कोल्हापूरात फुटबॉलचा विकास कोणामुळे झाला असेल तर तो शाहू महाराजांच्या प्रयत्नांमुळेच !

हिंदुस्थान देशातील सर्व संस्थानांमध्ये कोल्हापूर संस्थानाची योग्यता विशेष आहे. गेल्या शतकात आमच्या लोकांनी हिंदू राज्य स्थापण्यास प्रारंभ केला आणि ते बहुतेक स्थापिले होतेच. त्याचे एक मूळ हल्ली करवीर क्षेत्रातच काय ते राहिले आहे. कोल्हापूरचे राज्य ज्यांनी स्थापन केले त्यांच्या वंशातील पुरुषांनी जी महत्कृत्ये केली, जो देशाभिमान दाखविला व जी कीर्ती संपादन केली, ती इतिहासविश्रुत आहे.
– लो. टिळक (केसरी- अग्रलेख : १८७४)

लोकमान्य टिळकांनी करवीर संस्थान अर्थातच कोल्हापूरविषयी काढलेले हे उद्गार आज ही सार्थ ठरतील असेच आहेत. याचा प्रत्यय येतो कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडे पाहिल्यावर.

करवीर संस्थान हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे संस्थान. मराठय़ांच्या इतिहासात त्याला असाधारण असे महत्त्व आहे. कृष्णा, कोयना, कुंभी कासारी, हळदी, तुळशी, हिरण्यकेशी, घटप्रभा, पंचगंगा व दूधगंगा या नद्यांच्या वास्तव्यामुळे सुपीक असणारा हा प्रदेश.

या संस्थानाने अनेक कर्तबगार इतिहासपुरुष महाराष्ट्राला दिले आहेत. महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज ते राजर्षी शाहू महाराजांच्या देदीप्यमान कामगिरीचा संबंध या संस्थानाशी आहे. करवीर हे छत्रपतींच्या थेट वंशजांचे संस्थान.

सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आहेत छत्रपती शाहूमहाराज.

नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत. याआधीचे महाराज छत्रपती शहाजीराजे यांच्या मुलीचे ते चिरंजीव. पूर्वीचे नाव दिलीपसिंह. त्यांचा जन्म मुंबईत ७ ऑगस्ट १९४८ ला झाला. नागपूर आणि बंगळूर इथं बिशप कॉटन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यावर इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशास्त्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयांतून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली.

पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ९ मार्च १९७० मध्ये मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. शाहू महाराजांना खेळामध्ये विशेषतः फुटबॉल आणि कुस्ती यांची विशेष आवड आहे. फुटबॉलवर तर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. या प्रेमाखातर त्यांनी जर्मनीला भेट देऊन तेथील विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचे काही सामने पाहिले.

छत्रपती शाहू महाराजांचे वैशिष्टय़ म्हणजे राजघराण्याची कोणतीही झूल त्यांच्या अंगावर किंवा वागण्यात आढळत नाही. साधेपणा, ऋजुता आणि सृजनत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष. विषेश म्हणजे ते उदारमतवादी आहेत. कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सभा-समारंभांतून वावर असतो. समाजातील व राजकारणातील व्यक्तींशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.

सध्याच्या छत्रपती महाराजांना राजकारणाची आवड आहे. त्यांनी राजकारणात सक्रिय होता येईल का, हेही आजमावले. पण त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात सक्रीय सहभाग घेतला नाही. त्याबद्दल ते म्हणतात, ‘माझे मन राजकारणाच्या सीमारेषेवर नेहमी राहिले. हवे तर आपण त्याला ‘पेरीफेरी’ म्हणूयात.मात्र, छत्रपती शाहूमहाराजांचे दोन्ही पुत्र राजकारणात आहेत.

कोल्हापूरमधील फुटबॉलचा खऱ्या अर्थाने विकास कोणामुळे झाला असेल तर तो शाहू महाराज यांच्या प्रयत्नांमुळे! कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचे ‘पेट्रन इन चिफ’ म्हणून काम करणाऱ्या शाहू महाराज यांनी भव्य अशा शाहू स्टेडियमची उभारणी केली आहे. महाराजांनी फुटबॉलवाढीसाठी नुसतेच प्रयत्न केले नाहीत, तर खेळातील दर्जा सुधारण्यावरही अधिक जोर दिला.

कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच आयलीग सेकंड डिव्हिजन फुटबॉल स्पर्धा त्यांच्याच प्रेरणेने आणि प्रयत्नांतून यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर भारत विरुद्ध हॉलंड हा आंतरराष्ट्रीय महिलांचा फुटबॉल सामना कोल्हापुरात आयोजित करण्यात शाहू महाराजांनी पुढाकार घेतला.

राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार पुढे चालू ठेवत आजही त्यांनी आपल्यासोबत सर्वच जाती-धर्मांच्या लोकांना नेले आहे. तसेच सर्वच जाती-धर्मांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.