बहुजन हे नाव गर्वाने घेणं शक्य झालंय ते कांशीराम यांच्यामुळंच..

उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाच्या झालेल्या दारुण अवस्थेमुळे बहुजन चळवळीच्या ऱ्हासाबद्दल जोरदार चर्चा घडू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात कायमच ‘बहुजन’ हा शब्द चर्चेत येतो. तसं बघायला गेलं तर बहुजन या शब्दाचा राजकीयदृष्ट्या वापर होण्याची सुरवात महाराष्ट्रातूनच झाली असं म्हणता येईल.

या शब्दाचा सर्वात जुना वापर जो आम्हाला सापडला तो म्हणजे १९२० चा जेव्हा विठ्ठल रामजी शिंदे यांना बहुजन पक्ष नावाची राजकीय संघटना काढली होती.

१९२५ मध्ये प्रकाशित झालेल्या सत्यशोधक दिनकरराव जावळीकर यांच्या ‘देशाचे दुष्मन’ या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रस्तावनेतही बहुजन हा शब्दप्रयोग सापडतो. १९३६ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी महार कॉन्फरन्सची जाहिरात करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रिकेतही बहुजन शब्द वापरण्यात आला होता. याच कॉन्फरन्समध्ये डॉ. आंबेडकरांनी त्यांचे प्रसिद्ध मुक्ति कोन पथे (मोक्षाचा कोणता मार्ग) हे फेमस भाषण दिले होते.

तसेच महाराष्ट्रातल्या सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ या चळवळींमुळे बहुजन शब्दला एक वेगळंच वलंय आलं आणि समाजात हा शब्द मेनस्ट्रीम पण झाला.

पण बहुजन या शब्दला खऱ्या अर्थाने सत्तेत बसवलं ते कांशीराम यांनीच. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पंजाब मध्ये जन्मलेल्या कांशीराम यांना बहुजनांसाठी लढण्याचं बाळकडू महाराष्ट्रातूनच मिळालं होतं. 

पंजाबमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कांशीराम यांनी पुण्याच्या एक्सप्लोझिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी (ERDL) मध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ERDLच्या नोंदींमध्ये  डॉ.बी.आर. आंबेडकरांच्या जयंती निम्मित अधिकृत सार्वजनिक सुट्टी होती पण ती १९५७ मध्ये मध्ये अचानक मागे घेण्यात आली.  याविरोधात आवाज उठवला दीनभान या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने. काही दलित कर्मचार्‍यांसह त्याने व्यवस्थापनाचा जोरदार विरोध केला. 

पण त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली – त्यांच्या ‘गैरवर्तणुकी’मुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. आणि त्यावेळी उच्चपदस्थ असूनही कांशीराम दीनभानाच्या समर्थनार्थ पुढे आले आणि त्यांच्या कायदेशीर लढ्यात त्यांना मदत केली.

त्यावेळी दिनभान हा भंगी समाजाचा आहे तर तुम्ही चांभार समाजाचे त्यामुळं तुम्ही यापासून दूरच रहा असा सल्ला कांशीराम यांना देण्यात आला.

पण जातीने वेगळे असलो तरी सवर्ण समाजाच्या दृष्टीने आपले स्थान सेमच असल्याचं ओळखून दोघांमधला बहुजन हा धागा पकडून कांशीराम दिनभानच्या मागे उभे राहिले.

दुसरी घटना, ज्यामध्ये पात्रता असतानाही  दलित महिलेला नोकरी नाकारण्यात आली होती तेव्हाही कांशीराम मदतीसाठी पुढे आले. अशा घटनांनी कांशीराम यांनी बहुजनांच्या हक्कांसाठी काम करण्यास प्रोत्साहित केले.

आणि मग क्लास वनची नोकरी सोडून कांशीराम बहुजन समाजाला एकत्रित आण्यासाठी आणण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली.  सामाजिक, सांस्कृतिक, आणि राजकीय ही तिन्ही क्षेत्र त्यांनी निवडली होती.

त्यापैकी मेन स्ट्रीम मीडियामध्ये जास्त चर्चिले न गेलेले त्यांचे काम होते सांस्कृतिक क्षेत्रातले. 

BAMCEF, DS4 आणि BRC हे बहुजन चळवळीचे तीन सांस्कृतिक स्तंभ मानले जाऊ शकतात. कांशीराम यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, बहुजन समाज पक्ष (BSP) हे राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आहे तर ते साध्य करण्यासाठी इतर तीन महत्त्वाची मीडियम आहेत.

BAMCEF च्या जाहीरनाम्यात बहुजन समाजातील विविध विचार प्रक्रिया एकत्र आणण्यासाठी एक साहित्यिक शाखाकाढण्याचे विशेष आवाहन केले गेले होते. बहुजन साहित्य परंपरेशी संलग्नता साधून बहुजन समाजाचा इतिहास आणि  अनुभवात्मक वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न होता. त्याचप्रमाणे बहुजनांमध्ये जातीविरोधी चेतना जागृत करण्यासाठी जागृती जथ्थेच्या निर्मितीबाबतही या जाहीरनाम्यात चर्चा करण्यात आली होती.

