डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाची तब्बल २७ वेळा नोबेलसाठी शिफारस करण्यात आली होती !

२०१८ सालच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नोबेल विजेत्यांची नावे समोर येताहेत. त्या पार्श्वभूमीवर तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळून देखील नोबेलने हुलकावणी दिलेल्या भारताच्या माजी राष्ट्रपतींविषयी आणि नोबेलसाठी नॉमिनेट करण्यात आलेल्या इतर भारतीयांविषयी जाणून घेणं औचित्यपूर्ण ठरेल.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

५ सप्टेंबर हा ज्यांचा जन्मदिवस आपण देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आणि ज्यांना आपण केवळ शिक्षक दिनापुरतंच मर्यादित ठेवलंय अशा या भारताच्या पहिल्या उपराष्ट्रपती आणि दुसऱ्या राष्ट्रपतींना तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळालं होतं.

यात १६ वेळा साहित्यातील नोबेलसाठी, तर ११ वेळा शांततेच्या नोबेलसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण प्रत्येकवेळी या पुरस्काराने त्यांना हुलकावणी दिली होती. १९३३ ते १९३७ या ५ वर्षांच्या काळात तर त्यांना सलगपणे साहित्यातील नोबेलसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

अर्थात नोबेल पुरस्काराच्या वेबसाईटवरून राधाकृष्णन यांच्याविषयीची मिळालेली ही माहिती फक्त १९६८ सालापर्यंतची उपलब्ध होऊ शकलेली माहिती आहे. कदाचित १९६८ सालानंतर देखील जर त्यांची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली असेल तर त्याची माहिती येत्या काही वर्षात उपलब्ध होऊ शकेलच.

राधाकृष्णन यांच्याव्यतिरिक्त जवाहरलाल नेहरू यांना ७ वर्षांमध्ये १३ वेळा शांततेच्या नोबेलसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ४ वर्षांमध्ये १२ वेळा याच पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

१९४८ साली गांधीजींच्या हत्येनंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून शांततेचा नोबेल पुरस्कार राखीव ठेवण्यात आला होता, कारण या पुरस्कारासाठी कुठलीही जिवंत व्यक्ती पात्र नाही, असं नोबेल समितीकडून सांगण्यात आलं होतं. कदाचित १९४८ साली हा पुरस्कार गांधीजींना मिळू शकला असता.

विनोबा भावे यांना १९६१ ते १९६७ या ७ वर्षांच्या कालावधीत सलग ७ वर्षे नोबेलसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. नोबेलसाठी नॉमिनेट करण्यात आलेल्यांच्या यादीतील ते एकमेव मराठी होत.

अर्थात नॉमिनेशनच्या संख्येचा आणि नोबेल पुरस्कार मिळण्याचा अर्थार्थी संबंध नाही. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे नोबेल विजेते आणि या पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलेले पहिले भारतीय होते.

विशेष म्हणजे त्यांच्या नावाची शिफारस फक्त एकदाच करण्यात आली होती आणि या एकमेव शिफारशीनंतर टागोरांना नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला होता. इंग्लंडच्या रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचे सदस्य असलेल्या थॉमस मूर यांनी या पुरस्कारासाठी टागोरांची शिफारस केली होती.

नोबेल पुरस्कार आणि नॉमिनेशन

नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करण्यात आलेल्यांची नावे घोषित केली जात नाहीत, अशी एक समज आपल्याकडे सर्वदूर पसरलेली आहे. या गोष्टीत तथ्य असलं तरी ही गोष्ट संपूर्णपणे खरी नाही.

कुठल्याही व्यक्तीचं नाव नोबेलसाठी नॉमिनेट करण्यात आल्यानंतर ५० वर्षांपर्यंत हे नाव समोर आणलं जात नाही. नॉमिनेशनच्या ५० वर्षानंतर मात्र ही माहिती सार्वजनिक केली जाते. त्यामुळे सध्यातरी १९६८ सालापर्यंत कुणाकुणाला नोबेलसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं, याचीच माहिती उपलब्ध होऊ शकलेली आहे. त्यानंतरच्या नॉमिनेशनची माहिती उपलब्ध नाही.

नोबेलच्या नॉमिनेशनविषयीची दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट अशी की कुठलीही व्यक्ती या पुरस्कारासाठी स्वतःच्या नावाची शिफारस करू शकत नाही. दरवर्षीच्या सप्टेबर महिन्यात नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु होते आणि जगभरातील विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, माजी नोबेल पुरस्कार विजेते आणि वेगवेगळ्या देशातील संसद सदस्यांना नोबेल पुरस्कारासाठी एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस करू शकतात.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.