जॉर्ज यांच्या उठसुठ संप घेण्याच्या भूमिकेमुळे बस कामगारांचा संप चांगलाच गंडला होता

७० च्या दशकात … आवाज कुणाचा…?…. या घोषणेवर उत्तर मिळायचं… कामगारांचा.   

ही घोषणा देणारे कामगार चळवळीचे अध्वर्यू, अघोषित ‘बंदसम्राट’ होते जॉर्ज फर्नांडिस. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अग्रणी होते. संपूर्ण देशाचं समाजकारण व राजकारण त्यांनी व्यापून टाकलं होतं. 

कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस यांची कामगार संघटनांवर एकहाती पकड होती. कामगारांच्या संपाच्या माध्यमातून निवडून आलेल्या या नेत्याला बसच्या संपानंतर मुंबईत कधीच निवडून येत आलं नाही. याचाच हा किस्सा. 

राम मनोहर लोहियांचा समाजवादी पक्ष १९६० च्या दशकात उत्तर भारतात काँग्रेसला अनेक ठिकाणी धडका मारीत होता. त्याच पक्षाच्या पुढाकाराने अनेक समाजवादी आणि जनसंघीय एकत्र आले होते. जॉर्ज अशांचा एक शिलेदार. हे साहेब मुंबईतून लोकसभेसाठी उभे राहिले. त्यांच्या विरोधात उमेदवार होते स. का. पाटील. ते मुंबई काँग्रेसचे महत्वाचे पुढारी.

मुंबईतल्या थैलीशहांच्या ‘बॅगा’ काँग्रेस पक्षासाठी खुल्या करण्याचं काम याच पाटील महोदयांकडे होतं. त्यांची ताकद मोठी. पक्षातही त्यांचा शब्द अखेरचा असायचा. त्यांचा पराभव ही त्यावेळी अशक्य कोटीतली वाटणारी गोष्ट. मात्र जॉर्जनी भिंती-भिंतीवर घोषणा लिहिली, 

होय, तुम्ही स.का. पाटील यांचा पराभव करू शकता. 

आणि परिणाम असा झाला कि स. का. पाटील यांचा पराभव करून फर्नाडिस लोकसभेवर गेले. या विजयामुळे फर्नाडिस यांना थोडा एक्स्ट्रा कॉन्फिडन्स आला. 

लोकसभेवर निवडून गेलेले फर्नाडिस यांना आपण म्हणू तीच पूर्व दिशा वाटायची. केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक दोघांनी जॉर्जबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले होते. कारण अगदी पोरकट कारणासाठी जॉर्ज महापालिका आणि बेस्टचे कामगार तसेच टॅक्सीचालकांना संपाचा आदेश देत आणि मुंबईकरांचे हाल होत.

त्यावेळी आय.ए.एस. अधिकारी जे. बी. डिसूझा बेस्टचे सरव्यवस्थापक होते. कडक शिस्तीचे डिसूझा यांनी जॉर्ज यांना धडा शिकवायचे ठरवल होत. लवकरच त्यांना तशी संधी मिळाली झाली. 

एका साध्या कारणावरून जॉर्ज यांनी संप पुकारला आणि बेस्ट सेवा थंडावली. तो दिवस होता महिन्याची २७ किंवा २८ तारीख. डिसूझा यांनी कोणत्याही कामगाराला पगार देऊ नये, असा आदेश काढला. त्याकाळात एक तारखेच्या पगारावर घरची चूल अवलंबून असायची. कारण शासनासह सर्वत्र रोख पगार देण्यात येई. 

मागोमाग डिसूझा यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांना हस्तक्षेप न करण्याची विनंती केली. जॉर्जना परस्पर धडा मिळाला तर बरंच होईल, या भावनेतून या दोघांनी पण या प्रकरणातून अंग झटकले आणि जॉर्ज तोंडघशी पडले. दरम्यान ‘बेस्ट’ आगारांमधील स्वस्त धान्य दुकानेही डिसूझा यांनी बंद केली. अशी चहूकडून कोंडी झाली आणि जॉर्ज जेरीस आले.

मुंबईकरांच हाल होत असल्यानं सर्व वर्तमानपत्र जॉर्ज यांच्यावर तुटून पडली. कामगारांचीन ही चलबिचल झाली. संप मागे घेतल्याखेरीज कोणतीही चर्चा करण्यास डिसूझा यांनी नकार दिला. एवढच नाही तर जे कामगार परतणार नाहीत त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. ही शेवटची काडी ठरली. आझाद मैदानात सभा घेऊन आणि काही थातुरमातूर धमक्या देऊन जॉर्ज यांनी संप बिनशर्त मागे घेतला. यानंतर त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले. 

मुंबईच्या फुटपाथवर वाढलेला आणि मुख्य म्हणजे सामान्यांच्या हिताची भाषा बोलणारा माणूस निवडून देताना मुंबईकरांनी कधी आपला हात आखडता घेतला नव्हता. पण ज्या कारणासाठी जॉर्जला निवडून दिलं होतं, ते कारण जॉर्जनी लक्षात ठेवलं का ? म्हणजे ज्या स.का.पाटील, मोरारजी देसाई यांच्या भांडवली वर्तनाला त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विरोध होता. तोच मुद्दा त्यांनीं नेटानं लढला का ?  

पुढं वर्ष-दोन वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीत जॉर्जचा पराभव झाला आणि जॉर्ज बिहारात स्थलांतरित झाले. 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.