हिंदु-मुस्लीम : गेल्या दोन महिन्यातल्या या घटना देशातलं वातावरण सांगण्यासाठी बास आहेत

तुम्हाला तुमच्या परदेशातल्या कुण्या मैत्रणीने- मित्रांनी विचारलंच,

“क्या हाल हैं आपके देश में ?” त्यावर तुम्ही काय उत्तर द्याल ???

करा करा विचार करा अन मग सांगा..

कारण सद्या देशातील वातावरण काय ठीक नाही. गेला काही काळ संपूर्ण देश धार्मिक-जातीय तणावात धुमसत आहे. कुठे दंगे होतायेत. कुणी नॉनव्हेजवरून भांडतंय तर कुणी हलाल मटण खायचं की नाही यावरून भांडतंय. तर कुणी नेते भोंग्याचा मुद्दा उकरून काढतायेत…

देशात नुसतं हिंदू-मुस्लिम एवढंच चाललंय. 

गेल्या दोन महिन्यातल्या या १० घटना देशातलं वातावरण सांगण्यासाठी बास आहेत. कोणत्या ? क्रमाक्रमाने बघत चला अन विचार करा आपला देश सद्या कोणत्या परिस्थितीत उभाय..

१. सर्वात पहिला वाद निर्माण झाला तो म्हणजे कर्नाटकातलं हिजाब प्रकरण….

अलीकडच्या काळात सर्वात जास्त चर्चेतला आणि वादातला मुद्दा म्हणजे कर्नाटकात हिजाबचा वाद.

उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हिजाब हा गणवेशाचा भाग नाही आणि त्यामुळे मुलींना हिजाब घालून वर्गात बसू देता येणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर याच मुद्द्यावरून ६ मुली डिसेंबर २०२१ पासून आंदोलन करतायेत त्याचं म्हणणं आहे कि, हिजाब घालणे हे आमच्या धर्म स्वातंत्र्याच्या कक्षेत येते. त्यामुळे आम्हाला हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी मिळावी.

हा हिजाब वाद नको तितक्या पद्धतीने ताणला गेला आणि याला अर्थातच हिंदू-मुस्लिम संघर्षाचं वळण मिळालं. शेवटी हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. 

न्यायालयाने निकाल दिला, हिजाब घालणे हा इस्लामच्या अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही, घटनेच्या आर्टिकल २५ च्या अंतर्गत त्यास सरंक्षक मिळत नाही.

हिजाबच्या वादावर अनेक राजकीय नेते आणि सेलेब्रेटींनी आपली मते मांडली. थोडक्यात याच प्रकरणावरून पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारी देशांसोबत भारताची तुलना केली गेली.

२. त्यानंतर काश्मिर फाईल्स चित्रपट आला तो ‘जुनाच’ वाद घेऊन…

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांचं पलायन आणि त्यांची हत्या या घटनेवर आधारित आहे. बाकी त्यात दाखवलेला इतिहास आपल्याला माहितीच आहे. तेच सत्य इतिहास आपण आपल्या चित्रपटात दाखवल्याचं अग्निहोत्री यांनी म्हंटलंय.

चित्रपट रिलीज झाला अन अचानकच चित्र बदललं. थोडक्यात या चित्रपटातले दाखवलेले काही दृश्य हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारे ठरले अशी टीका देखील सर्वच स्तरातून उमटली. कारण अनेक चित्रपट गृहांत मुस्लिमविरोधी घोषणा दिल्या गेल्या. सोशल मीडियावर ट्रेंड चालवले गेले.

या चित्रपटाच्या वादामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची एंट्री झाली. त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा म्हणून प्रमोशन केलं. तसेच यात श्री श्री रविशंकर, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचाही समावेश आहे.  तेच दुसरीकडे राहुल गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांनी या चित्रपटावर टीका केली.   

भाजपशासित अनेक राज्यांमध्ये ते करमुक्त घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातही करमुक्त करावा म्हणून मागणी होत आहे.

