हवाई कंपन्यात मराठी तरुणी हवाई सुंदरी म्हणून दिसण्यात, गजानन कीर्तिकरांचा मोठा वाटा होता…

जून महिन्यात राज्यात सत्तानाट्य झालं, शिवसेनेत फूट पडली आणि रोजच्या रोजच पक्ष प्रवेशाच्या बातम्या येऊ लागल्या. विशेष म्हणजे या सत्तानाट्याला ४ महिने उलटले तरी दोन्ही गटांचं इनकमिंग-आऊटगोइंग सुरु आहेच.

असाच एक प्रवेश सध्या गाजतोय, तो खासदार गजानन कीर्तिकर यांचा. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाबद्दल चर्चा सुरु आहेत आणि तर्कही लढवले जात आहेत.

या सगळ्यात एक गोष्ट माहीत असणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे गजानन किर्तीकर यांचा इतिहास आणि त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं काम.

त्यासाठी आपल्याला बघाव लागतो तो शिवसेनेचा इतिहास.

 भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेऊन शिवसेनेची स्थापना झाली आहे. सुरुवातीच्या काळात मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा मर्यादित होती. सेनेच्या सुरुवातीच्या मसुद्यात त्याचं प्रतिबिंब दिसतं. 

जस कि, मराठी माणसांनी आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकाची उमेद वाढवा,

ही शपथपत्रातील कलमे तेव्हाच्या शिवसेना नेतृत्वाच्या मानसिकतेची साक्ष देतात. मराठी अस्मितेसाठी सुरू झालेल्या शिवसेनेला पुढे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा डोस देऊन मराठी अस्मितेच्या परिघाबाहेर नेले हि गोष्ट वेगळी.

शिवसेनेची ताकद मराठी माणसाभोवती असणाऱ्या उपक्रमांमधून वाढत असतानाच १९७२ मध्ये बँका, विमा कंपन्या आणि अन्य काही सार्वजनिक उपक्रमांमध्ये भूमिपुत्रांचा न्याय हक्कांसाठी लढणारी स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या दोन वर्षातच रिझर्व बँक, बँक ऑफ बडोदा, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, अकाउंट जनरल ऑफिस अशा आर्थिक व्यवहाराचे केंद्र असलेल्या ठिकाणी या समित्या स्थापन झाल्या होता. नोकरी देताना तसेच बदली आणि बढतीच्यावेळी मराठी माणसावर अन्याय होत नाही ना हे बघण्याचं काम या समितीचा होतं. त्याशिवाय ८० टक्के जागांवर मराठी माणूसच नोकरीला असला पाहिजे असा आग्रह ही या समितीचा होता.

१९७२ ते ७४ या काळात स्थानीय लोकाधिकार समितीची सूत्र वेगवेगळ्या लोकांच्या हातात होती. पण त्यावर देखरेख दत्ता प्रधान यांची असायची. प्रधान यांचाही कामगार क्षेत्रातला अनुभव दांडगा होता. पुढे वेगवेगळ्या समित्यांचा एक महासंघ स्थापन करण्यात आला आणि त्याची सूत्र सुधीर जोशी यांच्या हाती सोपवण्यात आली.

त्यांच्या जोडीला १९७८ मध्ये सरचिटणीस म्हणून गजानन कीर्तिकर आले. या जोशी-किर्तीकर जोडीने त्या काळात धडाक्याने काम केले.

या महासंघाच साम्राज्य एवढं वाढलं की व्हाईट कॉलर वर्गात मराठी माणूस ताठ मानेनं वागू लागला.

थोडक्यात सांगायचं झालं तर भरती, बदली आणि बढती ही स्थानीय लोकाधिकार समिती यांच्या कामाची त्रिसूत्री बनवून गेली होती. मराठी माणसाला कामावर घेतलं पाहिजे असा नुसता आग्रह धरून चालणार नाही तर त्यासाठी होणाऱ्या वेगवेगळ्या स्तरांवरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मराठी माणसाचा टिकाव लागायला हवा हे नेते मंडळींच्या लक्षात येऊ लागलं.

कोणत्याही ठिकाणी मराठी माणसाच्या भरतीचा आग्रह धरल्यावर रिक्त पद भरण्यासाठी योग्य आणि प्रशिक्षित मराठी उमेदवार उपलब्ध नाहीत, जे आहेत ते स्पर्धापरीक्षा टिकू शकणार नाहीत अशी सबब पुढे करून मराठी माणसाला नकार दिला जाई. हा मुद्दा पण निकाली काढण्यासाठी समितीने व्यक्तिमत्व विकास मुलाखतीचे तंत्र आदी बाबी होतकरू तरुण वर्गाला समजावून सांगण्यासाठी अनेक शिबिर आयोजित केली.

मराठी युवती हवाईसुंदरी म्हणून विमानांमध्ये बघायला मिळाली ती सुद्धा याच महासंघामुळे

मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘जय महाराष्ट्र’ हे शब्द कानावर पडू लागले ते देखील याच महासंघाच्या प्रयत्नांमुळे. स्थानीय लोकाधिकार समितीने केलेल्या कामामुळे शिवसेनेची ताकद निव्वळ वाढलीच नाही तर या वर्गात शिवसेनेला प्रतिष्ठा ही प्राप्त झाली. सुधीर जोशी आणि गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यासाठी केलेल्या अथक परिश्रमांची नोंद शिवसेनेच्या इतिहासात त्यामुळे अगदी ठळकपणे घेणं भाग पडतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.