महात्मा गांधींमुळे बोरोलिन कंपनी स्थापन झाली..!


आत्ता थंडी पडायला सुरवात झाले म्हणून बोरोलिन आठवली. साहजिक “बोलभिडू कार्यकर्ते” कुठलीच गोष्ट हलक्यात घेत नसतात. बोरिलिन पाहिली आणि पहिला “बोरवली” आठवलं. मग “चला हवा येवु द्या” आठवलं आणि आम्ही आमच्या विनोदनिर्मीतीच्या प्रक्रियेला फाटा देत बोरोलिनचा इतिहास मांडायचा विडा उचलला. 

पहिल्या टप्यात अस समजल की, 

बोरोलिन कंपनी महात्मा गांधींच्या प्रेरणेतून सुरू झाली. नंतर समजल भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे बोरोलिन पॉप्युलर झाली कारण ते हि क्रिम लावायचे. तिसरी गोष्ट कॉंग्रेस आणि नेहरूंवादी सोडून जे होते त्यांच्यात देखील बोरोलिन पॉप्युलर झाली. त्याचं कारण होतं राज कुमार उर्फ जानी. पाकिस्तानच्या मिसाईलच्या फ्युजा खिश्यात घेवून फिरणारा जानी थंडीला घाबरायचा म्हणून तो बोरोलिन लावायचा. 

उभ्या भारतात थंडी पडो अगर गरमी. कुणाला कापलं, भाजलं, लागलं, पायाला भेगा पडल्या नाहीतर ओठांना चिरा पडल्या. (या ठिकाणी विनोदनिर्मिती टाळण्यात आली आहे) तर बोलोलिन लावायचं शास्त्र आहे.

आत्ता बोरोलिनचं मार्केटिंग बंद करुन आम्ही मुद्याला हात घालतो. 

कोलकत्ता. साल १९२०. भारतीय स्वातंत्र आंदोलनात गांधी युग सुरू झालेलं. महात्मा गांधीनी ब्रिटीश शासनाला विरोध करण्यासाठी कृतीकार्यक्रम मांडत होते. गांधीच्या कल्पनांमुळे आंदोलनाला व्यापक दिशा मिळत होती. सर्वसामान्य जनता देखील आंदोलनात सहभागी होवू शकते हा विश्वास लोकांना गांधींमुळे मिळत होता. 

याच काळात महात्मा गांधींनी असहकार आंदोलनास सुरवात केली. असहकार आंदोलनाद्वारे स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला. विदेशी कंपन्यांचा त्यांच्या उत्पादनाचा त्याग करुन आपण स्वदेशीचा पुरस्कार करायला हवा हा संकल्प महात्मा गांधी यांनी मांडला. 

पण अडचण अशी होती की, विदेशी गोष्टींचा त्याग केला तर त्याला पर्याय अशा स्वदेशी गोष्टी मुबलक नव्हत्या. प्रत्येक ठिकाणी स्वदेशीचा पर्याय निर्माण करायला हवं अस मत कोलकत्यातील एका व्यक्तीने मांडल. 

याच पठ्याने गांधींच्या स्वदेशी नाऱ्यावरुन प्रेरीत होवून १९२९ साली स्वदेशी कंपनीची स्थापना केली. या कंपनीच नाव होतं,  जीडी फार्मास्टूटिकल्स. आणि त्या माणसाचं नाव होतं गौर मोहन दत्ता. 

गौर मोहन दत्ता यांनी भारतीय संकल्पनेवर कंपनी स्थापन करण्याचं ठरवलं. भारतीय संकल्पना म्हणजे काय तर खाजगी कंपनी असली तर राष्ट्रवादाची थेट भूमिका घेणं. कोणत्याही प्रकारचं कर्ज काढायचं नाही, वगैरे वगैरे. सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे आज या कंपनीचा रेव्हेन्यू दिडशे ते दोनशे कोटींच्या घरात आहे पण कंपनीवर एक रुपयाचा देखील कर्ज नाही.  

कंपनी स्थापन झाल्यापासून म्हणजे १९२९ पासून एक रुपयाचं देखील कर्ज घेण्यात आलेलं नाही हे  विशेष. 

अशा राष्ट्रवादी कंपनीला अडथळे आणण्याचे प्रयत्न ब्रिटीश शासनाने केले पण त्यातूनही कंपनी उभा राहत होती. त्याचं महत्वाच कारण म्हणजे कंपनीचा बोरोलिनचा फॉर्म्युला. गौर मोहन दत्ता यांचे पणतु सांगतात की आजतागायत आम्ही बोरोलिनचा फॉर्म्युला बदलला नाही. पहिल्या दिवशी ज्या गोष्टींचा वापर या क्रिममध्ये करण्यात आला होता त्याच गोष्टींचा वापर आजही केला जातो. 

अतिशय साध्या प्रकारे करण्यात येणारी हि क्रिम त्याचमुळे थंडी ते कापल्या, भाजल्यावर चालू शकते. 

देश स्वतंत्र झाल्यानंतर कंपनीने लाखभर क्रिम मोफत वाटल्या होत्या. 

कंपनी थेट राष्ट्रवादी भूमिका घेत होती. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा आनंदाच्या भरात या कंपनीने लाखभर क्रिम मोफत वाटल्या होत्या. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.