या चित्रपटाचा वाद अजूनही थांबलेला नाहीये, उलट त्याला वरचेवर धार्मिक रंग दिला जातोय. थोडक्यात या वादात बॉलिवूड देखील ओढलं गेलं, गटातटाचं राजकारण झालं.  पण यात एक मात्र झालं कित्यके वर्ष जुना वाद उकरला गेला अन संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून गेलं. परिणामी हिंदू मुस्लिम  तणाव वाढला.

कर्नाटकातल्या हिजाबचा वाद अन चालू असलेला काश्मीर फाईल्सचा वाद थांबला नाही तोच खाण्यावरून वातावरण गरम झालं.

३. हलाल- झटका मटणाचा वाद 

हा वाद म्हणजे मटण खायचं की नाही खायचं यावरून नाही तर कोणत्या प्रकारच मटण खायचं यावरून सुरु होता.

विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे कि, हलाल मटण हा एक प्रकारचा आर्थिक जिहाद आहे. हलाल मटण विकत मुस्लिम समाज मांस बाजारात आपली मक्तेदारी दाखवतोय. हा मुस्लिम समाज मांस विकण्यापूर्वी अल्लाहला अर्पण करतात आणि मग विकायला सुरुवात होते. हा त्यांच्या धर्माचा मुद्दा असेल पण आमच्याही धर्माचा मुद्दा आहेच कि, थोडक्यात त्यांच्या देवाला अर्पण केलेलं मांस हिंदूंनी खाणं म्हणजे कुणाच्या तरी उरलेल्या अन्नासारखं आहे. 

त्याचमुळे या हालालवर बहिष्कार टाकला पाहिजे. हे तेंव्हाच शक्य होईल जेंव्हा हिंदू मुस्लिमांच्या हलाल मटणावर बहिष्कार टाकतील.

हेच नाही तर हलाल मटणावरून मागे दिल्लीत असाच वाद निर्माण होता. दिल्ली महानगरपालिका, झोमॅटो आणि कृषी व खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडा या वादात ओढलं गेलं होतं. यापूर्वी निर्यात करत असणार मांस हे हलालच असावं अशी अट होती. आत्ता केंद्र सरकारच्या अपेडाने ही अट रद्दबातल केली होती.

हलाल मटणाचा वादग्रस्त विषय खाण्याकडून धार्मिकतेकडे आणि धार्मिकतेकडून राजकीय बनला. कारण असल्या कट्टर मागणीला राज्यातील भाजपच्या मातब्बर नेत्यांनी देखील सपोर्ट केला होता.

४. आता मटणाचा वाद थांबलाच नाही त्यात महाराष्ट्रात मशिदीवरच्या भोंग्यांचा वाद सुरु झाला 

मनसे प्रमुख राज ठाकरे गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलले. भोंगे काढा नाहीतर मशिदीसमोर मोठ्याने हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या आधी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत, लाऊडस्पीकवरील सर्व अजान बंद झाले पाहिजेत अशी मागणी केली होती.

त्यात अलीकडच्या ‘उत्तर’ सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३ मे रोजी ईदची डेडलाईन दिली आहे. याचसोबत त्यांनी समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा असावा अशी मागणी केली.

मशिदीवरच्या अजानवरून प्रत्येक पक्ष स्वतःचा धार्मिक आणि राजकीय अजेंडा चालवतो असं म्हणलं जातंय. पण याच्या पुढं जाऊन सामान्य नागरिकांचं बघितलं तर, लाऊडस्पिकर वरची अजान असो वा मोठ्याने वाजवली जाणारी देवांची गाणी, भजन असोत हे सगळंच बंद झालं पाहिजे. 

पण वादाला  राजकीय रंग आल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांची मागणी टोकाची होत चालली असून हिंदू-मुस्लिम संघर्षाची भीती व्यक्त केली जातेय. जे कोणत्याच धर्मासाठी परवडणारी नाहीये.

५. रामनवमी हिंसाचार 

अगदी कालपरवाच्या रामनवमी च्या दिवशी देशात अनेक ठिकाणी हिंसाचार पाहायला मिळाला ज्यात वेगवेगळ्या राज्यांत २ जणांचा मृत्यू, ३२ जखमी आणि अनेकांना अटक झालेली. देशात ठीकठिकाणी रामनवमीच्या उत्सवाला गालबोट लागलं. 

