पैसे नाहीत म्हणून हॉस्पिटलने ढसाळांना उपचार नाकारले तेव्हा सुशीलकुमार शिंदे मदतीला धावले

मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी विद्रोही कवी नामदेव ढसाळ

निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव ढसाळ. साठीच्या दशकातला असा एक कवी ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवे परिमाण मिळवून दिले.

नामदेव ढसाळ यांचा जन्म पुण्याचा. ढसाळ लहानपणीच वडिलांसोबत मुंबईत आले. इथल्या गोलपिठात त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचे वडील खाटीकखान्यात खाटीक म्हणून काम करत. ढसाळांचं पाचवीपासूनचं शिक्षण मुंबईतच झालं. दहावीनंतर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. सुरुवातीच्या काळात ढसाळांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं, वेश्यावस्तीतही काम केलं. याच काळात चळवळीकडे ते वळले.

ढसाळांच्या कविता या मुंबईच्या कामाठीपुऱ्यावर आधारलेल्या. कारण गोलपिठा या रेडलाइट म्हणून ओळखल्या परिसराततुनच त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली. दहावी नंतर नामदेव ढसाळ यांनी बरीच काम केली. ज्यात त्यांनी काही काळ टॅक्सी चालवली. मग पुढे काही दिवस पाटबंधारे खात्यात शिपायाची नोकरी केली.

टॅक्सी ड्रायव्हर असताना ढसाळ एकदा एका कविसंमेलनाला गेले होते. तिथं त्यांनी विचारलं की, मलाही कविता वाचायचीय. हा गबाळा मुलगा काय कविता वाचणार या हेटाळणीनं त्यांना परवानगी दिली. पण त्यांच्या कविता ऐकून सगळे अवाक झाले. आणि मग याच काळात अनुभवलेलं जगं त्यांच्या लेखणीतुन उतरु लागलं. कवितेच्या रुपात कागदावर अन बघता बघता ‘गोलपिठा’ नावाचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला.

गोलपिठामधून नामदेव ढसाळांनी शोषित समाजाची जी वेदना मांडली, ती इतकी अस्सल होती की या कवितांनी प्रस्थापित मापदंड बदलले. ढसाळ त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा.

या भागात दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही. जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात. जिथे दिवस रात्री सुरू होतो. हेच चित्र त्यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवलं. हेच ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर

मनगटावरच्या चमेली गजर्‍यात कवळया कलेजीची शिकार उरकून शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक पदोपदी दिसतात. जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात. जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.

त्यांच्या गोलपिठा या कविता संग्रहानं मराठी कवितांचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्याच्या विश्वात दलितांची जळजळीत, वास्तव ओकणारी बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.

यातूनच पुढे नामदेव ढसाळ यांनीअमेरिकेतल्या कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॅक पॅंथरच्या धर्तीवर दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे १९७२ ला स्थापन केली.

ढसाळ कधी जातीपुरते, एका धर्मापुरते, एका राज्यापुरते किंवा एका भाषेपुरते मर्यादित राहिले नाहीत. कारण ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचं दुःख त्याला ढसाळांच्या लेखणीतन दिसतं.

आणि याचमुळे ढसाळ राजकारण्यांना ही आपलेसे वाटायचे. यात एक नाव म्हणजे सुशीलकुमार शिंदे !

डिसेंबर १९८० मध्ये ढसाळ आजारी पडले. जानेवारी १९८१ मध्ये त्यांना ‘मायस्थेनिया ग्रेविस’ हा आजार असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर ३०-३२ वर्षे ते या आजाराशी लढत होते. पुढे २०१४ मध्ये त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता तेव्हा त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण त्यावेळी फक्त वीस हजार रुपये कमी पडत होते म्हणून हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करून घेत नव्हते. अशावेळी ढसाळांच्या पत्नी मलिका यांनी सुशीलकुमार शिंदेंना फोन केला. तेव्हा सुशीलकुमार शिंदेंनी लगेचच दोन लाख रुपये पाठवून दिले. पण शिंदेंनी या केलेल्या मदतीची कुठेच वाच्यता केली नव्हती.

ही आठवण मलिका ढसाळ यांनीच आपल्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितली होती.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.