काँग्रेसच्या लोकसभेला अडवाणी ‘शोकसभा’ म्हणत असायचे

३१ ऑक्टोबर १९८४ चा दिवस. याच दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली. या हत्येने सारा देश स्तब्ध झाला. सलग नऊ वर्ष त्यांच्या सेवेत असणाऱ्या त्यांच्या सुरक्षारक्षकानेच त्यांची हत्या केली होती. 

या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्र्यांचे सुरक्षा सल्लागार व रॉ चीफ आर. एन. काव यांच्या सूचनेनुसार इंदिरा गांधींची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांचे अंगरक्षक बेअंत सिंह यांना सेवेतून काढण्यात आले होते. बेअंत सिंह हा इंदिरा गांधींचा विश्वासातला अंगरक्षक होता. कित्येक वेळेस तो प्रदेश दौऱ्याच्या दरम्यान इंदिरा गांधींच्या सोबत त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असे. तरीदेखील सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सेवेतून काढण्यात आले होते त्याचे कारण असे होते की इंदिरा गांधींकडून सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवण्यात आले होते. 

पवित्र अशा सुवर्ण मंदिरात रक्तपात झाला. यामुळे शीखांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. शीख समुदाय प्रचंड आक्रमक झाला होता आणि या घटनेला फक्त पाच महिने झाले होते. या सगळ्याची जाणीव इंदिरा गांधींच्या सुरक्षा सल्लागाराला होती.

कामावरून हटवल्यानंतर बेअंत सिंह याने इंदिरा गांधींकडे अपील केली. आर. के. धवन व इंदिरा गांधी यांनी त्याचे ट्रान्सफर ऑर्डर कॅन्सल केले. त्यावेळी देशातील  शिखांमध्ये रागाची भावना असूनही इंदिरा गांधी म्हटल्या होत्या की मला माझ्या  शीख अंगरक्षकावर पूर्ण विश्वास आहे. परंतु त्यांना कल्पना नव्हती की आपण ज्याला विश्वासू समजत आहोत असा आपला अंगरक्षकच आपला काळ ठरेल. इंदिरा गांधींना ठार करण्याच्या इराद्यानेच तो पुन्हा सेवेत सामील झाला होता.

३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी त्याने आपल्या इराद्याला सत्यात उतरवले. एकामागोमाग एक गोळ्या चालवून इंदिरा गांधींची हत्या करून ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेतला होता…

आणि इथून पुढे काय घडते हे लक्ष देऊन वाचा…

जसे कि, आपल्या सर्वांनाच माहिती आहे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगे उसळले. 

दिल्ली, फिरोजाबाद, कानपूरसह सर्वत्र शीखविरोधी दंगली सुरू झाल्या. या दंगलींमध्ये मरण पावलेल्या शीखांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. सुमारे ५ हजार च्या आसपास शिखांची कत्तल करण्यात आली होती . कानपूरमध्ये १२७ शीख मारले गेले. सुरुवातीला एफआयआरही नोंदवण्यात आले नव्हते आणि नंतर कोर्टाने ठोस पुराव्याअभावी खटला संपवला.

आणि त्याच दरम्यान पुढच्या लोकसभा निवडणूका लागल्या.

इंदिरा गांधींच्या हत्येच्या वेळी राजीव हे अमेठीचे खासदार होते. संजय गांधी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ज्यावर जून १९८१ मध्ये पोटनिवडणूक झाली आणि राजीव विजयी होऊन संसदेत पोहोचले. १९८३ मध्ये राजीव काँग्रेसचे सरचिटणीसही बनले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर कॅबिनेट चा निर्णय असं झाला की राजीव गांधी हेच पुढेचे पंतप्रधान होतील.

प्रधानमंत्री बनल्यानंतर राजीव गांधी यांनी वेळेच्या आधीच निवडणुकांची घोषणा केली. २५ दिवसांच्या प्रचारात राजीव यांनी कार, हेलिकॉप्टर आणि विमानाने ५० हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला होता. असं चित्र तर होतंच कि, इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येमुळे त्यांना मिळालेली सहानुभूती आणि राजीव गांधी यांच्या अथक परिश्रमामुळे निवडणूक प्रचाराला मोठे यश मिळाले होते. 

याआधी च म्हणजेच १९८० मध्ये भाजप पक्षाची स्थापना झाली होती. तेंव्हा भाजपाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी होते. त्यानंतर झालेल्या या लोकसभा निवडणुकीत भाजपा कडून २४७ उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रतिस्पर्धी असणाऱ्या राजीव गांधींसाठी सहानुभूतीची लाट एवढी होती की या निवडणुकीत भाजपा कडून फक्त दोन उमेदवार निवडून आले होते. 

विशेष म्हणजे राजीव गांधी आणि तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख बाळासाहेब देवरस यांच्यात गुप्त बैठकाही झाल्याचे बोलले जाते.  मात्र आज भाजप या गोष्टीचा इनकार करते. असो त्या निवडणुकीत आरएसएसने काँग्रेसला मदत केली होती हा मुद्दा चर्चेपर्यंतच मर्यादित राहतो. 

भाजपच्या दिग्गजांना या निवडणुकीत हार मानावी लागली होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळेच कॉंग्रेस निवडून आली असे म्हणत लालकृष्ण अडवाणी १९८४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या या यशाला ‘शोकसभा’ म्हणत असत. परंतु काहीही म्हणलं तरी या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. आणि कॉंग्रेसचे विक्रमी बहुमत असलेले हे सरकार ५ वर्षे टिकले होते. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.