अनेक राज्यांमध्ये हिंसाचार, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांत धार्मिक आणि जातीय तणाव दिसून आला. या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर ३६ जण जखमी झाल्याच्या बातम्या आल्यात.

गुजरातमध्ये हिम्मतनगर शहरातील छापरिया भागात रामनवमीची मिरवणूक निघाली तेव्हा दोन समुदायांच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. अश्याच घटना इतरही राज्यात घडल्या.

६. जेएनयु मध्ये नॉनव्हेज वरून विध्यार्थ्यांच्या दोन गटांत संघर्ष 

जेएनयुच्या कॅम्पसमध्ये एबीव्हीपी आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनेच्या गटात संघर्ष झाला. याबाबतीत दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. जेएनयूच्या मेसमध्ये मांसाहार जेवणावरून हा वाद झाल्याचं सांगण्यात येतंय…रामनवमीच्या रात्री मेसमध्ये मांसाहार देण्यावरून कावेरी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली.

एबीव्हीपी आरोप करतेय कि, रामनवमी निमित्त युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत पूजेत व्यत्यय आणला.

तर डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांचं म्हणणंय, हॉस्टेलच्या मेसमध्ये नॉनव्हेज जेवण तयार केले जात होते. त्याला एबीव्हीपीने विरोध केला होता. या दोन्ही गटात हाणामारी झाली त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

पण विद्यापीठाच्या आवारात अशा प्रकारच्या संघर्षांची ही पहिली वेळ नसली तरी रामनवमीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे या मुद्द्याला धार्मिक वळण मिळालं.

७. रामनवमीच्याच दिवशी मध्यप्रदेश मध्ये धार्मिक दंगली उसळल्या आणि घरांवर बुलडोझर चालवण्यात आले.

राम नवमीच्या दिवशी मध्यप्रदेशात हिंसाचार उसळला. धार्मिक दंगली उसळल्या. त्यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री म्हणाले, ज्या ज्या घरावरून दगड आले ती घरे बुलडोजर लावून पाडण्यात येतील आणि तसंच करण्यात आलं. एकूण ४५ घरं पाडण्यात आली. 

एकंदरीत प्रकरण असंय की, देशभरातच रामनवमीच्या दिवशी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. अशीच एक शोभायात्रा मध्यप्रदेशातल्या खरनोग जिल्ह्यात काढण्यात आली. 

या यात्रेदरम्यान गाणी वाजवण्यावरून हिंदू आणि मुस्लीम धर्मीय लोकांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात आलं. गाण्यांवरून मुस्लीम धर्मीय लोकांनी आक्षेप घेतला व त्यावरून दंगल पेटल्याची माहिती देण्यात आली. 

त्यानंतर तणाव वाढला आणि यात्रेवर दगडफेक करण्यात येत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. आजूबाजूच्या घरावरून दगड टाकणाऱ्या महिला देखील या व्हिडीओमध्ये दिसत होत्या. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात असणाऱ्या झीरो टॉलरेंस पॉलिसीचा उल्लेख केला आणि ज्या घरावरून दगडफेक झाली ती घरे बुलडोजरने पाडण्यात येतील अस सांगितलं…आणि तसंच त्यांनी करून देखील दाखवलं.

नंतर बुलडोझर चालवण्याची कारवाई अतिक्रमणाच्या कायद्याखाली करण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं पण इतक्या उघड पद्धतीने लोकांची घरं बुलडोझरने पडल्याची कारवाईची चर्चा सगळीकडेच झाली.

८. आता उर्दू भाषेच्या वादाचं बोलूया….

हल्दीरामच्या पाकिटावर उर्दूत मजकूर छापण्यावरून सुदर्शन न्यूज टीव्हीची एक रिपोर्टर हल्दीरामच्या दुकानात एका महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली आणि तो व्हिडीओ देशभर व्हायरल झाला.

