हिंदू राजा बाप्पा रावळ यांच्या शौर्याचं प्रतिक म्हणजे पाकीस्तानचं रावळपिंडी शहर

पाकिस्तानातलं रावळपिंडी शहर. प्रत्येक शहराला एखादा इतिहास असतो तसाच या शहराला देखील इतिहास आहे. आत्ता तुम्ही म्हणालं हे बोलभिडूवाले पाकीस्तानच्या शहराचा का इतिहास सांगायला लागलेत. आम्हाला काय करायचं आहे पाकीस्तानचं. भावना जरी बरोबर असल्या तरी या शहराचा इतिहास हिंदूस्थानासोबत जोडला गेलेला आहे.

रावळपिंडी शहराचं नाव म्हणजे मेवाडचे राजे बाप्पा रावळ यांच्या कर्तृत्वाचं, शौर्याचं आणि त्यागाचं प्रतिक म्हणून उभा राहिलेलं आहे. म्हणूनचं पाकीस्तानाचं असलं तरी हा आपला इतिहास आहे आणि तो आपणाला माहितचं असला पाहीजे. 

आठव्या शतकात मेवाड साम्राजाची सुरुवात ‘बाप्पा रावळ ’ यांच्यापासूनचं होते. बाप्पा रावळ यांना मेवाडचा कर्ता धर्ता मानलं जातं. बाप्पा रावळ मेवाडचे निर्मितीकार म्हणजेच संस्थापक म्हणूनही इतिहासात डोकावून पाहिलं जातं. त्यांचं जनतेशी खुप घनिष्ठ नातं होतं. प्रेम होतं. मेवाडच्या जनतेसाठी ते देव होते. म्हणून सगळे प्रेमाने बाप्पा म्हणायचे.

बाप्पा रावळ यांचं साम्राज फक्त मेवाड पुरतच नव्हतं. ते पुढं सरकत सरकत आजच्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीपर्यंत गेलं होतं. रावळपिंडी हे नावही बाप्पा रावळ यांच्यामुळेच पडलेलं आहे, असा इतिहास आजही दाखला देत आहे.

८ व्या शतकात अरब वाल्यांनी हिंदुस्तानवर आक्रमण करून कब्जा करण्याची तयारी सुरु केली होती. ही गोष्ट बाप्पा रावळ यांना कळली, तेव्हा त्यांनी इकडून लढत लढत सिंध पर्यंत जाऊन अरबांना तोडीस तोड उत्तर दिलं होतं.

अरबांच्या आक्रमणामुळे त्यांना मेवाड पासून सिंध कडे कूच करावं लागलं. तिथल्याच शहराचं नाव ‘ बाप्पा रावळ ’ यांच्या नावावरूनचं रावळपिंडी असं ठेवलं गेलं. आजच्या पाकिस्तानात ही त्या शहराला रावळपिंडी असचं म्हणतात.

१४०० वर्षांपूर्वीच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर असं लक्षात येतं की गुहील वंशज नागादित्य यांना ७२७ ई.स मध्ये भिलांनी मारून टाकलं होतं. ही तिच वेळ होती, जेव्हा अरब भारत लुटायच्या तयारीत होते. कारण याआधी अरबांनी आसपासचा अनेक भाग स्वतःच्या ताब्यात घेतला होता.

त्याचबरोबर त्यांनी इजिप्त, स्पेन आणि इराक लाही जिंकलं होतं. याचं, दरम्यान इराकचे शासनकर्ते अल ह्ज्जाज यांनी सोनखानी ने भरलेल्या हिंदुस्तानवर चोरटी नजर टाकली. अल ह्ज्जाज यांनी खूप वेळा हिंदुस्तानवर आक्रमण करायचा अयशस्वी प्रयत्न केला. सैनिकांमधील स्वार्थ आणि त्यांच्यात होणारी फुटाफुट या कारणांमुळे अल ह्ज्जाज यांच्या हिंदुस्तान आक्रमणावर खूप नकारात्मक फरक पडला.

पण त्यांचा पुतण्या आणि जावई मोहमद बिन कासीम यांना मात्र गप्प बसू वाटत नव्हतं. त्या दोघांनी ७१२ ई.स मध्ये खलिफाच्या मदतीने भारताच्या वायव्य सीमेवरून सिंध वर हल्ला केला. हा हल्ला खूपच अनपेक्षित होता. त्यावेळी तिथला दाहरसेन हा राजा होता. त्यात सिंध ची सीमा उत्तरप्रदेशातील कन्नर, अफगाणिस्तानातील कंधारपासून काश्मिर आणि कच्छ पर्यंत दलदलीच्या प्रदेशात होती.

