उद्धव ठाकरेंमुळे सेना सोडणारे पहिले नेते भास्कर जाधव, आज तेच एकट्यानं खिंड लढवतायत

बहुमत चाचणीच्या दिवशी सकाळीच शिवसेनेला एक मोठा धक्का बसला. बंडखोर आमदारांविरोधात आवाज उठवणारे, अध्यक्षपदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या बाजूनं असणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात दाखल झाले. मुंबईत परतल्यानंतर आमदार शिवसेनेत परत येतील असा अंदाज असताना, बांगर यांनी एकनाथ शिंदेंचा गट पकडलाय.

एका बाजूला सगळ्या सत्तानाट्यात शिवसेनेसोबत असणाऱ्या आमदारानं गट बदलला, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे एक आमदार आहेत, ज्यांनी कधीकाळी शिवसेना सोडली होती आणि आज शिवसेनेवर संकट असताना त्यांनीच विधानसभेत सेनेची खिंड एकट्यानं लढवली. हे आमदार म्हणजे भास्कर जाधव.

कधीकाळी कट्टर शिवसैनिक मग राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आता पुन्हा शिवसेना असा प्रवास करणाऱ्या भास्कर जाधवांनी बहुमत चाचणीनंतर आपल्या भाषणानं सभागृह अक्षरश: दणाणून सोडलं.

अनुभवी शिवसेना आमदार शिंदे गटात असताना, भास्कर जाधव यांनी शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम ठेवली, आपल्या भाषणात त्यांनी भाजपवर टीका केलीच. पण सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही त्यांनी लक्ष्य केलं.

“एकनाथ शिंदे, तुम्ही ज्या भाजपच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करता, त्या भाजपनं शिवसेनेच्या संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी काय काय केलं? आता संजय राठोडांचं ते काय करणार आहेत. ज्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी टाकल्या आज त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन त्यांना वाचवावं लागतंय, ही वेळ भाजपवर आली. भाजपनं राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं ? भाजपचा २५ वर्षाचा इतिहास बघितला, तर शिवसेना संपवणं हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे.

पानिपतच्या लढाईत जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार. दिल्लीच्या बादशहासाठी महाराष्ट्रात युद्ध सुरू आहे. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठीच होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिला, तर कुणाच्या हातात भोंगा दिला; पण सत्ता उलटली नाही.

तुमच्याबद्दल त्यांना काहीही प्रेम आलेलं नाही. याची अनेक उदाहरणं मी सांगू शकतो. तुम्ही मुख्यमंत्री झालात, याचा मी आनंद व्यक्त करतो; पण शिवसेना कशी वाचवायची ? यासाठी प्रसंगी दोन पावलं माघारी या, तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही, तर हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.”

ज्या आक्रमक भाषणांसाठी शिवसेना ओळखली जाते, तसंच भाषण भास्कर जाधवांनी केलं. शिवसेना संकटात असताना एकट्याच्या जोरावर त्यांनी शिवसेनेची खिंड लढवली.

सध्या बंड केलेल्या आमदारांनी ‘उद्धव ठाकरे भेटत नाहीत, मातोश्रीवर प्रवेश मिळत नाही,’ अशी कारणं दिली. याच कारणांमुळे भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती.

शिवसेनेत पहिलं मोठं बंड केलं, ते छगन भुजबळ यांनी. भुजबळांच्या पक्षांतरानंतर कित्येक वर्ष शिवसेना सोडण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. शिवसेनेतला असंतोष वाढला उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर, राज ठाकरे, नारायण राणे असे दिग्गज नेते नाराज होते. 

पुढे त्यांनी शिवसेनेला रामराम केलाच. पण त्यांच्याही आधी शिवसेना सोडणारा पहिले मोठे नेते होते. भास्कर जाधव.

भास्कर जाधव सांगतात, आमच्या बापजन्मात कोणीही राजकारणी नाही. तरीही बाळासाहेबांनी आम्हाला व्यासपीठ दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात भास्कर जाधवांनी १९८४ पासून शिवसेनेत काम करण्यास सुरवात केली. पूर्वापार कोकणी माणसाला मुंबईचे आकर्षण राहिले आहे, त्यामुळेच सेना व बाळासाहेब ठाकरे यांची मोहिनी कोकणात राज्याच्या आधी सुरु झाली.

भास्कर जाधवांनी जिल्हा परिषदेतून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांचा स्वभाव पूर्वीपासून जहाल व फटकळ होता. एकदा शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. पण, नंतर ज्येष्ठ असे पंडित गुरुजी यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही तर शिवसेनेकडून तिकीट दिले जाणार असल्याचे सांगितलं.

