वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडून पळालेली ती आज करोडोची कंपनी चालवते

शून्यातून मोठी झालेली अनेक माणसं आपल्या भारतात होऊन गेलेली आहेत. तर त्यातील अनेक जण अजूनही हयात आहेत. अशा लोकांकडे बघून नवीन तरुण पिढी त्यांचे आदर्श घेताना दिसतात. कुणालाही यश हे काही एका रात्रीतून भेटलेला नसतं. ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न, सातत्य, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस हवं असतं. अशा सगळ्या गोष्टींना सोबत ठेवून मोठ्या झालेल्या व्यक्तींना अक्खं जग सलाम करत असतं.

अशा जग बदलणाऱ्या आणि स्वतःच नशीब बदलणाऱ्या व्यक्तींमध्ये जर महिलांचं नाव असेल तर त्याचं अजूनच जास्त अप्रूप लोकांना वाटतं. कारण महिलांवर खूप बंधन असताना त्या जेव्हा निर्धार करून असाध्य गोष्ट साध्य करतात तेव्हा महिलांची एक नवीन पिढी जन्माला येत असते. ज्यांना उडण्यासाठी नवीन आकाश मिळतं. भारताच्या लोकांनी अशा अनेक महिलांचा अनुभव घेतला आहे आणि त्यांची यथायोग्य नोंदही केली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे चिनू काला.

चिनू काला या एक उद्योजक, समाजसेवी, मॉडेल आणि आज भारतातील फॅशन ज्वेलरी व्यवसायातील प्रमुख महिलांपैकी एक आहे. पण त्या काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या नव्हत्या. त्यांचा संघर्ष काही सोपा नव्हता.

चिनू काला यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मुंबईतील राहतं घर सोडलं होतं. कुटुंबापासून दूर होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता त्याचं कारण होतं – घरामध्ये रोजरोज होणारी भांडणं. भविष्य बनवण्याचं स्वप्न डोळ्यांत बाळगून जेव्हा त्या घरातून निघाल्या तेव्हा  त्यांच्याकडे एक कपड्यांची पिशवी आणि खिशात फक्त ३०० रुपये होते. इतकंच नाही तर त्यावेळी कोणतंही शैक्षणिक प्रमाणपत्र त्यांच्याकडे नव्हतं.

घरातून तर त्या निघाल्या पण पुढे काय करायचं काहीच माहित नव्हतं. शिवाय बाहेरची वर्दळ बघून त्या गडबडून गेल्या होत्या. सुरुवातीचे दोन दिवस त्यांना कळतंच नव्हतं की त्यांच्या जवळपास काय चालू आहे. अशा गोंधळलेल्या अवस्थेत त्या घाबरत घाबरत प्रत्येक पाऊल  टाकत होत्या. या सर्वातून स्वतःला सावरताना त्यांना २ ते ३ दिवस लागले. आणि अखेर त्यांना राहण्यासाठी डॉर्मेटरी मिळाली. ज्यामध्ये रोज रात्री झोपण्यासाठी २० रुपये द्यावे लागायचे. पण चिनू यांना माघारी जायचं नव्हतं. म्हणून घरी जाण्यापेक्षा  त्यांनी डॉर्मेटरीचा पर्याय निवडला.

आता चिनू यांना गरज होती ती कामधंदा शोधण्याची. कारण रोजनिशीचा प्रश्न समोर होता. चिनू यांचं वय लहान होत त्यामुळे कंपनी वगैरेचा पर्याय नव्हता. म्हणून त्यांनी छोटेमोठे का असेना, मिळेल ते काम करण्याचा निर्णय घेतला. शोधाशोध सुरु झाली आणि चिनू यांना अनेक दिवस भटकंती केल्यानंतर सेल्सवूमनची नोकरी मिळाली. घरोघरी जाऊन चाकू, सुऱ्या, कोस्टर वगैरे विकणं हे चिनूचं काम होतं. दिवसभर कष्ट करून चिनूच्या हातात फक्त २० ते ४० रुपये यायचे.

