‘वाजले की बारा’ची ढोलकी ऐकली की, अमृता खानविलकर डायरेक्ट डोळ्यांसमोर उभी राहते…

मराठी सिनेजगतात लावणीप्रधान सिनेमांचा एक तगडा फॅनबेस आहे. लावणीप्रधान सिनेमे आणि गाजलेल्या लावण्यांमध्ये एक लावणी जगभर फेमस आहे, ती म्हणजे संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली, गुरू ठाकूर यांच्या लेखणीतून अवतरलेली आणि बेला शेंडेंच्या आवाजात लोकांच्या काळजात घुसलेली लावणी…

मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा…

पण तिला ओरिजिनली कळस चढवला तो म्हणजे अमृता खानविलकरच्या नृत्याने. स्टार्टींगला विजय चव्हाणांची थाप ढोलकीवर पडू लागते आणि त्या कडकडाटात अमृता खानविलकर ताल धरते. आजवर जगभरात ही लावणी हजारो लाखो लोकांनी परफॉर्म केली असेल, पण अमृता खानविलकरची सर कोणाला येणार नाही.

मराठी आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्पेशल वजन अमृता खानविलकरने तयार केलेलं आहे. साडे माडे तीन मधली भोळ्या चंदनची हुशार गर्लफ्रेंड असो किंवा चोरीचा मामला मधली मॉडेल असो किंवा बेस्ट म्हणजे राझी सिनेमामधली अमृताची महत्वपूर्ण भूमिका असो, सगळीकडे तिने आपल्या भूमिका चांगल्याच गाजवल्या. त्याही आधीच्या अमृता खानविलकरच्या करिअरवर एक नजर टाकूया.

23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात अमृताचा जन्म झाला. सुरवातीच्या काळात तिचं शिक्षण मुंबईच्या अशोक अकॅडमीमधून झालं. लहानपणापासूनच व्यायाम आणि डान्सची आवड तिला होती. त्यामुळे सतत या गोष्टींचा सराव चालु असायचा. मुंबईच्या सेंट झेव्हीअर कॉलेजमध्ये शिकून तिने अर्थशास्त्रामध्ये डिग्री मिळवली. कॉलेज काळातच मॉडेलिंग करण्याकडे ती वळली होती.

2004 मध्ये अमृताला झी इंडिया चॅनलचा रियालिटी शो बेस्ट सिनेस्टार की खोज मध्ये पाहण्यात आलं, या शोमध्ये ती तिसऱ्या स्थानावर होती. नंतर अनेक छोटीमोठी कामं अमृता करत राहिली आणि 2006 साली तिला पहिला मराठी चित्रपट मिळाला तो म्हणजे गोलमाल. मराठीतलं काम बघून तिला बॉलिवूडचं बोलावणं आलं. 2008 साली फुंक या सिनेमात केलेल्या अभिनयासाठी स्टारडस्ट अवॉर्डला तिला नॉमिनेशन होतं. याच सिनेमाचा दुसरा भाग म्हणून आलेला फुंक 2 मध्ये सुद्धा अमृताने दमदार काम केलं होतं.

अमृता खानविलकरच्या सिनेकरिअर वर जर नजर टाकली तर प्रामुख्याने हिम्मतवाला, शाळा, बाजी, चोरीचा मामला, साडे माडे तीन, राझी, सतरंगी रे, अर्जुन, सत्यमेव जयते हे सिनेमे दिसून येतात. 2015 सालच्या नच बलीये या डान्स रियालिटी शोमध्ये पती हिमांशू मल्होत्रा सोबत तिने सहभाग घेतला होता आणि स्पर्धा जिंकलीसुद्धा होती. 2015 मध्ये झलक दिखला जा आणि 2017 मध्ये डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोजमध्ये अमृताने सहभाग नोंदवला होता.

बरीच कामं अमृता करत आहे, पण वाजले की बारा म्हणल्यावर डोळ्यापुढे अमृता खानविलकरचाच चेहरा येतो हे सत्य आपण नाकारू शकत नाही. या गाण्यामुळे जगभर अमृताचा फॅनबेस तयार झाला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.