काश्मीर फाइल्स सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्यात वाढ झाली आहे?

आम्ही काश्मिरी पंडितांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले होते. २०१६ मध्ये सर्वाधिक अशांततेच्या काळात एकही हत्या झाली नव्हती. आता मात्र काश्मीर फाइल्स चित्रपटामुळे हिंसाचार भडकला आहे.

असा आरोप जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी १७ मे २०२२ रोजी केला होता.

त्याच्या बरोबर आदल्या दिवशी म्हणजेच १६ मे २०२२ रोजी जम्मू काश्मिरचेच माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी द काश्मीर फाइल्स वर बंदी घालण्याची मागणी केली होती आणि अशा पिक्चर्समुळे देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे असा आरोप केला होता.

या आरोपांच कारण होतं १२ मे २०२२ रोजी काश्मिरी पंडीत राहूल भट्ट यांची झालेली हत्या. त्यानंतरच्या काळात काश्मिर खोऱ्यात नऊ जणांच्या हत्या झालेल्या आहेत.

कालच दिनांक २ जून रोजी बॅंक व्यवस्थापक विजय कुमार यांची हत्या करण्यात आली.

विजय हे कुलगाममधील अरे मोहनपोरा गावातील एल्लाकी देहाती बॅंकेचे व्यवस्थापक होते. २५ वर्षांचे असणारे विजय तीन दिवसांपूर्वीच या शाखेत रुजू झाले होते. तर दूसरीकडे बडगाम येथे विटभट्टी मजूर असणाऱ्या दिलसुख यांची देखील हत्या करण्यात आली आहे. काल एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने काश्मिर खोऱ्याचा प्रश्न पुन्हा चिघळण्यास सुरवात झालेय.

या घटनेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १ जून रोजी शिक्षिका असणाऱ्या रजनी बाला यांची हत्या करण्यात आली होती. सकाळी शाळेत प्रवेश करत असतानाच ३६ वर्षीय शिक्षिका रजनी बाला यांची अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळच्या प्रार्थनेसाठी मैदानावर जमलेल्या विद्यार्थ्यांच्या देखत रजनी बाला यांना गोळ्या घालण्यात आल्या.

काश्मीरमधील हिंदूंवर करण्यात आलेला हा नववा हल्ला होता

त्यातलेच काही उदाहरणं…

१७ मे २०२२ –  राजौरी येथील रणजीत सिंग यांच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्यात ते ठार झाले तर अन्य तीन जण जखमी झाले. बारामुल्ला जिल्ह्यातील दिवाण बाग परिसरात त्यांनी  सुरू केलेल्या वाईन शॉपमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडहल्ला केला होता.

१२ मे २०२२ – मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा शहरातील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी सरकारी कर्मचारी राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. २०१०-११ मध्ये त्यांना सरकारच्या काश्मिरी पंडित निर्वासितांसाठीच्या विशेष रोजगार पॅकेज अंतर्गत लिपिकाची नोकरी मिळाली होती.

१७ मे २०२२ –  राजौरी येथील रणजीत सिंग यांच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्यात ते ठार झाले तर अन्य तीन जण जखमी झाले. बारामुल्ला जिल्ह्यातील दिवाण बाग परिसरात त्यांनी  सुरू केलेल्या वाईन शॉपमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडहल्ला केला होता.

१३ एप्रिल २०२२ – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सतीश कुमार सिंह राजपूत नावाच्या नागरिकावर गोळीबार केला. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. तो व्यवसायाने ड्रायव्हर होता आणि कुलगाममधील काकरनचा रहिवासी होता.

४ एप्रिल २०२२ – काश्मिरी पंडित समाजातील बाल कृष्ण भट यांची चौटीगाम शोपियान येथे त्यांच्या घराजवळ संशयित अतिरेक्यांनी हत्या केली.

या हत्या काश्मिरी फाईल्स या चित्रपटानंतर झाल्या, काश्मिरी फाईल्स या चित्रपटानंतरच काश्मिर खोऱ्यातील परिस्थिती बदलली असा आरोपच राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी केला आहे..

काश्मिरी फाईल्स हा सिनेमा ११ मार्च २०२२ ला रिलीज झाला होता.