हा नव्वदीच्या शेवटचा काळ होता. तेव्हा घरोघरी जाणून सामान विकावं लागायचं. असं करताना अनेकांनी चिनू यांच्या तोंडावर दरवाजे लावले. पण याने चिनू खचून गेल्या नाही तर अजून मजबूत झाल्या. इथूनच त्यांच्यात बिजनेसची आवड निर्माण झाली. त्या बिजनेसचं रीतसर शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. अशावेळी त्यांनी जे काही शिकलं ते अनुभवातूनच आलं होतं. या सेल्सच्या कामानंतर चिनू यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं.

अनेक मोठ्या व्यक्तींची बायोग्राफी वाचताना कळतं की त्यांना कुणाची तरी साथ मिळालेली आहे. एखादा असा व्यक्ती ज्यांनी त्यांना पारखलं आणि त्यामुळेच ते इतिहासात आपलं नाव करू शकले आहे. असाच एक व्यक्ती चिनू यांच्याही आयुष्यात आला होता. ती व्यक्ती म्हणजेच त्यांचे पती अमित काला. चिनू यांच्या संघर्षाच्या प्रवासादरम्यान त्यांची भेट अमित काला  यांच्याशी झाली आणि त्यांच्याशी लग्न करून चिनू बंगळुरूला शिफ्ट झाल्या.

चिनू दिसायला देखण्या होत्या. म्हणून बंगळुरूला गेल्यानंतर २ वर्षानंतर मित्रांच्या म्हणण्यावरून चिनू यांनी ग्लॅडरॅग्स मिसेस इंडिया (Gladrags Mrs. India) या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत टॉपच्या १० फ़ाइनलिस्ट्समध्ये त्यांचं नाव आलं आणि तिथून त्यांच्या मॉडेल करिअरची सुरुवात झाली.

त्यांच्या मॉडेलिंगच्या ट्रेनिंगच्या वेळी त्यांना आपलं बिजनेस उभा करण्याचं स्वप्न आठवलं. हे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी त्यांनी केली आणि त्यातूनच फॉन्टे कॉर्पोरेट सोल्यूशन्स (Fonte Corporate Solutions) ही कंपनी उभा झाली. ही एक व्यापारी कंपनी होती. यावेळी चिनूने एअरटेल, सोनी, आज तक यांसारख्या क्लायंटसोबत काम केले. ही कंपनी चालवताना त्यांना बिजनेस कसा चालवतात याचा अनुभव आला.

ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करताना त्यांना जाणवले की भारतीय ज्वेलरी उद्योगात खूप वाव आहे. हा उद्योग पसरला आहे पण युनिक डिझाईन्सची मोठी कमतरता आहे. २०१४ मध्ये, चिनूने फॉन्टे बंद करण्याचा आणि रूबान्स अॅक्सेसरीज उघडण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे, त्याने फॅशनबद्दलची त्यांची आवड आणि  कॉर्पोरेट मर्चेंडाइझिंगचा अनुभव एकत्र करून त्यांनी एक परफेक्ट बिजनेस मॉडेल उभं केलं.

रूबान्स कंपनी एथनिक आणि वेस्टर्न ज्वेलरी बनवते, ज्याची किंमत २२९ ते १०,००० रुपयांपर्यंत असू शकते. त्यांनी बंगळुरूच्या फिनिक्स मॉल इथं रूबान्सचं पहिलं स्टोअर उघडलं. आणि बघता बघता अवघ्या ५ वर्षांत रूबान्सची उलाढाल  ७.५ कोटींवर पोहोचली. लवकरच त्यांनी बंगळुरूच्या कोरमंगला इथे असलेल्या फ़ोरम मॉल आपलं स्टोअर टाकलं. आणि आता बंगळुरू, हैदराबाद, कोचीसह अनेक शहरांमध्ये रूबान्सचे स्टोअर आहेत.

चिनू कला यांच्या कामाची दखल घेत २०२१ मध्ये, बिझनेस वर्ल्ड मॅगझिनने चिनूचा ४० अंडर ४० च्या यादीत समावेश केला. अशा या चिनू काला कित्येक महिलांसाठी आदर्श बनल्या आहेत. अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या लोकांना चिनू काला स्वप्नांच्या मागे लागण्याचं बळ देऊन जातात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.