लोकांनी हल्दीरामला शिव्या घातल्याच पण त्याबरोबरच लोकांची जुबां उर्दूवर पण घसरली. पार उर्दू परधर्माची ते परदेशाची भाषा असं म्हणत उर्दूचं ट्रोलिंग चालू झालं. पण त्यांचा इतिहास पुन्हा कच्चाच. कारण उर्दू भाषा मुसलमानांची भाषा म्हणून लोकांनी ट्रोल केलं.

पण…उर्दूचा इतिहास काही वेगळाच आहे.

भाषा तज्ज्ञांच्या मते, उर्दू भाषेचा उगम भारतातच अनेक शतकांपूर्वी झाला होता. भारतातील तीन ठिकाणी उर्दू डेव्हलप झाल्याचे रेफरन्स आढळतात. सुरवात भारताच्या पंजाबमध्येच झाल्याचं आढळतं. तसेच दिल्लीमध्ये देखील उर्दूची जडणघडण झाली. आपल्या महाराष्ट्राचे पण दखनी उर्दू निर्माण करण्यात मोठे योगदान आहे.

आता हा इतिहास सर्वाना माहिती नसेल पण लोकांनी वायरल होत असलेल्या व्हिडिओवर, उर्दू भाषेवरून हल्दीरामच्या प्रोडक्टमध्ये प्राण्यांचे तेल, गोमांस तेल आहे का जे उर्दूमध्ये लिहून लपवताय असं बोललं गेलं. आणि उगीचंच हा वाद निर्माण केला गेला.

९. कर्नाटक मंदिराबाहेर मुस्लिम व्यावसायिकांना स्टॉल लावण्यास मनाई केली गेली 

कर्नाटकातील हिजाब वादाचे परिणाम राज्यांतल्या इतर घडामोडींवर झालेच झाले. मार्च महिन्यात अनेक मंदिर प्राधिकरणे आणि मेळ्यांच्या आयोजक समित्यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांना स्टॉल लावण्यास बंदी घातली होती. वर्षानुवर्षे मुस्लिम व्यावसायिक राज्यातील विविध वार्षिक जत्रांमध्ये मंदिरांच्या बाहेर स्टॉल लावत असतात पण यंदा मात्र समित्यांनी मुस्लिम समाजातील लोकांना परवानगी दिली नाही.

शिवमोग्गाच्या ‘कोटे मरीकंबा जत्रे’च्या आयोजन समितीने तर माध्यमांना सांगितलं कि, जत्रेत केवळ हिंदूच स्टॉल लावू शकतात. तर बजरंग दलाच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं होतं कि, हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मंदिराच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या स्टॉल्स ला मुस्लिम व्यवसायिकांवर बंदी घालणं हे त्यांचं आर्थिक नुकसान करणार ठरलं.

१०. त्याच दरम्यान कर्नाटकातच, शालेय अभ्यासक्रमातून टिपू सुलतानचा इतिहास वगळण्यात आल्याने वाद निर्माण झालेला.

कर्नाटक राज्याचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी माहिती दिली होती कि, शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे.

हा बदल म्हणजे १८ व्या शतकातील शासक टिपू सुलतानशी संबंधित धड्यांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.  आत्तापर्यंत टिपू सुलतानाचा खोटा इतिहास शिकवला जात होता, आता खरा इतिहास समाविष्ट केला जाईल असं देखील शिक्षणमंत्री म्हणाले होते.

मात्र काँग्रेसने या निर्णयाचा जोरदार विरोध केला. टिपू सुलतान बाबत वैभवशाली इतिहास जो भाजपच्या नॅरेटिव्ह मध्ये बसत नाही. आता खोटा इतिहास लिहिला जाईल, तो खोटा इतिहास मुलांना शिकवला जाईल. अर्थात शिक्षणाचे भगवेकरण होतेय असा आरोप देखील राज्य सरकारवर झाला.

या झाल्या १० घटना…

दुर्दैवाने यात आणखी काही घटनांची भर पडतच राहील. पण शक्य तितकं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न आपण करूच शकतो. शिवाय आपण भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाचे नागरिक आहोत त्यामुळे शांतता राखणं आपलं कर्तव्य आहे.. बाकी समजण्याइतपत तुम्ही सुज्ञ आहातच !

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.