१९९० च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून पंडितांचं जे स्थलांतर झालं होतं त्याचं विदारक सत्य या पिक्चरमधून मांडण्यात आल्याचा दावा अग्निहोत्री यांच्याकडून केला गेला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. केवळ १५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या सिनेमाने तब्बल ३०० कोटींची कमाई केली होती.

मात्र सुरवातीपासून या सिनेमाच्या माध्यमातून वस्तुस्थिती न दाखवता द्वेष विकत असल्याचे आरोप झाले. 

काश्मिरी पंडित संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय टिकू यांनी ४ एप्रिलच्या दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले होते,

विवेक अग्निहोत्री देशातील हिंदू-मुस्लिम यांच्यात तणावाचे वातवरण निर्माण करत आहेत आणि याचा सर्वांधिक धोका आहे तो काश्मिरमध्ये राहणाऱ्या पंडितांना.

“आम्हाला याचीच भीती वाटत होती”

ज्या काश्मिरी पंडितांनी १९९० मध्ये काश्मीर सोडलं नाही आणि अजूनही काश्मीरमध्ये राहतात अशा पंडितांच्या प्रश्नांसाठी टिकू काम करतात.  १९९० मध्ये काश्मिरी पंडितांचे स्थलांतर झाले तेव्हा ८०८ कुटुंबे मागे राहिली आणि आजही खोऱ्यातील निर्वासित छावण्यांमध्ये ही कुटूंबे राहत आहेत.

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवरच टिकू यांनी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता.

खोऱ्यातील अल्पसंख्याक आणि मुस्लिमांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे संतापलेल्या संजय टिकू यांनी त्यावेळी सबरंग इंडियाला सांगितले होते की. काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यासाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे वारंवार केलेल्या विनंतीला उत्तर मिळाले नाही. “१९९० मध्ये परत आपले स्वागत आहे,” अस उद्विग्न होवून टिकू म्हणाले होते..

आता मात्र टिकू यांची वॉर्निंग सत्यात उतरते का काय? अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

वारंवार होणाऱ्या हल्यांमुळे काश्मिरी पंडित पुन्हा एकदा काश्मीर सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचा बातम्या येऊ लागल्या आहेत. 

तसेच काश्मीर खोऱ्यात सरकारी काम करणाऱ्या ३५० पंडित कुटुंबांनी काश्मीर सोडल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या विशेष पुनर्वसन पॅकेज अंतर्गत भरती झालेले सुमारे ४,००० स्थलांतरित काश्मिरी पंडित कर्मचारी आणि शेड्युल कास्ट (एससी) कोट्याअंतर्गत भरती झालेले जम्मूतील शेकडो हिंदू कर्मचारी सध्या काश्मीर खोऱ्यात तैनात आहेत. त्यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून हिंदूंवरील होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं होत आहेत. 

आमचं काश्मीरमधून लवकरात लवकर ट्रान्सफर व्हावं अशी मागणी कर्मचारी करत आहेत. 

सरकार पंडितांना सुरक्षा देण्यास पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचं म्हणत काश्मीर खोऱ्यातील पंडितांनी भाजप सरकारला देखील धारेवर धरलं आहे. 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एचएम अमित शहा काश्मिरी पंडितांना बळीचा बकरा बनवत आहेत. ते त्यांच्या राजकारणासाठी काश्मिरी पंडितांचा चारा म्हणून वापर करत आहेत. मी त्यांना काश्मीरमध्ये येऊन सुरक्षेशिवाय फिरण्याचं आव्हान करते. काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत आहेत तरी ते गप्प आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे काश्मिरी पंडितांबाबत पूर्णपणे उदासीन आहेत”

अशी उद्विग्न प्रतिक्रिया दहशतवाद्यानी हत्या केलेल्या राहुल भट यांची पत्नी मीनाक्षी भट यांनी दिली होती.

त्यामुळं काश्मीरमधील हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांवर सरकार कोणती पावलं उचलणार का की सरकारचं काश्मिरी पंडितांबद्दलचं प्रेम फक्त काश्मीर फाइल्सला टॅक्स फ्री कारण्यापुरतंच मर्यादित राहणार..? असा प्रश्न विरोधक आता केंद्र सरकारला विचारत आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.