सभापतींनी भाषणावर टाळ्या वाजवण्याची प्रथा नव्हती पण त्यांना राहवलं नाही

सतारवादक भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण यासह अनेक पुरस्कारांचे मानकरी म्हणजे रविशंकर…रविशंकर यांचे शिक्षण वाराणसी आणि पॅरिसमध्ये झाले आणि ते १९४९ मध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये रुजू झाले. रविशंकर हे १९८६ ते १९९२ या काळात राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते…एक कलाकार राज्यसभेचा सदस्य होणं म्हणजे विलक्षण योगच…. 

त्यांच्याशिवाय राज्यसभेत साहित्य, संगीत, चित्रकला या क्षेत्रांतील अमृता प्रीतम, आर. के. नारायण, रविशंकर, एम. एफ. हुसेन अशी अतिरथी, महारथी मंडळी सदस्य आहेत. आपल्याच कलेच्या विश्वात धुंद होणाऱ्या या मंडळींना राजकारणाचे क्षेत्र हे बावरून टाकते, रुक्ष वाटते की त्यात ते रमतात हे जाणून घेण्याचे साहजिकच औत्सुक्य होते.

एकदा एका अधिवेशनात संसद भवनाच्या कँटीनमध्ये भोजनाच्या टेबलावर रविशंकर व आर. के. नारायण योगायोगाने बसलेले पाहून अनेकजण हरकून जात असत. संगीतातील सुसंवादाची अनोखी जादू सतारीच्या तारांतून प्रसवणाऱ्या रविशंकर यांना राजकारणातला सूर अजून गवसायचा होता आणि नारायण यांनाही या नव्या विश्वाची जानपछान व्हायची होती…पण हळूहळू ते या प्रवाहात आले…

आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ वर तेंव्हा दूरदर्शनवर मालिका चालू असायची आणि ती खूपच लोकप्रिय झाली होती. त्यात रंगवलेला कंजूष इसम आपल्याला कसा भेटलेला आहे, असे नारायण सांगत असल्याचे. त्यादरम्यान राज्यसभेचा खासदार म्हणून त्यांना दिला गेलेला फ्लॅट त्यांनी घेतला नव्हता. एका नातेवाइकाकडेच ते राहात असायचे. “मी एकटा फ्लॅटमध्ये राहून काय करू, असे ते सांगत असत, त्यावर इतर जण त्यांना सुचवत कि, ‘तो फ्लॅट घेतला तर तुम्हाला लेखनाला छान निवांतपणा, शांतपणा मिळेल की.’ त्यावर आर. के. नारायण म्हणत कि, ‘मला लेखनाला शांतपणा चालतच नाही. आजूबाजूला आवाज, कोलाहल असला मी मग माझा लेखनाचा मूड असतो.’ ‘या दृष्टीने राज्यसभा तर एकदम उपयुक्त, कारण सतत कोणी ना कोणी सदस्य भाषण करत असतो, आरडा ओरडा चालू असतो; तेव्हा तुमच्या लिखाणाला अगदी सुंदर वातावरण निर्मिती आहे. तुम्ही सभागृहातच बसल्या बसल्या काही लिहिता काय?” असे विचारल्यावर ते म्हणायचे, “अजून तरी सुरुवात केली नाही, पण करायचा विचार आहे.”

दुसरे कलाकार म्हणजे, चित्रकार हुसेन. ते तर भर सभागृहात बसल्या बसल्या स्केचेस काढायला सुरुवात करायचे. सदनात चर्चा चालू असताना वक्त्यांची भराभर पोर्ट्रेट्स ते काढत असत. असा खासदारांच्या स्केचेसचा आल्बमच ते बनवणार आहेत, आर.के नारायण सांगत असत. त्यांच्याशिवाय अमृता प्रीतम, हुसेन हे सभागृहात बऱ्याचदा उपस्थित असलेले दिसतात. हुसेन हे कधीच पादत्राणे वापरत नाहीत. संसदेतही ते अनवाणीच वावरताना दिसायचे. हुसेन हे राज्यसभेचे सदस्य, पण चुकून एकदा ते लोकसभेतच जाऊन बसले होते…हे सर्व कलाकार मंडळींनी सभागृहात आतापर्यंत मौन धारण करून बसत असत..राजकारणात, भाषणं करण्यात त्यांना तितकासा रस नसायचा.

असो पण मेन किस्सा हा आहे कि, आपण ज्यांच्याबद्दल वर बोललो ते म्हणजे रविशंकर. त्यांच्या एका भाषणामुळे सभापतींनि भाषणावर टाळ्या वाजवायची नवीन प्रथा चालू केली होती.

त्याच दरम्यान डिसेंबर महिन्यात पंडित रविशंकर यांनी खासदार म्हणून आपले पहिले भाषण केले होते. या भाषणात रविशंकर साहजिकच संगीताबद्दल आत्मीयतेने बोलत होते. त्या काळात अष्टपैलू वाद्य संगीतकारांपैकी एक म्हणून त्यांना ओळख होती. त्यांच्या भाषणात मुद्दे असे होते कि,  तरुणांनी केवळ रॉक, पॉप, डिस्को, चित्रपट संगीतात रमण्यापेक्षा त्यांना अभिजात संगीताचाही आस्वाद घेता यावा, म्हणून शाळांमधून अगदी नर्सरीपासून अभ्यासक्रमात संगीत हा सक्तीचा विषय ठेवावा, अशी रविशंकर यांनी सूचना केली. अगदी मुद्देसूद भाषण ना आरडा-ओरड ना आक्रस्ताळेपणा….अगदी शांतपणे ते भाषण करत होते. सगळ्या सभागृहात टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी गंभीर शांतता होती. आणि प्रत्येकांच्या कानावर रविशंकर यांचे बोल पडत होते.

ताल, स्वर आणि लयबद्ध अशी संगीत शब्दावली वापरून रविशंकर यांनी आपला मुद्दा धिम्या लयीतच पण सुरेखपणे मांडला. त्यावेळी सभापती आर. वेंकटरामन यांना देखील राहवले नाही. “सभापती हा अलिप्त असतो. त्याने कोणाच्या भाषणावर टाळ्या वाजवण्याची प्रथा नाही. परंतु आज मी नवी प्रथा सुरू करतो.” असे म्हणून वेंकटरामन यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.