तपासणी, इंजेक्शन आणि गोळ्यांची फी फक्त दहा रुपये, हे आहेत स्वस्तातले डॉक्टर..
ते तपासणी करतात. गरज असली तर इंजेक्शन देतात. आवश्यक ती औषधे देतात आणि फी म्हणून फक्त दहा रुपये घेतात. फक्त दहा रुपयात या डॉक्टरांकडे आजार बरा होतो. आगाऊ एक रुपया सुद्धा त्यांनी आजवर घेतलेला नाही. उलट तुमच्याकडे देण्यासाठी दहा रुपये जरी नसतील तर ते मोफत उपचार करतात. पण तुम्हाला आजारातून मोकळं करतात हे नक्की.
महाराष्ट्रातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या बैलहंगळ तालुक्यात त्यांचा छोटेखानी दवाखाना आहे. त्यांच नाव डॉ. अण्णाप्पा एन.बाली. मध्यतरी एका वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल बातमी छापून आली. पाहता पाहता ते व्हायरल झाले. व्हायरल होण्याचा गर्व डोक्यात जावू न देता ते त्याचं जिद्दीने कार्यरत राहीले.
आजही त्यांची फी फक्त दहा रुपये इतकीच आहे.
डॉ. बाली यांच वय आहे ७९ वर्ष. गेली वीस हून अधिक वर्ष त्यांचा हा दवाखाना सुरु आहे. त्यांच्या दवाखान्यात येणारे रुग्ण हे बहुतांश आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले असतात. गरिब, कष्टकरी, कामगार त्यांच्या दवाखान्यात जात असतात. हातावर पोट असणाऱ्या अनेकांना आपला आजार अंगावर काढण्याची सवय असते. दवाखान्यात गेल्यास दोन ते तीन दिवसांची रोजगारी बुडेल अस साधं आर्थिक गणित यामध्ये असतं. अंगावर आजार काढल्याने बऱ्याचदा या आजारांच रुपांतर मोठ्या रोगात होतं. त्यानंतर परस्थिती हाताबाहेर जाते. अशा वेळी मोठ्या हॉस्पीटलचा न परवडणारा खर्च करायला लागतो अथवा त्या व्यक्तिच्या जीवावर बेततं. दोन्हीपैकी एकच गोष्टी या मजूर, कष्टकरी, कामगार व्यक्तींच्या आयुष्यात होत असतात.
पण याच व्यक्तींना कमी पैशात योग्य उपचार वेळीच मिळाले तर ते बरे होवून लगेच आपल्या कामाला लागतात. डॉ. बाली फक्त दहा रुपये फी आकारत नाहीत तर ते अशाच गोष्टींना चालना देतात म्हणून त्यांच महत्व अधिक आहे. आजारी पडून मोठ्या रोगाने संपुर्ण कुटूंब अडचणीत येण्यापासून डॉ. बाली वाचवतात.
ते पण फक्त दहा रुपयात.
डॉ. बालीच्या दवाखान्यात दररोज १०० ते १५० रुग्ण येतात. सकाळी दहा ते दिड आणि संध्याकाळी चार ते साडेसात असा त्यांचा दवाखाना उघडा असतो. डॉ. बाली हे स्वत: एका गरिब कुटूंबात जन्मलेले. मोफतच्या बोर्डिंग स्कूलमधून त्यांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं. पुढे हुबळीच्या मेडीकल कॉलेजमधून ते डॉक्टर झाले.
त्यानंतर ते सरकारच्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त झाले. १९६७ सालापासून ते आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहू लागले. रुग्णांची सेवा हे ब्रिद घेवून त्यांनी काम केलं. १९९८ साली ते निवृत्त झाले. पण नोकरीच्या काळात त्यांनी जोपासलेला हा ध्यास थांबला नाही.
त्यांनी आपल्या बैलहोंगल गावातच एक खाजगी दवाखाना सुरू केला. दवाखान्याची फी ठेवली फक्त दहा रुपये. काही दिवसातच लोक इथे गर्दी करु लागले. डॉक्टर फक्त फीच कमी घेत नाहीत तर रुग्णाला बरे करुन दाखवतात. लोकांनी या दवाखान्याचे नाव हत्ता रुपाया असे केले. १९९८ ते २०२० पर्यन्त म्हणज गेली बावीस वर्ष ते दहा रुपयात रुग्णांची तपासणी करत आहेत.
हे ही वाच भिडू.
- म्हणून डॉक्टरांना ४७ व्या वर्षींच पद्मश्रीने गौरवण्यात आलं.
- एमबीबीएस डॉक्टर, पण आदिवासींसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तुडवतोय रानवाटा !
- अब्दुल कलामांमुळे तो ड्रायव्हर पुढे जावून इतिहासाचा प्राध्यापक बनला..