भास्कर जाधव लगेच दत्ताजी नलावडे यांच्याकडे गेले. खरं तर शिवसेनेत का नाव दिले आणि का काढले, हे विचारायचे नसते. पण, जाधवांनी दत्ताजींना विचारले,

जर पंडित यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही तर आपल्याकडून देणार आणि काँग्रेसने तिकीट दिले तर मला सेनेकडून तिकीट दिले जाईल, हे मी मान्य करणार नाही. कोणी खाल्लेलं उष्ट मी खात नाही व खाणार नाही.

एकदा बाळासाहेब मीनाताई यांच्यासोबत रत्नागिरी येथे आले होते. मनोहर जोशी यांचा भास्करराव जाधवांना उमेदवारी देण्यास सक्त विरोध होता. मराठा उमेदवार दिल्यास जिल्हापरिषदेतील आपली सत्ता जाईल असं त्यांचं म्हणणं होतं.

त्यावेळी बाळासाहेब म्हणाले,

भास्कर हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे व अशा कार्यकर्त्यांसाठी सत्ता आली नाही तरी हरकत नाही पण, मी भास्करलाच उमेदवारी देणार आहे. पंत माझा निर्णय झाला.

सगळ्यांचा विरोध असतानाही बाळासाहेबांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला. पुढे भास्करराव जाधवांनी आमदारकीला देखील बाजी मारली.  १९९५ आणि १९९९ असे दोन वेळा ते चिपळूणमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले.

२००४ साली मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं.

असं म्हणतात की, त्याकाळी शिवसेनेकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेतून भास्कर जाधव पराभूत होतील असं समोर आलं. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या सल्ल्याने हा सर्व्हे घेतला होता असं म्हणतात.

याच सर्व्हेचा आधार घेऊन शिवसेनेनं भास्कर जाधवांचं तिकीट नाकारलं.

इतकंच नाही तर शिवसेनाप्रमुखांना भेटायला मातोश्रीवर आलेल्या भास्कर जाधवांना त्यावेळी ताटकळत ठेवलं गेलं. त्यामुळे ते भावनाविवश झाले होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागत शिवसेना सोडली होती.

शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरेंच्या हातात आल्यापासून पक्ष सोडणारे पहिले मोठे नेते म्हणजे भास्कर जाधव ठरले. त्यावर्षीच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. या निवडणुकीत सेनेचा आणि भास्कर जाधवांचा दोघांचाही पराभव झाला.

नाराज भास्कर जाधवांना शरद पवारांनी संधीचा फायदा उठवत आपल्या पक्षात ओढून घेतलं. कोकणात राष्ट्रवादीचा जम बसवण्यासाठी व शिवसेनेला आव्हान निर्माण करू शकणारा त्यांना एक नेता हवाच होता. पवारांनी जाधवांना मोठं बळ दिलं. त्यांना नगरविकास मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद देखील दिलं.

राष्ट्रवादी रमलेल्या भास्कर जाधवांची एकदा जलील पारकर यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी थेट बाळासाहेबांशी फोन लावून दिला. तेव्हा बाळासाहेब म्हणाले,

भास्कर तुझ्यावर आमच्याकडून अन्याय झाला आहे. तुझं काम चांगलं सुरू आहे, तुझा चांगला उत्कर्ष होईल, असा आशीर्वादही त्यांनी दिला.

भास्कर जाधव म्हणतात, बाळासाहेब बोलल्याने तेव्हा मन हलकं झालं होतं.

२०१९ सालच्या निवडणुकीआधी भास्कर जाधव पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. सत्तेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होतीच. अशातच भास्कर जाधव देखील पुन्हा सेनेत जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. उद्धव ठाकरेंसोबतचे वाद त्यांनी मिटवले असल्याचं बोललं गेलं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधवांनी शिवबंधन बांधलं.

मोठा विरोध असूनही भास्कर जाधवांनी मात्र गुहागर येथे विधानसभा जिंकून आपली हॅटट्रिक पूर्ण केली.

पण निकालानंतर पुन्हा राजकीय गणिते बदलली. शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी, काँग्रेस बरोबर आघाडी केली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं.

भास्कर जाधव यांना मात्र सत्तेत आल्याचा काही लाभ मिळाला नाही. एकेकाळी प्रदेशाध्यक्षपद भूषवलेल्या जाधवांना साधं मंत्रिपदही मिळालं नाही. पुन्हा ते शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. ते भाजपचा रस्ता धरतील, असंही बोललं गेलं. मात्र शिवसेनेत मोठं बंड होऊनही, भास्कर जाधवांनी शिवबंधन काय काढलं नाही आणि आज  विधानसभेत सेनेची खिंड लढवत नाराजीच्या सगळ्याच शक्यतांना पूर्ण विराम दिला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.