मोहमद बिन कासिमने त्यांच्या किल्ल्यावर बराच वेळा हल्ला केला. पण शेवटी दाहरसेन सैन्याने त्याचा हल्ला धुळीस मिळवला. मग त्याच्यानंतर एके दिवशी मोहमद कासीमने त्याच्या सैनिकाला महिला वस्र परिधान करून दाहरसेनच्या दरबारात पाठवलं. त्यामुळे या मार्गाने दाहरसेनवर आक्रमण करण्यात मोहमद बिन कासिम यशस्वी झाला.

शेवटी राज्याचं रक्षण करताना दाहरसेन ला प्राणाची आहुती दयावी लागली. शेवटच्या क्षणापर्यंत लढला एवढं मात्र खरं. अशा प्रकारे अरबांनी सिंध प्रदेशाला जिंकून त्याच्या आसपास आपली दहशत निर्माण केली. अरबांना अनेक छोटे मोठे राज्याचे राजे घाबरू लागले. त्यामुळे अरबांच्या वाटेत येणाऱ्या सर्व प्रदेशांनी त्यांच्यासमोर गुडघे टेकले. कुणाचीच अरबांना हरवणं सोडा तर लढायची सुद्धा हिंम्मत झाली नाही.

सध्याचं अफगाणिस्तान, सिंध या प्रदेशाला जिंकून वाळवंटी मार्गे अरब मेवाडच्या दिशेने निघाले. समोर जो प्रदेश येईल त्याला जिंकून पुढची वाटचाल ते करत होते. आणि बघता बघता काही वर्षांत अरबांनी चावडों, मौर्य, अश्या अनेक प्रदेशाला जिंकून आपल्या ताब्यात घेतलं. अरबांनी सिंध मार्गे सध्याच्या राज्यस्थान आणि गुजरात मध्ये प्रवेश करून ७२५ ई.स पर्यंत जैसलमेर, मारवाड, आणि भरूच या प्रदेशावर ही आपला ताबा घेतला.

जेव्हा सगळे राजे अरबांच्या समोर नतमस्तक झाले होते, तेव्हा मेवाडचे महाराज ‘ बाप्पा रावळ ‘ यांनी युद्धाची जवाबदारी आपल्या हाती घेतली. त्यांनी खूप मोठी अशी विशाल सेना एकत्र करण्याची तयारी चालू केली. अनेक राज्यांना जिंकण्याचा विश्वास देऊन समर्थनात सामील केलं. सुरुवातीला बाप्पा रावळ यांनी मेवाड जवळ असणाऱ्या चितोडच्या किल्ल्यावर अधिकार मिळवला. आणि ७३४ ई.स मध्ये मेवाडात गह्लौत वंश ची स्थापना केली. त्यांनी अरब चोरांना हाकलून लावून त्यांनी जिंकलेले सगळे प्रदेश पुन्हा ताब्यात घेऊन मेवाड राज्यात सामील केले. बाप्पा रावळ यांचा शासनकाळ हा ७३४ ई.स ते ७५३ पर्यंत राहिला.

बाप्पा रावळ यांनी चित्तोडच्या प्रदेशाला जिंकून अरबांना सळो की पळो करून सोडलं होतं.

पहिल्यांदा अरब ही या राजाला फार घाबरले. शेवटी त्यांना सध्याच्या अफगाणिस्तान मार्गे पळवून लावत बाप्पा रावळ यांनी सिंध प्रदेशाला पुन्हा तिथपर्यंत जोडून घेतलं.

या काळात त्यांना एक अनुभव आला की आपण जर शत्रूवर नजर ठेवली नाही तर कधीही आक्रमण होऊ शकतं. मग त्यांनी ठिकठिकाणी सैनिकांच्या चौक्या उभारल्या. त्यातीलच एक चौकी वर्तमानात पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडी इथे होती. तिथं बाप्पा रावळ यांच्या सैनिकांची चौकी असल्याने त्या शहराचं नाव पुढं चालून ‘ रावळ पिंडी ’ असं बनलं.

बाप्पा रावळ फक्त सिंध चं नाहीतर इराक इराण पर्यंत जाऊन पोहचले होते. त्यांच्या नावाचा त्याकाळी एक वेगळाच दबदबा तयार झाला होता. तब्बल १६ वर्षं त्यांनी अरबांसोबत लढाई केली.

जर इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ‘ बाप्पा रावळ ’ खरच त्याकाळी अद्भुत राजा होता. ज्याची खरी गरज होती. आपल्या प्रदेशाला नाहीतर आज जे आपण असतो कदाचित ते नसतो.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.