यांच्याच नाही, तर ब्रिटिश कालखंडातसुद्धा चलनात होता, म्हणजेच वरील सर्व कालखंडात ‘शिवराई’ प्रकारची नाणी पाडली गेली. 

मात्र १८८५ साली तत्कालीन सरकारच्या आज्ञेवरून ठिकठिकाणच्या मामलेदारांनी लोकांकडे असलेली ही शिवराई नाणी गोळा करून सरकारी तिजोरीत भरण्यास सुरुवात केली होती. कारण ती रद्द करण्याचा सरकारचा इरादा होता. ही नाणी वापरातून गेली तर त्यांच्याबरोबर शिवरायांचे एक स्मारक नष्ट होईल या भीतीने या नाण्यांचा वापर पुन्हा सुरू करावा, अशी विनंती गोविंद बाबाजी जोशी-वसईकर यांनी लोकमान्य टिळकांना केली होती.

‘शिवराई’ या प्रकारच्या नाण्याचे किमान १५० प्रकार उपलब्ध आहेत.  

१८९० च्या सुमारास जवळपास २५,००० शिवराई नाणी जमवून त्यांचा अभ्यास करणारे अभ्यासक रेव्ह. अॅबट लिहितात की, ही नाणी अद्यापि चलनात आहेत.  म्हणजे कधी १८९० पर्यंत. या सगळ्या उल्लेखांवरुन ‘शिवराई’ हा नाणेप्रकार किमान विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत चलनात व स्मरणात होता. 

ब्रिटिशांनी हे शिवराई नाण्यांचे चलन बंद करण्याचा प्रयत्न किमान १८३५ सालापासून केला होता, असे अप्रकाशित कागदपत्रांवरून समजते. खानदेशचा कलेक्टर जॉन ब्रिग्ज आपल्या दि. २६ जुलै १८३६च्या पत्रात लिहितो की, खानदेशात शिवराई पैसे चलनात आहेत. त्याच पत्रात तो असाही उल्लेख करतो की, अहमदनगरच्या कलेक्टरने ही जुनी तांब्याची शिवराई नाणी एक रुपयांस ऐंशी याप्रमाणे खरेदी केलीत.

मुंबई पुराभिलेखागारातील ‘टांकसाळ’ या शीर्षकाखाली ज्या फाईल्स पुस्तकरूपाने जतन करून ठेवल्यात. त्यांतील १८३६ सालचे ६२ क्रमांकाचे एक अप्रकाशित पत्र आहे. पुण्याचा प्रभारी जिल्हाधिकारी, मुंबईच्या ई.एच. टाऊनसेंड यांना लिहिलेल्या पत्रात लिहितो की, “तांब्याची नवीन नाणी चलनात आणण्याचा शासनाचा प्रयोग सर्व बाजूंनी फसला आहे.” या सहा पानी पत्रात त्याने या अपयशाची जी मुख्य कारणमीमांसा केलेली आहे ती म्हणजे, “जुनी नाणी म्हणजेच शिवराई किंवा मराठा नाणी ही अंतर्भूत मूल्याच्या दृष्टीने सरस आहेत व लोकांमध्ये, अंगभूत गुणांमुळे प्रसिद्ध आहेत. ब्रिटिशांचे नवीन तांब्याचे चलन या नाण्यांशी स्पर्धा करू शकत नाही. ब्रिटिशांचे चलन व शिवराई चलन काही काळासाठी एकाच मूल्याच्या स्तरावर आणून, तांब्याची जुनी नाणी याच्या सराफी व्यवहारांवर कायद्याने नियंत्रण आणावे. ही जुनी नाणी वितळवली गेल्याने दुर्मिळ होतील व त्यांची जागा नवीन ब्रिटिश चलन घेईल. मात्र यासाठी सक्ती करणे आवश्यक आहे. 

ही सक्ती करताना सराफांना मात्र बट्टा घेण्याची सवलत दिली पाहीजे.” १८८२ सालच्या ठाणे जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये ‘सातारा शिवराई किंवा छत्रपती किंवा ढब’ ही नाणी रुपयास ७४ ते ८० असल्याचा उल्लेख आहे. १८३० पूर्वी ही नाणी चलनात होती, असे म्हणून पुढे ही नाणी खरेदी करण्याची योजना फसल्याचा उल्लेख आहे. भाजी इत्यादी लहानसहान खरेदीत जुन्या नाण्यांचाच वरचष्मा असल्याचाही उल्लेख आहे. ठाण्याच्या कलेक्टरने जुन्या नाण्यांत रक्कम अदा करणे दंडनीय ठरवले. १८४३ साली नवीन नाणी स्वीकारण्याची सक्ती करण्यात आली. तरीही साष्टी आणि उरणचा काही भाग वगळता १८८१ सालीही ही तांब्याची जुनी नाणी प्रचलनात होती. वसईत तर ब्रिटिश नाण्यांना बाजूला सारून ही तांब्याची नाणी चलनात आहेत, असा उल्लेख आहे. ही नाणी बंद करू नयेत म्हणून गोविंद बाबाजी जोशी यांनी विशेष प्रयत्न केले होते, याचा संदर्भ यापूर्वी आलेलाच आहे.

अशा रीतीने तांब्याच्या नवीन ब्रिटिश नाण्यांना आव्हान देत शिवराई नाणे कमी-जास्त प्रमाणात १९व्या शतकातही चलनात टिकून राहिले. इंग्रजांच्या काळात कित्येक चलन आले आणि गेले पण शिवराई मात्र टिकुन राहिली होती. अशी ही गोष्ट..

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.