BAMCEF सभांमध्ये, सांस्कृतिक सादरीकरण हा अविभाज्य भाग होता आणि त्यात पोस्टर्स, गाणी गाणे कविता म्हणणे यांचा समावेश होता.

१७ मे १९८० रोजी दिल्लीच्या शाहदरा येथे BAMCEF च्या सुरुवातीच्या बैठकींपैकी एक होता, ज्याची थीम होती ‘चलता फिरता आंबेडकर मेळा’, ज्यामध्ये डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि तत्त्वज्ञान प्रदर्शित करण्यात आली होती.

यामुळं दोन गोष्टी होत होत्या एक म्हणजे बहुजन समाज एकत्र येत होता, स्वतःच्या गोष्टी सांगत होता, समाजाचं साहित्य आणि अनुभव मेनस्ट्रीम होत होतं. आणि त्याचबरोबर बहुजन समाजाला आयडियल मिळत होते , समाजाचा न्यूनगंड दूर होत होता.

दलित शोषित समाज संघर्ष समिती, किंवा DS4, ६ डिसेंबर १९८१ रोजी सुरू करण्यात आली. 

तिने विद्यार्थी, तरुण आणि महिलांच्या संघर्षांवर विशेष भर दिला. ही सांस्कृतिक शाखा पंजाबपासून सुरू झाली आणि हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरली. कांशीराम यांनी बहुजनांना त्यांच्या जातीविरोधी चेतना शेअर करण्यासाठी व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने DS4 सुरू केले. द ओप्रेस्ड इंडियन च्या  १९८२ च्या एका लेखात कांशीराम म्हणाले होते की ८५ टक्के बहुजन मतदारांना संघटित करण्यासाठी आणि त्यांना राजकारणासाठी तयार करण्यासाठी DS4 हे प्रमुख पाऊल आहे जेणेकरून पुढे जाऊन ते नेतृत्वाची भूमिका घेऊ शकतील.

बुद्धिस्ट रिसर्च सेंटर किंवा BRC ची स्थापना देखील कांशीराम यांनी केली होती. त्यांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा मानस होता. कांशीराम यांनी घोषणा केली होती की ते मायावती यांच्या सोबत २००६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारतील, ज्या वर्षी आंबेडकरांच्या धर्मांतराचा सुवर्णमहोत्सवी वर्ष होता. मात्र त्याआधीच त्यांना मृत्यूने कवटाळले.

कांशीराम -द लीडर ऑफ दलित या पुस्तकात बद्रीनारायण सांगतात जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी जातीचाच वापर केला पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. 

त्यासाठी शोषित जातींना भले जातीच्या आधारावर एकत्र आले तरी चालले. कारण त्यांनी एकत्र येऊन राजकीय आणि सामाजिक सत्ता मिळवून स्टेटस वाढवल्याशिवाय त्यांना समाजात  बरोबरीचे स्थान मिळणार नाही. आणि त्यांनी त्यांच्या ३ कल्चरल ओर्गानिझेशनच्या माध्यमातून तो मेसेज बरोबर पोहोचवला होता. त्यामुळे इतक्या दिवस जात हा आपला विकनेस मानणारा बहुजन समाज अभिमानाने जात सांगून सत्तेत बसला.

कांशीराम यांना जाऊन जवळपास दीड दशक झालं तरी त्यांचे विचार मात्र तेवढ्याच ताकदीनं पुढे जातायेत. राजकीय जाणकार सांगतात जेव्हा चंद्रशेखर आझाद रावण यांसारखे तरुण दलित नेते जेव्हा अभिमानाने प्राऊड चमार असं लिहतात त्यामागे कांशीराम यांचे विचार आहेत.

बहुजन विचारवंतांची नवीन पिढी जेव्हा जातिव्यवस्थेवर ठामपणे बोलते. सोशल मीडियावर ट्रेंड चालवून आपले मुद्दे हायलाइट करते,नॅशनल दस्तक, द शूद्र सारखी मीडिया हाउसेस काढून स्वतःचे प्रश्न मांडते, जस्ट सवर्ण थिंग्स, बॅडॲस बहुजन मिम्स यांसारख्या पेजेसमधून जातिव्यवस्थीची थट्टा उडवते त्यामागे मान्यवर कांशीराम यांची प्रेरणा असते एवढं नक्की.

यामुळेच बहुजन समाज पक्षाचा पराभव हा फक्त राजकीय क्षेत्रातील आहे, बाकी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुजन चळवळ घट्ट पाय रोवून उभं आहे हा बसपा समर्थकांचा दावा याचा फॅक्टस वर आधारित आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.