पदयात्रेतून ३,५०० किलोमीटर पायी चालून राहूल गांधी हे मोदींना पर्याय म्हणून उभा राहणार..

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी काढलेली पदयात्रा असो का कांशीराम यांनी पक्षबांधणीसाठी हजारो किलोमीटर सायकलवर केलेली यात्रा असो राजकीय क्षेत्रात अजूनही चर्चिली जाते. देशाच्या जनतेशी थेट जोडून घ्यायचं असेल तर पदयात्रेपेक्षा दुसरं चांगलं माध्यम असूच शकत नाही.

सद्या भाजपाला पर्याय कोण..?

हा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यासाठी अनेक भाजप विरोधी पक्ष समोर येत आहेत. मात्र कितीही झालं तरी राष्ट्रीय पक्ष म्हणून सद्या काँग्रेसच भाजपला पर्याय असल्याचं दिसून येतंय. त्यानुसार, काँग्रेस देखील कामाला लागलंय. आणि याच संबंधित काँग्रेसचा प्लॅन म्हणजे काँग्रेसची पदयात्रा !

काँग्रेस मोदी सरकारविरोधात तब्बल ३,५०० किलोमीटरची पदयात्रा काढणार आहे.

तसं तर २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच सरकार आल्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी अनेक पदयात्रा काढल्याचं दिसून येतंय मात्र यंदाच्या पदयात्रा जास्तच गाजायला लागलीय. 

कशी असणारे काँग्रेसची पदयात्रा ?

काँग्रेस मोदी सरकारविरोधात तब्बल ३,५०० किलोमीटरची पदयात्रा असणार आहे. तसेच ही यात्रा सुमारे १४८ दिवस चालणार आहे याचा अर्थ ३,५०० किमी चे अंतर १४८ दिवसांमध्ये पार करायचं आहे. 

तसेच या पदयात्रेला ‘भारत जोडो यात्रा’ असं नाव देण्यात आलं आहे.  कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून, १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतून आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेल्या यात्रेचा समारोप काश्मीर ला होणार असल्याचं सद्या तरी ठरलंय. 

तरीही काश्मीर मध्ये समारोप करणं शक्य होईल का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण काश्मीरमधील  सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करून आणि केंद्र आणि इतर यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय पक्षाकडून घेतला जाणार आहे. 

राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करणार असून ही साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी पायीच कव्हर करणार आहेत. 

पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलेल्या माहितीनुसार, उदयपूर चिंतन शिबिरात या पदयात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. याच शिबिरात राहुल गांधींनी अशी पदयात्रा पक्षाचा कार्यक्रम म्हणूनच समोर यावा आणि दररोज ३० किमी चा प्रवास पूर्ण करायचा अशी संकल्पना मांडली होती. मात्र पक्षातील प्रत्येक नेता हा दररोज ३० किमी चालण्यास शारीरिकरीत्या तंदरुस्त नसल्याचं लक्षात आल्यावर हे अंतर २० किमी चं असेल असं नियोजन आखलेलं आहे.

भारत जोडो यात्रा समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंह, प्रियांका गांधी, सचिन पायलट, अविनाश पांडे यांच्या उपस्थितीत भारत जोडो यात्रेच्या रुपरेषेबाबत काँग्रेसच्या वॉर रुममध्ये अलीकडेच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. तसेच पक्षाने समविचारी पक्षांना आणि संघटनांना देखील या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.

भारत जोडो यात्रेमागे काँग्रेसचा नेमका काय उद्देश आहे ?

भारत जोडो यात्रा ही  मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच त्या द्वारे लोकांना जोडून घेण्यासाठी काँग्रेसने आखलेली एक देशव्यापी मोहीम आहे. 

या यात्रेद्वारे राहुल गांधींनी संपूर्ण देशात फिरून जनतेशी संवाद साधावा, पक्षाला गावागावात पोहोचावे, आणि काँग्रेसने स्वबळावर देशातील निवडणुकीस सामोरे जावे असा साधा आणि प्राथमिक उद्देश पक्षाचा असल्याचं दिसून येतंय.

आगामी काळातल्या म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायचा आहे. सद्या काँग्रेसची असणारी बिकट अवस्था पाहता पक्षाला पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पक्षाच्या उभारणीसाठी तसेच भाजपला सक्षम प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून काँग्रेसच आहे, असं स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी पदयात्रेशिवाय दुसरा चांगला पर्यायच पक्षासमोर नसल्यामुळे या पदयात्रेला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे.

पण त्याचवेळी काँग्रेसला जनतेत असा संदेशही द्यायचा आहे की आज ज्या प्रकारे देशात धार्मिक वातावरण ताणलं गेलेलं आहे, बेरोजगारीचा वाढता टक्का आणि सोबतच वाढती महागाई असे सर्व मुद्दे  काँग्रेस आता पुढे करणार हे चित्र दिसून येतंय.

काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींनी जाहीर केलेलं की, 

“ऑक्टोबरमध्ये काँग्रेस लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधेल. पक्षाचे नेते व कार्यकर्ते जनतेत जाऊन त्यांच्यात मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेतील. जनतेशी संवाद साधायचा असेल तर ते शॉर्टकटने होणार नाही. काँग्रेस संघटना लोकांमधून निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला लोकांमध्ये जावे लागेल. जनतेशी जो संबंध होता तो पुन्हा निर्माण करावा लागेल”. “काँग्रेस पक्षच देशाला पुढे नेऊ शकतो हे जनतेला माहित आहे”, असं देखील राहुल गांधींनी स्प्ष्ट केलेलं. 

ही यात्रा काँग्रेससाठी का महत्वाची ठरलीय, तर….

काँग्रेसच्या बिकट अवस्थेची माहिती प्रत्येकालाच आहे. गेल्या मार्चमधील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपला बालेकिल्ला असलेल्या पंजाबमध्ये असणारे सरकार गमावले. एकेकाळी एकहाती सत्ता असलेल्या पंजाबमध्ये काँग्रेसने एकूण ११७ पैकी फक्त १८ जागा जिंकल्या हा काँग्रेससाठी मोठा धक्का होताच शिवाय मणिपूरमध्ये सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेण्यातही काँग्रेस अपयशी ठरली. त्यात महाराष्ट्रात देखील काँग्रेस भागीदार असणारं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. अशा प्रकारे काँग्रेस आता फक्त राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये सत्तेत आहे.

गेल्या मे महिन्यात उदयपूर इथे पार पडलेल्या चिंतन शिबिरानंतर काँग्रेस २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करू पाहत आहे सोबतच पक्षाअंतर्गत सुधारणांवर देखील पक्ष लक्ष देत आहे.

या उदयपूर चिंतन शिबिरात सोनिया गांधींनी एक टास्क फोर्सची स्थापना केली. यात संघटनेची रचना, पक्षाच्या पदांवर नियुक्तीचे नियम, संपर्कमोहीम आणि प्रचारमोहीम, निवडणूक व्यवस्थापन यासह सर्व बाबींचा समावेश असणार आहे.

हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभा निवडणूका हा मेन फॅक्टर.

या पदयात्रेच्या प्रवासाच्या दरम्यानच दोन राज्यांच्या विधानसभा निवडणूक येणार आहेत त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि गुजरात.  त्यामुळे या ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून या दोन्ही राज्यांमध्ये पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.

या प्रयत्नांमध्ये सर्वात महत्वाची भूमिक ‘भारत जोडो’ यात्रा पार पाडणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.